शैलेशचा दुपारी 11 वाजता फोन आला,’राजनची बायको गेली. लगेच नीघ.ठ मी सुन्न झालो. राजनची बायको असाध्य रोगाने आजारी होती. शेवटच्या स्टेजला होती. ही बातमी अपेक्षित होती. सुन्न झालो कारण, राजनचा मुलगा लहान आहे. सचिन आहे इयत्ता दुसरीत. तो हे कसं काय स्वीकारेल? आता त्याची अवस्था कशी असेल? सचिनची आणि माझी चांगलीच मैत्री आहे. त्याची आई हॉस्पिटलमधे असताना समोरच्या बागेत आम्ही दोघं तासनतास खेळायचो. कधी-कधी बागेत बसूनच अभ्यास करायचो.
हॉस्पिटलच्या वातावरणाचा त्याच्या मनावर बराच परिणाम झाला होता. कारण त्याचे हट्ट वेगळेच असत. उदा. ‘आज मला आजारी मुलाची गोष्ट सांग, आपल्या गोष्टीत एकतरी डॉक्टर पाहिजेच, हॉस्पिटल मधून गुपचूप पळून जणाऱ्या मुलाची गोष्ट तयार करुया.’
किंवा तो कधी-कधी असे काही प्रश्न असा विचारी की त्याचे उत्तर देणेच शक्य नाही. उदा. ‘आपण ना नवीन शहर बांधूया. तिथे हॉस्पिटलच नको. म्हणजे मग कुणी आजारीच पडणार नाही. हो ना?’ किंवा ‘आजारी माणसांना इतकी औषधं देतात, इंजेक्शन देतात, गॅस देतात तरीपण ती आजारीच का असतात?’ अशा प्रश्नांनंतर मी खिाशातला पांढरा रुमाल काढून हवेत फडकवायचो आणि म्हणायचो,’सॉरी. हा प्रश्न फारच कठीण आहे रे सचिन. मला नाही माहित!
राजनच्या घरी जाताना माझ्या पोटात बाकबुक होत होतं. आता गेल्या गेल्या सचिन मला कुठले प्रश्न विचारेल? कुठला हट्ट करेल?त्याची समजूत कशी काढायची? त्याला काय सांगायचं? की त्याला आधीच सारं समजलं असेल..? आता काय होईल या कल्पनेनेच माझ्या पायातलं बळ जाऊ लागलं. तळपाय घामाने भिजले.
मी राजनच्या घरी पोहोचलो तेव्हा काही माणसं जमली होती. मी सचिनला शोधत होतो. तो मला कुठेच दिसला
नाही. इतक्यात राजनची आई आली. मला जवळ घेत म्हणाली,’अजून
सचिनला कळलं नाहीए. त्याला कसं सांगायचं हेच आम्हाला कळत नाहीए. हे ऐकल्यावर त्याची रिअॅक्शन काय असेल याचाही अंदाज आम्हाला येत नाहीए. खरं सांगू का, या आजारपणाच्या युध्दात सचिनकडे लक्ष द्यायला आम्हाला फारसा वेळच मिळाला नाही. तुझी आणि त्याची चांगलि दोस्ती आहे. तूच सांग त्याला. जरा ही वेळ सांभाळून घे. मी काही बोलूच शकलो नाही. डोळ्यातून पाणी घळघळा वाहू लागलं.
सचिन सोसायटीतल्या आवारात मित्रांबरोबर काहीबाही खेळत होता. त्याला हाक मारण्याची हिंमतच होईना. आवाजच फुटेना तोंडातून. मी कसाबसा पाय ओढत त्याच्यापर्यंत गेलो. सचिनला बाजूला घेतलं. त्याला जवळ घेत बोलण्यासाठी उसनं अवसान आणलं. त्याच्या अंगावरून, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. हा माझा प्रेमाचा पूर पाहून तो माझ्याकडे साशंक होऊन पाहू लागला.
“आता यानंतर तुला तुझी आई कधीच भेटणार नाही..”“का? ती नाही भेटली तर मी तिला जाऊन भेटीन. हाो ना?”डोळ्यातलं पाणी थोपवत त्याला हळू हळू स्पष्ट कल्पना दिली.एक क्षण पूर्ण शांततेत गेला.
मग ज्वालामुखीचा स्फोट व्हावा तसा माझ्या अंगावर उसळून येत तो म्हणाला,’माझीच फक्त आई का गेली? या माझ्या मित्रांची का नाही? ते पण माझ्यासारखेच आहेत ना? मग थेट माझ्या डोळ्यात रोखून पाहात त्याने विचारलं,’मी इतका लहान असताना माझी आई गेली. आणि काका, तू इतका मोठा आहेस तरी, तुझी आई का नाही गेली? सांग ना..? मी काय वेगळा आहे का सर्वांपेक्षा?..सांग ना.. काका..?
मी यावर काहीच बोलू शकलो नाही. डोळे पुसण्यासाठी मी खिशातून रुमाल काढला. सचिनने माझ्या हातातून माझा पांढरा रुमाल हिसकावून घेतला. चोळामोळा करुन दूर फेकून दिला. त्याने अनावर होऊन मला एक जोरात धडक मारली. मी त्याला घट्ट मिठी मारली. तो शांत होऊ लागला. हळूहळू सारं पचवू लागला.
त्याचा आवेग ओसरल्यावर माझ्याकडे पाहात तो स्वच्छं हसला. हा कोरड्या डोळ्याचा सचिन मला वेगळाच वाटला! त्याने माझा हात सोडला. आजी जवळ गेला. आजीने त्याला झटक्यात जवळ घेतलं. पण काहीशा अनिच्छेनेच तो आजीच कुशीत शिरला.
सचिनच्या कुठल्याही प्रशाचं उत्तर त्याला मिळालं नसलं तरी ही तो इतर मोठ्या माणसांच्या आधी सावरला होता. इतक्या लहान वयात हे शहाणपण कुठून येतं? की परिस्थितीच बदलवून टाकते या मुलांना? मला काहि कळत नव्हतं.
महिन्याभरातच राजनची औरंगाबादला बदली झाली. त्यावेळी सचिनला भेटलो. हे सात वर्षाचं पोर एखाद्या विशीतल्या मुलासारखं वागत होतं. तो जूना खेळकर सचिन हरवलाच की काय? असं वाटलं मला त्यावेळी. त्यानंतर माझी त्याचि प्रत्यक्ष भेट काही झाली नाही. कधीतरी फोनवर बोलणं व्हायचं.
आज या गोष्टीला खूप वर्ष होऊन गेली.परवा अचानक सचिन घरी आला. मी तर त्याला प्रथम ओळखलंच नाही. सचिन नुकताच इंजिनीअर झालाय. कामासाठी इथे आला होता, म्हणून भेटायला आला.’काका मी जेव्हा माझ्या औरंगाबादच्या मित्रांना सांगितलं ना की मी बागेत अभ्यास करायचो. झाडांभोवती फेर्या मारत कविता पाठ करायचो. तर यावर कुणी विश्वासच ठेवेना. आपण खूप मज्जा केलि ना त्यावेळी? सचिनच्या या प्रश्नाने माझी जरा गोचीच झाली. मी काहीच बोललो नाही.
पुन्हा भूतकाळ चाळवत तो म्हणाला, ‘आणि, त्या हॉस्पिटल मधून पळून जाणार्या मुलाचि गोष्ट आठवते का तुला? तो आधी सगळ्या डॉक्टरांनाच टचाटच इंजेक्शनं देतो आणि मगच पळून जातो.
मला तो भूतकाळ आठवणं नकोसं होत होतं.इतक्यात तो विषय निघालाच. ‘काका मला तो तीन जानेवारीचा दिवससुध्दा स्पष्ट आठवतो. सचिन बोलायचा क्षणभर थांबला. मला त्याच्याकडे बघणं ही त्रासदायक वाटू लागलं. कससंच भरून आलं. ‘मी इतरांपेक्षा वेगळा आहे, काका. खरंच वेगळा आहे. आज ही मला ते जाणवतं. कसा वेगळा आहे ते मला नाही सांगता येणार..आणि तुलाही नाही सांगता येणार! काका तू पांढरा रुमाल फडकवशील..पण मी नाही!
कारण मला सांगता नाही आलं तरी मला कळलंय माझं वेगळेपण..!!ठ सचिनच्या या बोलण्यावर मी डोळे पुसायला रुमाल काढला.मला थोपटत सचिन म्हणला,’काका, टेक इट लाइटली. अरे खूप दिवसापसून तुला हे सांगायचं होतं. लहानपणीच अवचित भेटलेला हा प्रश्न माझी अजून साथ करतोय बघ.मी नेटाने दुसरीकडे विषय वळवला. छान गप्पा झाल्या.खरं सांगतो, तो प्रश्न आता माझी साथ करतोय.
— राजीव तांबे
Leave a Reply