त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी, माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गणेशपट्टीच्या वर शिल्पसमृद्ध कमान कोरलेली असून सर्वात वरील बाजूस शेषशायी भगवान विष्णू कोरलेला आहे.
मंदिराच्या दर्शनी भागावर यक्ष, किन्नर, गंधर्व, मोर, पोपट, भैरव, गजांतलक्ष्मी, मर्कटे अशी अनेक मांगल्यसूचक शिल्पे कोरलेली आहेत.
नावाप्रमाणेच गणेश मूर्तीला तीन सोंडा आहेत. कदाचित ही दत्तस्वरूपातील गणेशमूर्ती असावी म्हणूनही मंदिराच्या बांधणीत ब्रह्मा, विष्णू, शंकराच्या संदर्भातील शिल्पे येथे बरीच कोरलेली दिसतात.
एकमुख, तीन सोंडा आणि सहा हात अशी रचना असलेली ही मयुरारूढ मूर्ती मूळची काळ्या पाषाणातील असून आता पूर्णपणे शेंदूरविलेपीत आहे. सत्व, तम आणि रजोगुणांनी युक्त असलेला ह्या गणेशाच्या मांडीवर शक्तीदेवता बसलेली आहे. हातात परशू, अंकुश आदी आयुधे आहेत.
मूर्तीच्या पाठीमागच्या भिंतीवर अतिशय रेखीव अशी शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरलेली असून त्यावरील कमानीवर देखणे गणेश यंत्र कोरलेले आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply