महाराष्ट्राचे अर्थकारण हे मुंबईशी निगडीत आहे; ६० वर्षापूर्वी या अर्थकारणाशी तात्कालीन मुंबई राज्याचा मोठा प्रदेश व देशाचे अर्थकारणही थेट संबंधित होते. त्यामुळे “मुंबईसह महाराष्ट्र” निर्मितीमागची आमची भूमिका होती. विदर्भातील तत्कालिन नेतृत्वाला याची जाणीव करुन देण्याचे काम आम्ही केले. एवढेच नव्हे तर मुंबईसह महाराष्ट्र होताना विदर्भ त्यातीलच एक भाग राहावा. यासाठी आंदोलनामध्ये कपाळावर जखमेचे व्रण उमटलेला मी विदर्भाचा एक कार्यकर्ता आहे.
विद्यार्थीदशेपासूनच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी झालो होतो. नागपूर येथे कस्तुरचंद पार्क नजीकच्या शासकीय इमारतीवरील युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा चढविण्याचे धाडस आम्ही त्यावेळी दाखविले होते. १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात माझा सहभाग होता. तेव्हाचे नेते भाऊसाहेब बोबडेंच्या घराजवळ पाठीवर लाठी खाणार्या विद्यार्थी नेत्यांमध्ये आमचा सहभाग होता. सुरुवातीला समाजवादी असणारा मी हळूहळू कॉंग्रेसी झालो. पुढे कॉंग्रेसमध्ये अनेक जबाबदार्याही पार पाडल्या. विदर्भाच्या नेत्यांनी जबाबदारीने व प्रखरतेने एकत्रित येऊन विभागेचे प्रश्न मांडल्यास विदर्भाचा वाढलेला अनुशेष दूर होऊ शकतो, हे माझे आताही मत आहे; मात्र, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी होतांना मुंबई विदर्भासह महाराष्ट्र हे स्वप्न पाहणार्या माझ्यासारख्या विदर्भाच्या पुत्राला अजूनही विदर्भाकडे दुर्लक्ष होत असल्याचे शल्य आहे. विदर्भात संयुक्त महाराष्ट्रासाठी त्याकाळात निघालेल्या एका मोर्चाचे नेतृत्व आपण स्वत: केले होते. आमचा मोर्चा शिस्तीत चालू असतांना बाबूजी आणेंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला घेऊन दुसरा मोर्चा बर्डी चौकात निघाला होता. दोन वेगवेगळे विषय असलेले मोर्चे आमने सामने आल्यानंतर आम्ही मोरचा मागे घेण्याचा प्रयत्न केला; मात्र, एवढ्यात अचानक दगडफेक झाली. एक दगड माझ्या कपाळावर येऊन आदळला. या दगडाच्या माराची खूण अजूनही कपाळावर आहे. त्याकाळचे संयुक्त महाराष्ट्रवादी मला या खुणेनेही ओळखायचे. मुंबईसह महाराष्ट्रासाठी पं.जवाहरलाल नेहरू फार उत्सुक नव्हते. कॉंग्रेसचे अनेक नेतेही विरोधात होते, मात्र त्यावेळच्या मराठीमाणसांचठीआवाज बुलंद होता. सामान्य माणसांची भूमिका स्पष्ट होती.समाजकारणातील अनेक नेत्यांनी त्यावेळी या चळवळीचे नेतृत्व केले होते. त्यामुळे पक्षीय राजकरणापासून ही चळवळ अलिप्त होती. नेतृत्वाचे लक स्पष्ट होते. त्यामुळे सर्व पक्ष बाजूला सारून हा लढा उभारला गेला होता. त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक राजकीय नेते या आंदोलनात नेमके कुठे असा प्रश्न होता. नेहरूंच्या भूमिकेमुळे अनेक दिग्गज क्रॉंग्रेस नेते या आंदोलनापासून दूर राहात होते. कधी तटस्थ राहण्याचा राहण्याचा विचार करीत होते. मात्र लोकांचा दबाव प्रचंड असल्याने अनेकांना आपल्या भूमिका सोडाव्या लागल्या. मला वाटते, या लढ्याचे ते यश होते. त्या काळच्या हजारोंच्या संख्येने होणार्या सभांना महाराष्ट्राच्या सांसस्कृतिक चळवळीचा लोकांवर असणारा प्रभाव सांगणारे ऐतिहासिक उदाहरण म्हणता येईल. त्याकाळात संयुक्त महाराष्ट्रासाठी होणार्या मोठमोठ्या सभा, मुंबईसाठी महाराष्ट्र भरातून जमा होणारा मराठी माणूस, त्यांचे ठिकठिकाणचे मेळावे हे सारेच विस्मरणीय आहे. आचार्य अत्रे, एस.एम.जोशी, श्रीपाद अमृत डांगे ते प्रबोधनकार ठाकरे अशी मोठी वक्त्यांची यादी अजूनही स्मरणात आहे.
या काळातच या सर्वांशी माझी ओळख झाली. ही ओळख पुढे या सर्व नेत्यांसाठी माझे घर नागपुरातील हक्काचे मुक्कामाचे ठिकाण बनण्यात झाली. विदर्भाच्या दौर्यावर अल्यानंतर ही सर्व मंडळी माझ्याकडे नागपुरात मुक्कामी असायची. आणि त्या निमित्ताने आमच्या घरी गप्पांचा फड रंगत असे. भूतकाळात झालेल्या चुकांना दुरुस्त करुन एका “महा”-राष्ट्राच्या निर्मितीसाठी नव्याने कटिबद्ध व्हावे लागेल, असे राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आग्रहाने सांगणे, मी माझा हक्क समजतो.
— वसंत साठे (ज्येष्ठ कॉंग्रेस नेते)
(`लोकराज्य’ च्या सौजन्याने)
Leave a Reply