त्यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी मा.माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकिपीडीया
Leave a Reply