शरीराचं तापमान वाढतं ते या यंत्रणेला विविध मार्गांनी संदेश मिळतात म्हणून. जंतूजन्य आजारात शरीरात जंतूंच्या अस्तित्वामुळं आणि लढाईमुळं जे काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे या संस्थेला तापमान वाढवण्याचे संदेश मिळतात व तपमान वाढवलं जाते.
या वाढवलेल्या तापमान जंतूंच्या शरीरातल्या अनेक रासायनिक क्रिया बंद पडतात व त्याचा परिणाम म्हणून ते अर्धमेले होतात किंवा वाढू शकत नाहीत.
यासाठी शरीराला येणारा ताप हा उपयुक्तच समजला पाहिजे. मात्र हे तापमान असंच वाढत गेलं तर आपल्याच शरीराला त्याचा त्रास होऊ लागतो आणि कधी कधी मेंदूला हे तापमान सहन न झाल्यानं झटके येतात. यालाच ‘तापातले झटके’ असे म्हणतात. काही मुलांमध्ये एखाद्या आजारात पटकन् ताप वाढण्याची ठेवण असते तर काही मुलांची तापमान योग्य राखण्याची यंत्रणा चांगली काम करत रहाते, म्हणून ताप वाढत नाही. दोन्ही गोष्टी फारशा चांगल्या नाहीत. पहिल्या बाबतीत मुलाला तापाचा प्रत्यक्ष त्रास होतो. तर दुसऱ्यात, आजार नक्की कोणता हे चटकन् समजून न आल्यानं त्याचा अप्रत्यक्षपणे त्रासच होतो. म्हणूनच माफक प्रमाणात ताप येणं दोन्ही दृष्टीनं चांगलं असतं असं समजायला हरकत नाही. तापाच्या तीव्रतेवर आजाराची तिव्रता ठरत नसते. मला खूप रडल्यानं ताप येतो ही चूकीची समजूत आहे. बाळ ताप आल्यामुळं खूप रडतं आणि नंतर ते आपल्या लक्षात येतं.
ताप हा आपल्या शरीराचा मित्रच आहे.
ताप हे अनेक आजारांचं प्राथमिक लक्षण असतं. याउलट कितीतरी गंभीर आजारांत ताप फार चढलेला दिसत नाही, तरीही ते प्राणघातक असू शकतात. मात्र जास्त ताप चढलेलं मूल ताप असतांना तरी जास्त गंभीर रीतीनं आजारी असल्यासारखं दिसतं. म्हणून आजाराचं खरं स्वरूप मुलाचा ताप उतरवल्यानंतरच पहावं.
ताप येणा-या मुलाचा हा ताप कशामुळं येतोय हे शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या प्रत्येक अवयव संस्थेचं काम व्यवस्थित होतंय ना हे पहावं. तसंच तापाच्या जोडीला काही अवयव किंवा संस्थेच्या बिघाडाची लक्षणं दिसताहेत का हे पहावं. उदा. सर्दी खोकला – श्वास मार्ग, फुफ्फुसं यांचा बिघाड दाखवतात. तर उलटी जुलाब पोट, आतडी लिव्हर यांच्यातला बिघाड सुचवतात आणि लघवीचा त्रास मुत्रमार्गाचा बिघाड. बाळाचा दैनंदिन कार्यक्रम कसा आहे त्यावरून म्हणजे, त्याचं खाणं, पिणं, शू चं प्रमाण, उलटी इ. गोष्टींवरूनही आजाराचा गंभीरपणा दिसतो.
ताप कसा मोजावा?
हातानं कपाळ किंवा पोटाचं तापमान पाहणं हे अगदी प्राथमिक तपासणं झालं. पण याने आपण तापाचा एक साधा अंदाज मांडू शकतो. ताप खरं तर शरीराच्या आतल्या भागातला मोजायला हवा. शी च्या जागी थर्मामीटर घालून किंवा तोंडात जिभेखाली धरून. मुलं खूप कपडयात गुंडाळल्यानं गरम लागतात, तर उघडी ठेवल्यास गार पडलेली असतात म्हणून आतून तपमान मोजणंच योग्य.
जी मुलं थर्मामीटर चावण्याची शक्यता असते त्यांच्यात शक्यतो शीच्या जागेचं तापमान मोजावं. सर्वच मुलांचा ताप अशा तऱ्हेने मोजायची जरूरी नाही पण वरून ताप लागत नाही तरीही मूल मलूल वाटतंय अशी अवस्था असेल तर मुलाला ताप आहे की नाही हे नक्की करण्यासाठी असा ताप पहाणं आवश्यक आहे. इतर वेळी काखेत घाम नसल्यास काखेतलं किंवा मोठया मुलांचं काही गार किंवा गरम न खाता पिता तोंडातलं तापमान मोजावं. थर्मामीटर १ पूर्ण मिनिट जागेवर धरून ठेवावा लागतो. तो त्वचेला निट लागून राहिला नाही तर तापमान नोंदीत चूक होते आणि १ पूर्ण मिनिट मुलांच्या काखेत थर्मामीटर धरून ठेवणं अवघड जातं म्हणून मुलांचा ताप मोजणं अवघड वाटतं. म्हणून मुलांचा ताप मोजणं हे कौशल्याचं काम आहे.
त्वचेपेक्षा काखेतलं आणि काखेपेक्षा आतल्या भागाचं तापमान १-१ डिग्रीनं जास्त असतं.
तापातले झटके:
मेंदूला एकदम वाढणारा जास्त ताप सहन न झाल्यानं झटके येतात. पूढे हळू हळू मेंदू जस जसा वाढतो तसतशी त्यात हे तपमानाचे बदल पचवायची शक्ती येऊन मग असे तापातले झटके येणं बंद होतं. हे झटके येण्याचं नेहमीचं वय म्हणजे ६ महिन्यापासून ते ६ वर्षांपर्यंत. एखाद्या कुटुंबांत हे प्रमाण अनुवंशिकही दिसतं या झटक्यांनंतर मुलाला मोठेपणी फिटस् किंवा एपिलेप्सी असा आजार राहू शकेल का, याची काळजी पालकांना लागलेली असते. मुलाला फक्त तापातच झटके आले असतील आणि घरात फिटस् मुळं त्याच्या बुध्दीवर किंवा वाढीवर कोणताच विपरित परिणाम होणार नसतो हे समजावून घेतलं तर आई वडिलांच्या मनातली भीती आणि काळजी आपोआप कमी होईल.
मुलाला तापात झटका आला तर काय करावं?
सर्वप्रथम त्याला सुरक्षित ठिकाणी निजवून शरीराला इजा होत नाही ना बघवं. लाळ येत असेल तर पुसावी. थोडयाच सेकंदात किंवा मिनिटात झटका थांबतो. त्याची वाट पहावी. झटका थांबत असतांना श्वास नीट होतोय ना हे पहावं. मूल काळं निळं पडलं असेल तर आता रंग झपाटयानं बदलून गुलाबी होतोय ना हे पहावं. शुध्दीवर येतोय ना, हे पहावं, आणि मग अंग पाण्यानं पुसत ताप उररवायला सुरूवात करावी.
थोडयाच वेळात मूल हालचाल करू लागतं. कण्हू लागतं किंवा रडू लागतं. हीच तो शुध्दीवर येत असल्याची खूण आहे. अशावेळी त्याला चिमटा काढला तर ते दुखल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, म्हणजेच त्याला आता समजू लागलंय असं आपल्याला समजतं. हा वेळ मोजायचा प्रयत्न करावा. या सर्वाची नीट नोंद घेऊन सर्व अचूक माहिती डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न करावा. या माहितीचा डॉक्टरांना उपचारांसाठी उपयोग होतो.
अशा मुलांना ताप न उतरवल्यास पुन्हा झटका येण्याची शक्यता असते. म्हणून ताप औषधांनी, इंजेक्शननी , अंग पुसून कसाही पण जलद उतरवावा. स्पजिंग करतांना शरीराचा जेवढा भाग मिळेल तितका कोमट काटामोड पाण्यानं पुसून आपोआप कोरडा होवून द्यावा. त्यामुळं शरीरातील उष्णता हे पाणी वाळवायला वापरली गेल्यानं तपमान उतरायला मदत होते.
ताप उतरवण्यासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. कोमट पाणी वापरावे.
या कामासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. त्याचा उपयोग कमी होतो आणि त्याचा त्रास झाल्यानं मूलही पुसू देत नाही. तसंच नुसत्या कपाळावर घडया ठेवण्यापेक्षा सर्व अंगाचा पृष्ठभाग वापरला तर ताप झटकन् उतरतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुसत रहाण्याचं काम १५ ते २० मिनिटं केलं म्हणजेच ताप उतरतो. म्हणून एकदा पुसून थांबू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply