आज ५ डिसेंबर
आज वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची जयंती.
जन्म ५ डिसेंबर १९४३
प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी.,मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाटय़कथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाटय़-चित्रपट कारकीर्द आहे. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर आहे. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. हे उत्तुंग प्रतिभेचा कलावंत होते. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८०मध्ये झाली. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply