उत्पन्न कमी आणि खर्च अधिक, असे समीकरण झाल्याने शेती करणे सध्या परवडणारे नाही असा समज शेतकर्यांमध्ये निर्माण होताना दिसतो. अशातच विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याने या मत प्रवाहात भर पडली आहे. अशाही परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील मंगरुळ (इसरुळ) येथील शेतकर्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन सबंध
जिल्ह्यात आपल्या गावाची ओळख टोमॅटो सिटी अशी निर्माण करुन नवा आदर्श घालून दिला आहे.मंगरुळ येथील एक नव्हे तर शेकडोच्या संख्येत शेतकर्यांनी शेतीला नवा आयाम देत टोमॅटो उत्पादनाची कास धरली आहे. सबंध विदर्भात ज्या समस्यांना शेतकर्यांना सामोरे जावे लागते, त्या समस्या येथील शेतकर्यांपुढे सुध्दा आ वासून उभ्या असतात. अत्यल्प पावसाने पाण्याची कमतरता, त्यातच ग्रामीण भागातील १४ तासाचे भारनियमन, कधी निसर्गाची अवकृपा अशा सर्वव्यापक समस्यांना खंबीरपणे सामोरे जात येथील शेतकरी न खचता शेतीत राबतो. कधी काळी या गावाची ओळख पारंपरिक पिक घेणारे तर नंतर मिरचीचे उत्पादन घेणारे म्हणून होती. बाजारपेठ, उत्पन्नासाठी लागलेल्या खर्चाच्या तुलनेत कमी मिळणारा भाव यामुळे मिरचीचा तिखटपणा त्यांना सोसणारा राहिला नाही. अशा परिस्थितीत त्याच पिक उत्पादनाला चिटकून बसणे येथील शेतकर्यांनी सोडून दिले आणि वेगळा प्रयोग म्हणून टोमॅटो उत्पादनाचा मार्ग स्विकारला. पाहता पाहता या गावाने टोमॅटो सिटी म्हणून जिल्हाभरात नावलौकिक मिळविला. गेल्या २० वर्षांपासून येथील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत १५० पेक्षा अधिक शेतकरी सुमारे ४०० एकरावर टोमॅटोचे उत्पादन घेतात. या उत्पादनाच्या बळावर येथील शेतकर्यांनी विदर्भाच्या सर्वच बाजारपेठा काबिज केल्या आहेत हे विशेष. माल कुठे न्यायचा, को
ण
ाला द्यायचा याचा निर्णय शेतकरीच घेतात. मंगरुळ येथील शेतकरी प्रामुख्याने जून महिन्यात पिकाची लागवड करतात. लागवड करायची आणि सोडून द्यायचे हा येथील शेतकर्यांचा स्वभाव नाही. रोपाच्या निर्मितीपासून ते पिक पूर्ण होईपर्यंत
डोळ्यात अंजन घालून त्याची निगा राखण्याचे काम ते करतात. टोमॅटो उत्पादन घेताना उत्पादन कसे वाढेल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. सोबतच माती परीक्षण, कृषी अधिकार्यांचे मार्गदर्शन घ्यायला ते विसरत नाहीत. आज सर्वत्र महागाई वाढल्याने सामूहिक शेतीचे वारे वाहू लागले आहे. अशी सहकारयुक्त शेती येथील उत्पादक अनेक वर्षांपासून करीत आले आहेत. या शेतकर्यांनी चिखली तालुका गजानन टोमॅटो व भाजीपाला उत्पादक संघाची स्थापना केली आहे. त्या संघाच्या माध्यमातून माल कोठे न्यायचा, कधी भरायचा याचे नियोजन केले जाते. शिवाय माल विक्रीसाठी सर्व शेतकरी जात नाहीत. मॅटेडोअर भरले की, एक किंवा दोन शेतकरी त्याबरोबर जातात आणि सर्वांचा माल विकून येतात. शेती करताना येणार्या अडचणींचा पाढा वाचण्याऐवजी त्यावर तोडगा शोधण्याचे काम येथील शेतकरी करतो. या भागातील शेतकर्यांवरील विश्वास वाढल्याने राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत आहेत. येथील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांना २५ ते ३० हजारापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. शेतकर्यांच्या या प्रयत्नामुळे मंगरुळ या गावाला टोमॅटो सिटी म्हणून मिळालेले नाव समर्थ झाले आहे.
महान्यूजच्या सौजन्याने
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply