“नारायण” “नारायण” म्हणत श्री नारदमुनी श्री विष्णूना भेटण्यासाठी गेले. नारदानी विष्णूना अभिवादन केले. विष्णूनी हास्यमुखानी त्यांच स्वागत केल.
“हे महान ईश्वर जगदिशा आज मी माझ्या मनातली एक शंका घेऊन तुझ्याकडे आलो आहे. ” विष्णूनी हासत मानेनेच त्यांना मान्यता दिली.
“मी रात्रंदिवस सतत तुझ नामस्मरण करीत असतो. मी स्वतःला तुझा थोर परम भक्त समजतो. परंतु तुझे लक्ष्य इतर भक्तांमध्ये खूपच व्यक्त झालेले दिसते. माझ्याकडे तुझे दुर्लक्ष्य होत असावे अशी माझी आपली शंका. प्रभू मी काय करावे म्हणजे माझी शंका दुर होईल. ”
श्री विष्णू हासले. ” नारदा चल आज मी तुझी एक छोटीशी परिक्षा घेतो. त्यांत जर तु यशस्वी झालास तर तुला मी सर्वांत श्रेष्ठ भक्त ही उपाधी देईन. पाण्याने काठोकाठ भरलेले एक कटोर त्यानी नारदाच्या हाती दिले. जा ! ह्या पृथ्वी भोवती एक चक्कर मारुन ये. फक्त एकच अट. ह्या कटोऱ्यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडता कामा नये. संभाळून ने. नारदानी कटोरे हाती घेतले. शांत मनाने कटोऱ्यातील पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत त्यानी पृथ्वीची प्रदक्षीणा पूर्ण केली. अत्यंत आनंद व समाधानाने ते श्री विष्णूला पून्हा भेटले.
” नारदा मला खूप समाधान वाटले. तू अतिशय काळजीपूर्वक, मन एकाग्र करुन पृथ्वी प्रदक्षिणा केलीस. पाणी मुळीच हालले नव्हते. त्याचा एकही थेंब बाहेर पडला नाही. ” नारदाचे ह्रदय भरुन आले. ” परंतु खर सांगू नारदा. तू ह्या शर्यतीत हरलास. कारण जेवढा वेळ तू पाण्यावर मन एकाग्र करीत होतास, तुझ्याकडून नामस्मरणांत खंड पडला.
विष्णू लगेच नारदाला म्हणाले. “चल माझ्याबरोबर पृथ्वी लोकांत. तुला एक खरा भक्त दाखवतो. ” दोघानी साधूची वेशभूषा धारण केली. ते एका मंदीराजवळ आले. आंत चैतन्य महाप्रभू भजन करीत बसले होते. साधूना बघताच ते उठले. त्यानी दोघांचे स्वागत केले.
साधू वेषातील विष्णू म्हणाले ” तुमची भक्ती बघून आम्ही आनंदी झालो. प्रसन्नता वाटली. तुमच्या मनाची विचारांची लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता आम्ही जाणली. तुम्ही आपले मन कसे एकाग्र करु शकता, हे आम्ही बघू इच्छीतो. त्यानी तोच साधा कटोऱ्यातील पाण्याचा प्रयोग चैतन महाप्रभूला करण्यास विनविले. मात्र येथे चक्कर फक्त त्या मंदीरा भोवती करण्यास सांगीतले. साधूना अभिवादन करुन ते अतीशय काळजीने पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत निघाले. साधूवेषधारी दोघेजण मंदीराच्या दाराजवळ बसले.
बराच वेळ झाला. परंतु चैतन महाप्रभू मंदीर प्रदक्षिणा करुन आले नाही. दोघाना शंका वाटू लागली. ते उठले व त्यांचा मागोवा घेत मंदीराच्या मागे गेले. जे त्यानी बघीतले त्याचे दोघाना आश्चर्य वाटले. श्री चैतन महाप्रभू तो कटोरा हातात घेऊन हातवारे करुन भजन म्हणत, नाचत तल्लीन झालेले होते. कटोऱ्यातील पाणी सर्वत्र विखूरले गेले होते. हाती रिकामा कटोरा, मन ईश्वराचे चिंतन,मनन, भजन यानी भरले होते. सर्व शरीर बेभान होऊन नाचत होते. हे दृष्य बघताना नारदांच्या डोळे पाणावले होते.
ईश्वर भक्तीत “ तन्मयताच करी साकार ” ह्याची प्रचीती त्याना त्या भक्ताकडून आली.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply