नवीन लेखन...

तो‘ येतोय्… छे… ‘तो‘ आलाय्….

 

तो‘ येतोय्… छे… ‘तो‘ आलाय्….

जेथे जातो तेथे‘ हे सदर आज जरा वेगळ्या शैलीत साकारले आहे. पावसाचे स्वागत करणारे हे प्रसन्न ललित…*

म्हणूनच त्याला वेगळं स्थान!

पुन्हा एकदा ‘तो‘ आलाय्! आपल्या सर्व सावळ्या लहरी विभ्रमांनी पागल करीत ‘तो‘ अगदी दारात उभा आहे. पुन्हा एकदा दडवून ठेवलेल्या वेडेपणाला पंख फुटलेत. त्या पंखावरून वयाचं प्रौढपण दूर नेलंय्- न् तिथं विशीची वादळं रुजत घातलीयत्. पुन्हा एकदा तळव्यांतून थरथरणारी भिगरी थेट भिगरत भिगरत मस्तकात भिरभिरू लागलेय. आता हे असं वेडं होणं बरं नाही- असं मनातली आजीबाई नाकावर बोट ठेवून सांगतेयही! पुन्हा एकदा बाहेरच्या चाहुलींनी थरारून जात आतली गाणी जागी झालीत. ‘लागे करजवाँ‘ची कटार या क्षणी पुन्हा व्याकुळ करतेय्. काचबंद कपाटात थबकून राहिलेल्या, श्वासच असलेल्या कवितांनी पुन्हा एकदा काच दूर करीत साद घातलेय! हे अप्रूप घडतंय खरं… कारण… ‘तो‘ येतोय्… छे… ‘तो‘ आलाय्!*

स्पंदनांच्या पायघड्यांनी त्याचं स्वागत जन्मोजन्मी मांडलंय्. तेवढंच तर आपल्या हातात. बोलणारे ओठ आपले, पण शब्द कुणा निराळ्याचेच. लिहिता हात आपला, पण प्रगटणारं मंथन अनामिकाचं देणं! पण स्पंदन? ते माझं- तेवढंच माझं. मनाला बजावलं जाते- ‘आता तुझ्या हिरवेपणाला राखाडी कुंचला लावून निसर्ग पाठमोरा झालाय्. आता अशी नाचण्याची, खळाळून हसण्याची ऊर्मी आली, तरी जे वाटतं ते करायचं नाही! शहाण्या समजल्या जाणार्‍या माणसानं असं वेडेपण जाहीर करायचं नाही.‘ असं कितीदा सुनावलं अंतर्मनाला. पण हे वढाय मन बेटं खोडकरच. असीम निळाई सावळ्या डोहात डुबकी मारून चराचराला गुदगुल्या करू लागली की ते असं वेल्हाळ होतंच. हरवलेलं वेडेपण गळ्याला मिठी मारू लागतं. का?- उत्तर नाहीच. पण असलंच तर- ‘तो‘ येतोय! आपल्या दहा मत्त अश्वांच्या रथांतून…

धुळीचे अत्तर, वाटेतल्या प्रत्येक ची राधिका करीत तो घनश्यामल अगदी… अगदी दारात आलाय…

‘तो‘ पूर्वीही अनेकदा आला होता.

आयुष्याचा प्रत्येक तरल अंकुर केवळ त्याच्या साक्षीनं तरारलाय. आठवणींच्या आंबट-तुरट चिचा-कैर्‍यांची खट्टीमिट्टी भुलावण आज ‘येडपट‘ वाटत असेल, पण तेव्हा… डोळे पुस्तकात, पण दृष्टी तिच्या येण्यात गुंतली असण्याच्या वयात. पानं बोटांनी पुढे जायची, पण अक्षरांवर मन काही जडायचं नाही- अशा हुरहुरीत-

पुस्तकातली खूण कराया

दिले एकदा पीस पांढरे

पिसाहुनी सुकुमार काहिसे

देता घेता त्यात थरारे!

अशी इंदिरा संतांची जीवलग अनुभूती घोळवीत वाट पाहतानाही तो बरसला होता- आसवांतून. ‘कृ

तू असताना मला वाटते*

श्वासांनी भोगावी माती;*

डोळ्यांच्या होडीत बसुनिया*

दोन भावल्या भटकत जाती*

असं भटकताना पत्र्याची जाळीदार टपरी लक्षचंद्रांकित व्हायची. ‘तो चहा गुलाबी- चर्चा खळखळणारी. तो पिवळा रस्ता- थट्टा आवडणारी फुलून यायची. तरीही संकोचाचं धूसर धुकं असायचंच. ‘एक विचारू?…‘ ‘एक विचारू?‘ असले प्रश्न असायचेच. निघताना ‘पुन्हा कधी?‘ची सलामी नजरेत दिसायचीच. वाट घड्याळाचं बोट धरून रीतीरिवाजांच्या तिन्हीसांजेला भिडायची आणि पुन्हा इंदिरा संतांच्या शब्दांत-*

‘कितीक आहे बोलायाचे*

काय अता ते उगा बोलणे*

वाक्याच्या सनईत कधी का*

घुमेल अपुल्यामधले गाणे‘*

या जाणिवेत ती रंगबावरी मिटून जायची. निघण्याच्या टोकावरच- पुन्हा भेटण्याच्या आर्ततेचा थेंब पापणीत उभा असायचा… तेव्हाही ‘तो‘ असाच आसमंतात असायचा… पण बरसायचा नाही.*

कुठली साधी गोष्टही त्यावेळी उत्कट वाटायची. ‘त्याच्या‘ चाहुलीतच तशी ऊर्जा होती. आंब्याच्या वासाने घमघमलेली रसाळ सुट्टी अनुभवल्यानंतर शाळेचा घंटाघात कल्पनेतही नको असायचा. पण तशातच ‘तो‘ यायचा- नव्या इयत्तेच्या नव्या पुस्तकाच्या कोर्‍या करकरी त वासातून. नव्या दप्तरातून नवी पुस्तकं घरात आली की, आधी त्यांचा जीव भरून वास घ्यायचं वेडच लागलेलं. तशात ‘तो‘ टपटपायचा आणि ‘थेंब होऊनि मुठीत आले आभाळातील तारे‘ हा आनंद चिब करायचा. ‘झाकळले नभ, सोसाट्याचा वारा‘ चेहर्‍यावर झेलताना दिवस केव्हा ‘श्रावणमासी‘ला भिडायचे, कळत नसे. नव्या ढगांचं बोट धरून नव्या वर्गात बसताना थोडं उंच झाल्यासारखं वाटायचं. खिडकीचा आग्रह असायचा. कारण तिरप्या पावलांनी थेट आत बरसणारं आभाळाचं पुस्तक परीक्षेच्या पुस्तकांहून ओलसर वाटायचं. घरपरतीच्या वाटेवर लाल मातीची चिखलपावलं तळव्यांना बिलगली की वाटायचं, घर येऊच नये. केव्हातरी ‘त्यानं‘च बालपणाची कोवळीक शिपल्यात बंद केली आणि कधीच हाती न येण्यासाठी तो शिपला समुद्रात भिरकावून दिला.*

मग उन्मादाच्या शुभ्र अश्वावर बसून पुन्हा एकदा तो नव्या विजांसह, नव्या वादळासह झिणझिणला. त्याच्याच सोबतीनं सहलीच्या वाटा घसरताना सावरल्या. वाटा कशा आडवाटा होतात… फसवतात, एरवी रम्य असलेली झाडं जीव गुदमरून टाकणार्‍या शांततेत कसा धाक घालतात, शतकांची साक्ष असलेल्या वडाच्या खोडातून सुसाट सुटलेल्या फांद्या आणि जमीन उकरणारी पारब्यांची बोटं पाहून छाती कशी धडकते, दिवसाच्या काळोखात एखादा अर्धमिट काजवाही कसा मन अंधारून टाकतो ते कळलं- त्याच्याच गडगडाटी साक्षीनं! त्या वाट चुकलेल्या सहलीतच कळलं- ‘सोबत‘ या शब्दातील स्पर्शाचे आक्रंदन! पुढे दाट दाट होणारा काळोख. त्यातून खिकाळत आलेल्या घोड्यांच्या रानभरी टापा. जंगलात थयाथया तांडव करणारा ‘तो‘! वाटलं, मरणाची पाऊलवाट ती हीच. आता कुठे हरवलो, तेही घरीदारी कळणार नाही-असा चकवा. तेव्हा कोसळणार्‍या ‘त्याचा‘ आवेग सोसताना पार मोडलो असेन, पण त्या छळातली ती मस्ती आयुष्यभर धुंदी होऊन भिनत राहिली! कोकणातल्या अस्पर्शित डोंगरवाटांवर ‘तो‘ असाच सोबत करीत रा हिला. अनोळखी धुक्यानं प्रत्येक पाऊल घसरणीवर ठेवलेलं असायचं. खाली उतरलेल्या ओघळढगात वावरताना स्वतःही स्वतःला दिसत नसू, अशा वेळी एखादा निखारा फुलायचा. ठिणग्यांचा शोध घेत मोक्यावर थबकलेला

मकेवाला गाठायचो. दाणे संपून गेल्यावरही लिबू-मिठानं खारं आंबूस झालेलं रितं कणीसही आयुष्याला चव द्यायचं. एकालाच ऐकू येईल अशा आवाजात कुणीतरी पुटपुटायचं ‘सरळसोट रस्त्यानं काय जायचं? दरीतून चालू या की. घाबरतोस? अरे, त्या बघ आमच्याकडच्या गाई-म्हशीही दरी उतरतात- चढतात.‘ हसण्याला टपलीची टिचकी. अडखळण्याला दुरून सावरण्याचा आधार. खोल खोल जाताना ‘उगीच आलो!‘ हे मनातलं पालुपद. मध्येच हिरव्या गवतातील हिरवी नागमोडी पट्ट्या-पट्ट्यांची सळसळ. अंगावर काटा. ते मुत्त* सौंदर्य दचकून दूर ठेवत
क्षणभर विसावलेलो. मग पाऊलवाटेनेच दिलेला गोजिरवाणा अर्धविराम. ‘चार घरांचे गाव चिमुकले‘ ढुंढीत निघालेला बालकवींचा ‘निळा सावळा झरा‘ तृप्त तृप्त करणारा. आता ‘झाडामाडांवर सोन्याचं उन्ह‘ गात येणारा एखादाच किरण. ‘नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फुलराणी सुंदर‘ अशा मीलनाचे आपण साक्षीदार!*

असा सर्वांगाने बोलणारा तो धुवांधार, तर कधी अबोलपणेही पाळत ठेवणारा. पाठलाग करणारा. आपल्या सैरभैर उलघालीची मजा घेणारा. छळवादी. त्या छळातला सुखानंद आज तीव्रतेने जाणवतोय. रस्ते तेच, रस्त्यातले गुंतवणारे विराम, अर्धविराम तेच; पण आता रेंगाळावंसं वाटत नाही. नात्यांच्या आडोशानं त्याचं सैराटपण साचेबंद झालं. आता त्याला कानतुटक्या कपातल्या चहाची लज्जत मोहवत नाही. व्यवसायाची उंची ताजच्या पायर्‍यांकडे नेते. पोषाखीपणात हरवलेल्या उंचीला मळ्यातल्या हुरड्याचा गावरानपणा मानवत नाही. काय चुकतंय, तेच कळत नाही. पावलांचंही चालताना सावध प्रौढपण. वयानं लादलेली दुखण्यांची ओझी. आता त्याच्या आगमनासाठी छत्रीची पंचारत . सारं आयुष्यच रेनकोट! शहरातल्या लोकलमधून धावताना त्याच्यावर आपण खेकसतोही- ‘सगळा खोळंबा केला, लवकर जाईल तर बरं!‘ तेव्हा त्याचं अबोलपण ऐकण्यासाठी मनाचेच कान व्हायचे. आता तो कुणासाठी ते तसं बोलत असेल? फत्त* एक ऊबदार घट्ट हस्तांदोलनाने. पुन्हा ‘तो‘ भरून आलाय! सर्व दिशांनी. पुन्हा हुरहुरीच्या बियांनी टरफलं दूर सारून सृजनाचा साक्षात्कार घडवलाय! चेतनेला पंख दिलेत; उदासीनांना जागेपणाचा मंत्र देत ‘तो‘ आलाय!- अगदी दारात!*

तो फत्त* बरसत राहावा आणि जीवलग सुरांनी आयुष्य गच्च भरून जावं. ‘रसिक बलमां‘ साद ऐको- न ऐको, आपण आपल्या प्रीतीचं पात्र प्रतीक्षेनेच पूर्ण भरून टाकावं. मदनभैयाच्या गझलेचं मधाळ रत्नखंजीर ‘पाठीतुनी जंबिया मधाचा‘ काळजात घालीत राहावं. आपल्या प्रेमाला कधीच अटी नव्हत्या. वचना-शपथांचे उंबरठे नव्हते. फत्त* त्याची आराधना हाच तर आपला संगमक्षण होता. विरहाचा आनंद तर त्यानं भरभरून दिला. काय द्यावं, हा त्याचा प्रश्न! आपण फत्त* ‘ये जिदगी उसीकी है…‘ आळवत राहावं आणि ओठाबाहेर कधीच न प्रगटणारी नावं डोळ्यांतून शांत वाहू द्यावीत. ‘हम प्यार में जलनेवालों को…‘चं डसणारं सुख देणारा मनभावन सजण मृगाच्या चालीनं अखेर येतोय…*

सुख-दुःखांना सुंदर करणार्‍या कवितांनी विरहाच्या तेलातील एकेक निरांजनं पुन्हा उजळायला सुरुवात केली आहे. त्याच्या चाहुलीनं दरवेळी हाच प्रत्यय येतो. दूर गेलेय की काय, असं वाटणारी आतली आणि बाहेरची कविता पुन्हा पालवू लागते. ‘रंग निळूला, अंधाराला, गंध लाभला गंधाराला‘ या जाणिवेनं लेखणी पुन्हा कागदाशी स्वयंवर मांडते… …‘पाऊस पहिला‘ बरसू लागते.*

खरंच, अंतर्बाह्य कवितेचाच हा ऋतू कवींच्या सोबतीनंच आयुष्य गहिरं करून गेला. आयुष्यातली थेंबाएवढी सुखं आभाळाएवढी झाली. आकाशाएवढी दुःखं थेंबाएवढी झाली. आणि ती सुख-दुःखंही संवेदनांच्य या अनभिषित्त* सम्राटांनी सुंदर केली. पावसात सामावणारं, मातीतून उगवणारं गीता-भागवत बहिणाबाईंनी बोट धरून दाखवलं. तर ‘या धारांतून तुझे कृपामय हात दिसावे‘ ही दृष्टी कविवर्य पाडगांवकरांनी दिली. आणि मग वेगळे ‘दर्शन‘ मागण्याची गरज उरली नाही. खरंच, कवितेनंच माझी दुबळी झोळी जरतारी केली. काळोखाच्या वाटेवर नक्षत्रांची रेघ कोरली. अशा ध्यानमग्न झपूर्झाक्षणी हा दारचा सजण केवढा समजूतदार! तटस्थ!*

आजही त्याच्या बरसत्या पावलांच्या सोबतीनं ‘स्मरकरुणाघन‘ बरसले. पुन्हा एकदा कविवर्य बोरकर अंतरंगात मोहरले. ‘झाडे झाली निळी निळी‘चा पट उलगडला. ‘तू माझी सांगाती‘ असं जिला मी हृदयाइतकंच माझं मानलं, त्या कवितेच्या वर्षावानंही कुठल्याही ऋतूचा पाणकळा केला. हे असं भावुक होणं- हेही एक जगणंच असतं ना! वास्तवाच्या करड्या पंखाखाली दडवलेल्या स्वप्नांचं एखादं लालस पीस अगदी प्रत्येकापाशी असतं; जगण्याची तीही एक तर्‍हा असते ना! स्वप्नात पहुडलेलं ते कोवळं वास्तव ‘तो‘ त्याच्या हुरहुरत्या उत्कटतेनं जागं करतो. सतत बर्फाच्या तळघरात अग्नी जपणार्‍या तुमच्या- माझ्यासारख्या नशीबवंतांना त्यानं एका वेगळ्याच बेटावर ठेवलेलं असतं.*

त्या बेटावर पुन्हा एकदा त्यानं आणून सोडलंय. पुन्हा एकदा माडांनी फडफड मांडलीय. भिजून चिब होणार- या कल्पनेनंच पाखरांनी चिमणदंगा आरंभलाय. धुळीच्या भोवर्‍यांनी पुन्हा एकदा झोपलेल्या वादळांना ढुशी दिलीय. जगण्यावर, सृजनावर, सत्य-शिवाच्या सुंदरतेवर ज्यांचा ज्यांचा पराकोटीचा विश्वास आहे, अशा सर्व सृष्टीचा सजण दारी खोळंबला आहे. विरहाच्या सार्‍या जळत्या वाटा ओलांडून तो आता दारी आलाय. त्याच्या स्वागताला नको पंचारती, पंचपक्वान्नं. फत्त* हवी आहे- पंचप्राणांची गळामिठी. मातीच्या आवेगानं तडफडून एकरूप होणारं मन! आयुष्य ओवाळायचं समर्पण!*

आत ्ता नाही, तर कधीच नाही, अशा या क्षणी जाणिवांचे बंद दरवाजे पूर्ण उघडायचे! वेळेची, प्रतिष्ठेची, वाढत्या वयाची, कुरकुरणार्‍या स्वभावाची सगळी कारणं दूर सारायची. उडेल थोडी तारांबळ, उडू दे! आपलं कावरंबावरं सैराट ध्यानही त्याला आवडतं! आखीव चेहर्‍यांपेक्षा मनःपूर्वक स्वागताचा गोंधळ तो समजून घेतो…*

तो खराखुरा आहे.

— भालचंद हादगे उर्फ भाली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..