संध्याकाळ झाली.
हवेत मस्त गारवा होता आणि घरात छान उबदार वातावरण.
तो घरात गादीवर आरामात पडला होता.
इतक्यात ती घरात आली.
ही नुसती आली नाही तर गुणगुणत आली. हिला सदानकदा गुणगुणण्याची सवय आहे.
ही हसत हसत गुणगुणली,“एऽऽ, तुला एक सॉलीड जोक सांगते. हा जोक जगातला सगळ्यात लहानात लहान जोक आहे. फक्त एका वाक्याचा जोक!
या जोकची “पॉयझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मधे पण एंट्री झालीए!! सांगू तो जोक?”
गादीवरुन उशीकडे सरकत तो म्हणाला,“आत्ताच सांगायचं काय नडलंय का? गेले तीन दिवस माझ्या पोटात रक्ताचा एक थेंब नाही! भुकेने माझा जीव कासावीस झालाय, आणि तुला
जोक सुचतोय?
तू गावभर फिरत रक्त पितेस तसं माझं नाही म्हंटलं! .. ..
माझं.. या घरातल्या माणसांशी “रक्ताचं नातं” आहे!”
हे एकल्यावर तिची गुणगुण वाढली.
ती रागाने फणफणत फुणफुणली, “पण एक सांगते, या घरातल्यांना तुझी किंमत नाही. जोडून सुटी आली तर गेले तुला गादीवर सोडून!
आपण गेल्यावर तुझं काय होईल, याची त्यांना आहे का चिंता?
“तुझ्यासाठी घरातल्या एकाने तरी मागं रहावं. या गादीवर झोपावं.” असं कुणाला तरी वाटलं?”
तो रागाने खसकून म्हणाला,“हे बघ,उगाचच “उचलली सोंड आणि लावली पंखाला” असं करू नकोस.
तू काय समजतेस काय आम्हाला?
तुझ्यासारखे गावभर हुसहुस करत फिरणारे आणि डबक्यात अंडी घालणारे आम्ही नव्हे!
आम्ही घरंदाज आहोत!
समझे?
उगाच गमजा करू नकोस.
अगं तहानने घसा सुकला तरी आम्ही दुसऱ्या घरी जाऊन रक्त पीत नाही!!
कारण..
कारण.. या घरातल्या माणसांशी मी आणि माझं कुटुंब “रक्तनिष्ठ” आहे!!”
“बरं बाई झाली घाई. मी इतकंसं बोलल्यावर लगेच एव्हढं काही सुनवायची गरज नव्हती. पण जाऊ द्या.
आता मला सांग, ही माणसं कधी परत येणार आहेत?”
“आज संध्याकाळ पर्यंत तरी यायला हवीत. नाहीतर उद्या माझं कठीणंच आहे. पण नाहीतर मागच्या वेळेसारखं झालं तरी बरं!”
ती म्हणाली,“म्हणजे मागच्या वेळी काय झालं होतं?”
तो सांगू लागला,“अगं त्यावेळी तू नव्हतीस म्हणून तुला माहित नाही.
त्या उन्हाळ्याच्या सुटीत ही घरातली सगळी जणं पंधरा दिवसा करता काश्मीरला का कुठेतरी गेली. पण त्यांनी जाताना घराची किल्ली बाजूच्यांकडे देऊन ठेवली.
त्यामुळे आम्हाला रक्त पाजण्यासाठी या बाजूच्या घरातली माणसं अधून मधून येत आणि कॉटवर लोळून जात.
त्यावेळी.. .. परक्या माणसांच्या हाताला, पायाला किंवा पोटरीला तोंड लावताना मला जरा अवघडल्यासारखं व्हायचं. नकोसं वाटायचं. मी खूप गोंधळलो होतो.
मग मला आईने समजावलं.
आई मला म्हणाली,“अरे आपण या घरातलेच आहोत. या घरात जे कुणी येतात ते आपलेच.”
त्यानंतर मात्र माझी भीड चेपली.”
तिने हसत हसत विचारलं,“काय रे, त्या शेजारच्या घरातला तो जाड्या ढेरपोट्या माणूस पण आला होता का तेव्हा? त्याचं रक्त तू टेस्ट केलं आहेस?”
तो आठवत म्हणाला, “बाप रे! तो तर सॉलीडच किस्सा आहे!
माझी आई त्याला गमतीने “दगडी उशी” म्हणते.
तो जेव्हा आमच्याकडे आला होता तेव्हा आई मला म्हणाली,“ढेकणू, त्या दगडी उशीच्या जवळपास पण जायचं नाही. झोपेत त्याचं बोट जरी आपल्या पाठीवर पडलं तर आपण चिरडून
जाऊ.
आणि त्यांचं रक्त पिण्यासाठी तू अजून लहान आहेस!”
मी लहान आहे, असं आई का म्हणाली असेल ग?”
त्याचा प्रश्न ऐकून ती गुणगुण गुणगुण गुणगुणली आणि म्हणाली,“ढेकणू तू तर अगदीच पाचवी फेल आहेस!
अरे रात्री जर त्यांचं रक्त प्यायलं तर आपलं डोकं सुन्नं होतं म्हणे. सॉलीड कीक येते!
माझी मोठी मावशी तर त्यांच्यावर तुटून पडते आणि मग त्यांच्याच कानावर झोपते.
जाऊ दे तुला नाही समजणार ते.”
“मग आता मला समजेल असा तो इटूकला जोक तरी सांग.” ढेकणू म्हणाला.
डासाची आई जोक सांगू लागली,“अरे एका दिवाळी अंकात असं लिहिलंय की,“आम्ही म्हणे माणसांना चावतो!” आता हा मोठा विनोदच नाही का?
चावण्यासाठी “दात” असावे लागतात.
पण आम्हाला तर दातच नाहीत मग आम्ही चावणार कसे?
माणूस भले चंद्रावर गेला असेल पण त्याला जर “आमच्या सारख्या डासांना दात नसतात” हेच जर माहित नसेल तर उपयोग काय?
रक्ताशपथ सांगते,“आम्ही माणसांना कधीच चावत नाही तर फक्त टोचतो.” आमच्या मऊमऊ सोंडेने टोचतो.”
ढेकणू आश्चर्याने म्हणाला,“मग, माणसांना चावतं कोण”
डासाई म्हणाली,“अरे कुत्रे असतात चावरे आणि लाळघोटे. हे कुत्रे माणसांच्या सारखं मागे मागे फिरत असतात.
आपण चावरे नाही तर आपण “टोचरे” कुटुंबातली मंडळी आहोत.
आपण माणसांच्या मागे नाही तर माणसंच आपल्या मागावर असतात!”
इतक्यात डासाईला कुठलासा वेगळा वास आला.
ती सावध झाली.
तिने सोंडेनेच ढेकणूला खूण केली.
ढेकणू गादीत शिरला.
डासाईने कल्टी मारली.
– राजीव तांबे.
Leave a Reply