नवीन लेखन...

तहानलेले सावरकर

“माझ्या निधनानंतर स्मरणार्थ एखादी स्मृतिशिला कोणाला बसवावीशी वाटली तर त्या शिलेवर माझ्या नावामागे स्वातंत्र्यवीर ही उपाधी नाही लावली गेली तरी चालेल. पण त्यावर काही लिहायचंच असेल तर “हिंदुसंघटक सावरकर” असं लिहिलेलं मला जास्त आवडेल.” असं सावरकर एकदा म्हणाले होते. सावरकर हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते होते. त्यांच्याबद्दल अनेक गैसमज आहेत. हिंदुत्ववादी असल्यामुळे ते इतर धर्मियांचे विरोधक होते असं बर्‍याचदा म्हटलं जातं. परंतु हे धादांत खोटे आहे. सावरकर एकदा रत्नागिरीत होडीने जात होते. लालखान नामक एका मुसलमानाची ती होडी होती. सावरकरांनी होडीवरच सहभोजन करण्याचे ठरवले. लालखानलाही आपला डबा आणण्यास सांगितले. तेव्हा लालखान म्हणाला “तुम्ही मुस्लिमांचे विरोधक आहात असे मी ऐकले आहे आणि मी तर…” तेव्हा सावरकर ताडकन म्हणाले, “माझ्या देव-धर्माच्या विरोधात असणार्‍या मुसलमानांच्या मी विरोधात आहे. तुम्ही त्यापैकी आहात का?” लालखानने नकारार्थी मान हलवली. तेव्हा सावरकर म्हणाले, “मग आमच्या सहभोजनात सामील व्हा.” अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरुन हे स्पष्ट होते की सावरकर हे इतर धर्मियांचे विरोधक नव्हते.

मुळात सावरकर हे विरोधक नव्हते तर ते उद्धारक होते. सावरकरांनी हिंदुंनाच नव्हे तर मुसलमानांनाही पोथीनिष्ठेचा त्याग करायला सांगितला आहे. सावरकरांनी अस्पृश्योद्धाराची चळवळ सुरु केली. ज्यांना गांधीजी हरीजन म्हणत, त्यांनाच सावरकर पुर्वास्पृश्य म्हणत. १९२९ मध्ये रत्नागिरीतल्या प्राचीन श्री विठ्ठल मंदिरात प्रथमच पुर्वास्पृश्याचा प्रवेश झाला. शिवू भंगी नामक एका मुलाने सावरकरांनी रचलेले “तुम्ही देवाच्या येऊ दिलेती दारी” हे गीत शेवटच्या पायरीवर उभं राहून म्हणण्यास सुरुवात केली व एकेक पायरी वर चढत तो हे गीत म्हणू लागला आणि गीत संपले तेव्हा तो सभामंडपात येऊन उभा राहिला होता. त्याला मंदिरात प्रवेश केलेला पाहून सर्वांनी टळ्यांचा गजर केला. आताच्या लोकांना हा प्रसंग साधारण वाटेल. परंतु त्या काळचे हे सर्वात मोठे धाडस होते. त्यानंतर सावरकरांनी सर्व हिंदुंना मुक्त प्रवेश असावा यासाठी पतितपावन मंदिराची स्थापना केली. १९२९ साली, पतितपावन मंदिराच्या समारंभात हिंदुंच्या वतीने पांडू महारांनी शंकराचार्यांना हार घातला. तो शंकराचार्यांनी स्वीकारला व महारांना प्रसाद म्हणून श्रीफळ दिले. केवढे मोठे कार्य आहे हे. त्याची माहिती बर्‍याच जणांना नाही. कारण सावरकरांनी त्यांच्या कार्याची जाहिरात कधीच केली नाही. अखिल हिंदु उपहारगृहाची स्थापना तात्यांनी १९३३ साली रत्नागिरीत केली. या उपहारगृहात पूर्वास्पृश्य चहा करीत असत व देत असत. तेथे चहा प्यायले म्हणून थोर चरित्रकार धनंजय कीर ह्यांच्यावर भंडारी समाजाने बहिष्कार घातला होता. अस्पृश्यता हा मनुष्यत्वाचा अपमान असल्यामुळे न्यायाच्या व माणुसकीच्या दृष्टीने तिचे बंड मोडले पाहिजे, असे सावरकरांनी लिहिले आहे. सावरकरांचे हे महान कार्य पाहून “डिप्रेस्ड क्लास मिशन”चे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले, “येथे घडत असलेली सामाजिक क्रांती खरोखरच अपूर्व आहे. तुम्ही हजारो भंगी-महारप्रभृति धर्मबंधूंबरोबर सहपूजन, सहभोजनादी सारे व्यवहार प्रकटपणे करता. हे दिवस पाहण्यास मी जगलो हे ठीक झाले. स्वातंत्र्यवीराने आपल्या अज्ञातवासाच्या अवघ्या सात वर्षात ही अपूर्व सामाजिक क्रांती घडवून आणली. देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांनाच अर्पण करावे.”

अंदमानात असतानाही त्यांनी समाजकार्य केले आहे. काळ्या पाण्यासारखी निर्दयी आणि निष्ठूर शिक्षा भोगत असतानाही हा माणूस देशसेवा सोडत नाही. एकिकडे अंदमानात होणारे हिंदुंवरील अत्याचार ते थोपवून लावत होते. अंदमानमधील निरक्षर कैद्यांना साक्षर करीत होते. तर दुसरीकडे उत्तम काव्य रचत होते. सावरकर अंदमानातून बाहेर पडले तेव्हा ९०% कैदी मराठी साक्षर झाले होते. अंदमानात बंदींना वर्षातून एक भेट मागण्याची मुभा होती. तेव्हा बंदी काहीतरी चांगल्या वस्तु किंवा पदार्थ मागवित असत. पण सावरकारांनी कैद्यांना सांगितले की आतापासून मी सांगतो ती पुस्तके मागवा. त्यानंतर अंदमानात २००० पुस्तकांचा संग्रह झाला. तुरुंगाधिकारी बारी याचा पुस्तकांना विरोध असूनही सावरकरांनी अंदमानात उत्तम वाचनालय सुरु केले. सुट्टीच्या दिवशी बंदिवान मारामार्‍या किंवा जुगार खेळण्याऐवजी पुस्तक वाचू लागले. अंदमानात बंदी असलेले अनेक कैदी वेडे झाले आहेत किंवा मरणास शरण गेले आहेत. पण सावरकर तर मृत्यूंजय होते. त्यांना मरणाची भिती मुळीच नव्हती. पण मृत्यूने प्रश्न सुटत नाहीत, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. सावरकर सहज म्हणून जातात, “मरणाची चिंता मी कधीच केली नाही. म्हणून बहुदा मी इतका दीर्घकाल जगलो असेन.” अंदमानात जेव्हा त्यांना काथ्या कुटण्याचे काम दिले. तेव्हा ते निराश झाले नाहीत, उलटपक्षी त्यांच्यातला तत्वज्ञानी जागा होतो व “हे विश्व हीच काथ्याकुट” असा दिव्य विचार ते करतात. भयाण कारागृहात त्यांना कमला, विरहोच्छवास, गोमंतक अशी महाकाव्ये तर आकांक्षा, मरणोन्मुख शय्येवर, रविंद्रनाथांचे अभिनंदन अशी काव्ये स्फुरली आहेत. सावरकरांमध्ये अनेक गुण होते. ते राजकारणी होते, कवी होते, सशस्त्र क्रांतिकारक, लेखक, तत्वज्ञानी होते, इतिहास लिहिणारे होते आणि इतिहास घडवणारेही होते. “सावरकर म्हणजे एकाच शरीरात वसलेले विविध अवतार, असे गौरवोद्गार प्रख्यात वक्ते श्री. सच्चिदानंद शेवडे यांनी काढले आहे. २ मे १९२१ ह्या दिवशी सावरकरबंधूंना अलिपूरच्या कारागृहात नेण्यासाठी सेल्युलर जेलमधून बाहेर आणण्यात आले. पोलिसांच्या पहार्‍यातून सावरकर बंधू जात असता, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असतानाही, नुकतीच जमादारी मिळालेल्या कुशाबा पाटील या बंदिवानाने चाफ्यांच्या फुलांची माळ विनायक सावरकरांच्या गळ्यात घातली व त्यांच्या पायावर डोके ठेवून जयजयकार केला.” सावरकर अशा सत्कारास पात्र आहेत, नव्हे नव्हे ते तर साक्षात सत्कारमुर्ती आहेत. कारण ज्यावेळेस अंदमान स्वतंत्र झाले, त्यावेळेस अंदमानातील कैदी हे अंदमानचे प्रथम नागरिक झाले आहेत. हे सर्वच कैदी क्रांतिकारक नव्हते. तर त्यांच्यामध्ये खुनी, बलात्कारी सुद्धा होते. पण सावरकरांच्या संस्कारांनी त्या अमानुष कृत्य करणार्‍यांना माणूस बनवले.

स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या आयुष्याची आहुती देणार्‍या या मायभूमीच्या लाडक्या सुपुत्राला स्त्रीयांविषयी विशेष आदर होता. विवेकानंदांना जशी प्रत्येक स्त्रीमध्ये मां काली दिसायची तशीच सावरकरांना प्रत्येक स्त्रीमध्ये मातृभुमी दिसायची. समाजात पुरुषांप्रमाणे स्त्रीयांनाही समानतेने वागवले जावे अशी दृढ इच्छा सावरकरांची होती. परंतु निसर्गानेच स्त्री व पुरुष यांच्यात भेद केले आहेत, समानतेच्या कितीही गप्पा मरल्या तरीही गर्भधारणेचा अधिकार निसर्गाने केवळ स्त्रीयांनाच दिला आहे, याची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. सावरकरांची स्त्रीयांविषयी जी जाणीव होती ती अतिशय उच्च होती. ते म्हणतात ज्या वेळेस देशावर संकट येते त्यावेळेस स्त्रीने तिच्या पतीसमवेत किंवा पतीवाचून राष्ट्ररक्षणासाठी रणांगणात उतरले पाहिजे. त्यांच्या संन्यस्तखडग या नाटकातील सेनापती वल्लभाची तरुण पत्नी आपल्या पतीच्या पाठोपाठ पुरुष वेश धारण करुन रणांगणात उतरते. युद्धात तिच्या पतीस बंदी बनवले जाते व जर युद्ध थांबवले नाही तर पतीस मारुन टाकू अशी धमकी शत्रुपक्षातून दिली जाते. तेव्हा यौवनाने श्रीमंत असलेली ती भारतीय नाजूक बाला, पुरुषालाही लाजवेल असा पराक्रम करते व “आता शरण नव्हे रण, मारिता मारिता मरण” अशी गर्जना करते. सावरकरांची स्त्रीयांबद्दलची दृष्टी अगदी अशीच आहे. भारतीय स्त्री अबला नव्हे तर सबला आहे. म्हणून तिला आरक्षणाची गरज नाही, अशी सावरकरांची धारणा आहे. सावरकरांची हीच वेगळी बाजू आहे. ते केवळ क्रांतिकारक किंवा हिंदुसंघटक नाहीत तर समाजसेवक व समाज सुधारकही आहेत. पण त्यांच्या समाजोद्धारक कामांची जाणीव अनेक लोकांना झाली नाही. याची प्रमुख दोन कारणं आहेत, एक म्हणजे ते हिंदुत्ववादी होते व दुसरे म्हणजे ते जातीने ब्राह्मण होते. ही कारणं काही लोकांना पटणार नाहीत. परंतु सत्य हे कल्पनेपेक्षाही कटू असते, असो…

स्वतःला हिंदुसंघटक म्हणवून घेणे सावरकरांना अधिक प्रिय असले तरी प्रत्यक्षात सावरकर हे मानवतावादी होते. त्यांचे आचरण, त्यांचे बोलणे वैयक्तिक आयुष्यात अगदीच साधे होते. कवी मनाचे तर ते होतेच. हे इतकं असूनही ते क्रांतिकारक होते. सावरकरांनी केलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य पाहिले तर हा माणूस खरोखरच महात्मा किंवा महामानव आहे असे आपल्याला दिसून येईल. सावरकरांनी जवळजवळ ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी मुक्त केली आहेत. सावरकर म्हणतात, अस्पृश्यही अस्पृश्यता पाळतात. हे त्यांचे म्हणणे तंतोतंत खरे ठरणारा एक प्रसंग घडला. एकदा एका सभेमध्ये एक महार युवक आला व तो सावरकरांना म्हणाला, “तुम्ही अस्पृश्योद्धाराचे कार्य वगैरे करीत असता. तर तुम्ही माझ्या हातचं पाणी पिऊ शकता का?” सावरकर उत्तरले, “होय.. का नाही?.. जा पाणी घेऊन ये.” त्या युवकाने पाणी आणले व सावरकर ते सहज प्यायले. कारण ब्राह्मणाने दिलेले किंवा महाराने दिलेले, पाणी हे पाणी असतं आणि सावरकर ब्राह्मण व दलीत यांमध्ये भेदभाव करीतच नसत. त्यामुळे त्या महार युवकाच्या हातचे पाणी पिताना त्यांना काहीच वेगळे वाटले नाही. पण सावरकरांनी त्या महार युवकाला सांगितले की तु एका चांभार मुलाच्या हातचे पाणी पिऊ शकतोस का? त्यावर तो महार युवक म्हणाला, “नाही.. नाही.. मी त्याच्या हातचे पाणी पिणार नाही. कारण माझी जात उच्च आहे.” म्हणूनच सावरकर गंमतीने म्हणतात, “हिंदुंमधील शेवटची जात कोणती? हे कळतंच नाही. कारण प्रत्येक जातीला वाटतं की या अमूक अमूक जातीपेक्षा माझी जात उच्च.” सावरकरांचं हे अफाट कार्य पाहिलं तर आपल्याला असा प्रश्न पडतो की सावरकरांनी इतका त्याग का केला? या देशासाठी, या समाजासाठी ते इतके का झटले? तसं पाहिलं तर या देशाकडून, या समाजाकडून सावरकरांना काहिच मिळालं नाही. त्या महार युवकाने सावरकरांना पाणी पाजलं. परंतु त्यांची तृष्णा शांत झाली नाही. सावरकरांना नेमकी कशाची तहान लागली होती? पाण्याची? अहो.. प्रायोपवेशनाच्या वेळेस तर त्यांनी पाणी सुद्धा त्यागले होते. मग त्यांना नेमकी कशाची तहान लागली होती? त्यांना तहान लागली होती, ती म्हणजे देश उद्धाराची, समाज उद्धाराची. सावरकर देशप्रेमाच्या तृष्णेने व्याकूळ होते. जरी ते आज देहरुपात आपल्यात नाहीत. तरीही त्यांची तृष्णा अजूनही शांत झालेली नाही. कारण स्वराज्य मिळाले, परंतु सुराज्य अजूनही मिळालेले नाही. स्वातंत्र्य मिळाले, पण खंडित.. अखंड स्वातंत्र्य अजूनही मिळालेले नाही. ज्या दिवशी सिंधु सरिता मुक्त होईल, ज्या दिवशी हिंदुस्थानाकडे डोळे वर करुन बघण्याची कुणाची छाती होणार नाही. ज्या दिवशी जातीमधील, धर्मामधील, पंथांमधील भेद विसरुन आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र येऊ व सर्व बलाढ्य राष्ट्राच्या नाकावर टिच्चून खर्‍या अर्थाने महासत्ता होऊ. त्या दिवशी तहानलेले सावरकर शांत होतील. आज सावरकर आपल्यात नाही. परंतु त्यांच्या विचारांच्या किरणशलाकांनी आजही आपले मन दिपून जाते. याच त्यांच्या विचारांच्या किरणशलाकांनी आपण सबंध विश्व दिपून टाकू. हे काम अतिशय अवघड आहे… हे एक व्रत आहे. पण हे व्रत आपण घेऊ, कितीही कठीण प्रसंग आले तरी सिद्धिस नेऊ. सावरकरांच्याच शब्दात सांगायचे तर, कि घेतले व्रत न आम्ही हे अंधतेने, लब्ध-प्रकाश – इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे, बुद्धयाचि वाण धरिले, करि हे सतीचे.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री.

— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..