डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘आयुष्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील माझी सर्वात आवडती म्हणजे माझ्या मनाला भावलेली कविता ‘वेश्या’ या कवितीचे रसग्रहण मी येथे लिहणार आहे. आपल्या या कवितेत डॉ.शांताराम कारंडे सुरवातीच्या चार ओळीत लिहतात…
मी पण एक स्त्री आहे,
अडगळीत पडलेली
‘वेश्या’ म्ह्णतात मला,
पोटासाठी अडलेली
या चार ओळीतून कविला सुचवायचे आहे की वेश्येकडे समाजाने एक उपभोगाची वस्तू म्ह्णून न पाहता एक स्त्री म्ह्णून पाहायला हवे जसे आपण आपल्या आया – बहिणींकडे पाहात असतो. आणि त्या जे काही व्यवसाय म्ह्णून करत आहेत आहेत ते आपल्या पोटापाण्यासाठी आपल्या मनाविरूद्ध करत आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे.
इच्छा मन भावना माझ्या,
सार्या काही मेलेल्या
उरल्या – सुरल्या त्याही,
किंमत मोजून गेलेल्या
या पुढच्या चार ओळीत
या ओळीतून कविने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते. वेश्या होण्यापूर्वी तिने आपल्या मनाला आपल्या भाव-भावनांना आवर घातलेला असतो असं नाही तर तिने त्यांचा गळा घोटून त्यांना ठार मारलेले असते. इतक करूनही जर काही भावना जिवंत राहिल्याच तर त्याही त्या त्यांना पैशाच्या बदल्यात विकाव्या लागलेल्या असतात.
उघड्या डोळ्यांनी अनुभवतो,
स्वतःवरील बलात्कार…
तरीही आशेवर जगतो,
घडेल काही चमत्कार…
या पुढच्या ओळींमध्ये कवितेत दडलेली दाहकता जाणवते. कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते त्यामुळे तिचा जेंव्हा जेव्हा पुरूषांशी शारीरिक संबंध येतो तेंव्हा प्रत्येक वेळी तो तिच्या मनाच्या विरूद्धच असतो त्यामुळे त्या प्रत्येक वेळी तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचाच अनुभव येत असतो. पण ती हे सारं निमूटपणे सहन करत असते. आणि कधी तरी आपली सुटका करणारा कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल या आशेवर जगत असतात. हे कवीने अगदी नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
रोजच होतो मधुचंद्र,
तरीही हक्काचा नसतो कोणी
मंगळसूत्र फक्त शोभेला,
कुंकवाचा नसतो धनी
या ओळीत कवीने वेश्यांच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मधुचंद्र या गोष्टीला प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळे महत्व असते. पण वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रियांना तो अनुभव जीवघेणा वाटत असतो कारण त्यांच्या मनाविरूद्ध त्यांचा रोजच मधुचंद्र होत असतो.
वेश्या व्यवसाय करणार्या काही स्त्रिया विवाहित ही असतात पण त्यांच्या नवर्यांनीच त्यांना या व्यवसायात ढकलेले असते अथवा यांच्या जीवावर ते जगत असतात बांडगुळासारखे. ते त्यांच्या कुंकवाचा आधार फक्त नावाला असतात प्रत्यक्षात त्यांना त्यांचा आधार कधीच मिळत नाही.
पोटच्या आमच्या गोळ्याला,
नावं नसतं बापाचं
जन्माआधीच मरण,
भोगतो आमच्या पापाचं
या चार ओळीत वेश्यांना होणार्या मुलांची बाप म्ह्णून कोणी जबाबदारी घेत नसतो आणि समाज त्यांच्याकडे एक पाप म्ह्णूनच पाहात असतो आणि पुढे जाऊन ते पापीच होणार हे त्यांच्या जन्मा अगोदरच गृहीत धरतो हे कवीने सुचविले आहे.
तारूण्यात आमच्या,
जगण्याला असतो ‘अर्थ’
म्हातारपणात मात्र
जगणंच होतं व्यर्थ
जो पर्यंत वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रिया तरूण असतात तोपर्यत त्यांचा उपभोग घेणार्यांचा राबता असतो पण त्यांचे तारूण्य ओसरले की सारेच त्याच्याकडे पाट फिरवतात आणि त्यांच्या जगण्यालाही काही अर्थ उरत नाही हे कविने या चार ओळींतुन अगदी सहज सुचविले आहे.
लखलखत्या प्रकाशात असताना,
आंम्ही स्वतःच करायचो अंधार
आता रोज सूर्य उगवतो तरी,
आयुष्याचा झालाय अंधार
या कवितेच्या शेवटच्या चार ओळीत कवी
सुचवतो की काही स्त्रियां आपल्या सौंदर्याच्या अभिमानात आणि तारूण्याच्या जोशात आणि पैशाच्या हव्यासापायी स्वतःच्या मर्जीनेही वेश्या व्यवसाय व्यवसाय म्ह्णून स्वीकारतात त्यांच्या वाटयाला ही शेवटी फक्त अंधारच येत असतो हे सत्य मांडलेले आहे.
लेखक – निलेश बामणे
Leave a Reply