बाळंतपणानंतर डिकाचे लाडू म्हणजे मेजवानीच. पण अनेकदा मेथी घालून केलेले डिकाचे लाडू, कडू चवीमुळे तापदायकच जास्त वाटतात. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की मेथी साखरेबरोबर वापरली म्हणजे जास्तच कडू लागते. हेच डिक-मेथीचे लाडू गुळात केल्यास मात्र फारच चविष्ट लागतात.
साहित्य:- सुके खोबरे अर्धा किलो, खारीक अर्धा किलो, काजू-बदाम प्रत्येकी 100 ग्रॅम, बाभळीचा डिक 100 ग्रॅम., गोडंबी पाव किलो, मेथी 50 ग्रॅम, शुद्ध तूप (गाईचे) 250 ग्रॅम, गूळ 1 किलो, खसखस 25 ग्रॅम, किसमिस 50 ग्रॅम.
कृती:- खोबरे व खारीक एकत्र दळून आणावे. मेथी व डिक जाडसर दळावे व तुपात तळून घ्यावे. डिक तळण्यासाठी चमचाभर तूप कढईत गरम करावे व त्यात जाडसर दळलेला चमचाभर डिक घालून परतून घ्यावे. डिक चांगल्या प्रतीचा असल्यास सुंदर फुलून येतो. काजू-बदाम व गोडंबीही मिक्सरवर जाडसर दळून घ्यावे. बारीक भुकटी करू नये. खसखसही तुपात तळावी. गुळाचा पाक करून त्यात वरील सगळे जिन्नस मिसळावे व थंड झाल्यावर लाडू वळून ठेवावेत.बाळंतपणानंतर तर हे लाडू वापरता येतीलच. पण त्याचबरोबर इतरांनाही हे लाडू टॉनिक म्हणून नेमाने रोज एक या प्रमाणात देता येतील.वीर्यवृद्धी करण्यासाठी हेच लाडू औषधी स्वरूपात तयार करायचे असल्यास यात मेथीऐवजी 100 ग्रॅम शतावरी व 100 ग्रॅम सफेद मुसळी पावडर तुपात परतून वापरावी.
— बावर्ची
Leave a Reply