नवीन लेखन...

तिमिरातुनी तेजाकडे – डॉ. नरेंद्र दाभोळकर

एखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते. पण बघता बघता ते गट अनंतात विरून गेले आणि स्वयंसेवी संस्थांची संस्थानं बनली. पुढे १९९१मध्ये भारतानं जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यावर तर चंगळवाद हीच संस्कृती बनली आणि मग लोकशिक्षण, समाजजागृती यासाठी काम करणारे गट वा संघटना अगदी अपवादानेच पाहायला मिळू लागल्या. पण या अशा काळातही तिमिरात काम करणारा एक तारा होताच! कोणाला खरं वाटो न वाटो, गेली २८ वर्षं हा तारा आपल्या ध्येयासाठी काम करत आहे. वाटेत कितीही वादळं आली, तरी या तार्‍यानं आपली वाट सोडली नाही.

खरं तर त्यानं हाती घेतलेला विषयच लोकांच्या भावनांना हात घालणारा. एका परीनं त्यांच्या भावना दुखावणारच खरा तो विषय. आपल्या समाजात वर्षानुवर्ष रुजलेल्या प्रथा आणि परंपरा यांचा अवमान करणारा, असा तो विषय. तो थेट तुमच्या श्रद्धांना भिडणारा. हा कोण अगांतुक येऊन आमच्या श्रद्धा दुखावू पाहतोय, असा सवाल समोरच्याच्या मनात उभा करणारा. त्यामुळे त्याच्या विरोधात जनमत निर्माण व्हायला वेळ लागणं शक्यच नव्हतं. पण ही लढाई अंधश्रद्धा विरुद्ध बुद्धिप्रामाण्यवाद अशी होती आणि त्या लढाईत विजय मिळवण्यासाठी फार मोठा पेशन्स अंगी असणे जरुरीचे होतेच शिवाय लोकांकडून होणारी टवाळी, कुचेष्टा, प्रसंगी मारहाण अशा गोष्टींना सामोरे जाण्याचे धैर्यही आवश्यक होते. त्याचबरोबर आणखीही एक महत्त्वाची गोष्ट होती. आपल्या या कथानायकानं हे काम १९८०च्या दशकाच्या आरंभी हाती घेतलं, त्यानंतरच्या द न-पाच वर्षांतच आपल्या देशात धार्मिक राजकारणांनं मूळ धरलं. हिंदुत्ववादाला जोमानं खतपाणी घातलं जाऊ लागलं. त्यास बर्‍यापैकी प्रतिसादही मिळू लागला. अशा परिस्थितीत धार्मिक अंधश्रद्धांच्या विरोधात समाजात जाहीर भूमिका घेणं, ही सामान्य बाब नव्हती. पण हे सारी तपश्चर्या केल्यामुळेच आज हा कथानायक खर्‍या अर्थानं लढवय्या ‘हीरो’ ठरला आहे. हा साठी ओलांडल्यावरही मनानंच नव्हे तर शरीरानंही तरुण राहिलेला ‘हीरो’ आहे, डॉ. नरेंद्र दाभोळकर!

दाभोळकरही एकोणीसशे सत्तरच्या त्याच अस्वस्थ दशकातले एक चळवळे कार्यकर्ते होते. पुढे १९८०चं दशक उजाडलं आणि त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या एकाच विषयाला स्वत:ला बांधून घेतलं. पुढे १९८२मध्ये ते या चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले आणि त्यातूनच १९८९मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना डॉक्टरांच्याच पुढाकाराने झाली. या सार्‍या काळात डॉक्टरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना महाराष्ट्रातील गाव अन गाव पिंजून काढला. हजारो व्याख्यानं दिली. शेकडो शिबिरं घेतली. तितक्याच संख्येनं बुवाबाजी करणार्‍यांविरोधात वाद ओढवून घेतले आणि त्यांना समर्थपणे उत्तरंही दिली. असंख्य लेख आणि डझनभर पुस्तकं लिहिली. त्यानंतर आपल्या २८ वर्षांचं हे सारं संचित घेऊन त्यांचा एक ग्रंथ आला आहे. त्याचं नाव ‘तिमिरातुनी तेजाकडे’ असं असलं, तरी त्याचं उपशीर्षक डॉ. दाभोळकर यांचा या लेखनामागील हेतू विशद करतो. ते आहे : ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे’. त्यातूनच त्यांना काय म्हणावयाचे आहे, ते स्पष्ट होते.

डझनभर पुस्तकं लिहिल्यानंतर आणि हजारो व्याख्यानं दिल्यावरही पुन्हा याच विषयावर एक मोठा ग्रंथ का लिहावासा वाटला, ते दाभोळकर यांनी या ग्रंथाच्या मनोगतात स्पष्ट केलं आहे. ‘या चळवळीकडे अभ्यासू वृत्तीने वा जिज्ञासूपणे पाहणार्‍या व ्यक्तींना विषयाची एकसंध सम्यक मागणी उपलब्ध नव्हती,’ असं ते म्हणतात. गंथाच्या तीन विभागात या विषयाला स्पर्श करणारे बहुतेक सर्व मुद्दे आणि आक्षेप यांचा समावेश डॉक्टरांनी केला आहे. पहिला विभाग अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित थेट बाबींचा तपशील देणारा आहे. तर दुसर्‍या विभागात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने या संदर्भात दिलेल्या कृतिशील लढायांच्या आठवणी जागवणारा आहे. तिसरा विभाग हा सैद्धांतिक आहे. ४७० पानांचं हे पुस्तक नुसतं हातात घेतलं, तरी दाभोळकर यांनी या संदर्भात किती मोठं काम केलं आहे, ते ध्यानात येतं. समज-गैरसमज, प्रथा-परंपरा आणि रुढी यांच्या बेडय़ा तोडून अनवट वाटेनं जाणं, हे सोपं काम कधीच नसतं. दाभोळकरांनाही हे पक्कं ठाऊक आहे. त्यातून पुढे जाण्यासाठी सारासार विचार करावा लागतो. हा सारासार विचार म्हणजेच ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ असं ते म्हणतात. एकदा हा दृष्टिकोन अंगी बाणवला की मनुष्य आपोआप निर्भय तर बनतोच शिवाय दैववाद, अगतिकता यापासूनही त्यास दूर नेते. या वाटेनं प्रवास एकदा सुरू झाला की मग श्रद्धा आणि अधश्रद्धा यांच्या लढाईत माणूस नेमक्या वाटेनं जाणार, हे उघडच आहे.

दाभोळकर स्वत: या वाटेनं तर गेलेच पण जाताना त्यांनी अनेकांना सोबत घेऊन त्यांना तिमिरातून तेजाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. तुम्हालाही या वाटेनं जायचं असेल, तर त्यासाठी डॉ. दाभोळकर यांचा हा ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा.

प्रकाश अकोलकर
(महान्यूजच्या सौजन्याने)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..