दारा सिंग यांच्या गंभीर आजारपणाची बातमी वाचली होती. निधनाची बातमी अपेक्षित होती. तरी वाईट वाटलेच. आपल्या बालपणाशी जोडलेला एक धागा तुटला.
आम्ही लहान असताना (पाचवी ते सातवी) घराशेजारी असलेल्या ‘श्री समर्थ व्यायाम मंदिरा’त जायचो. त्यांच्या एका संमेलनाला दारा सिंग आले होते. (त्या वेळी मात्र सारी मुलं, ‘आईशप्पथ, दारा सिंग येणार आहे,’
असं बोलत होती.) दारा सिंग आल्यावर आम्ही निराश झालो. कारण तो कपडे घालून आला होता. आमच्या मनात त्याचे वेगळे – टारझनचे – रूप होते. स्टेजवर मुलांची शरीरसौष्ठवस्पर्धा झाली. त्यांना बक्षीसे मिळाली. आम्ही फक्त डोळे भरून दारा सिंग पहात होतो.
त्या वेळी आमच्यातल्या नंदूने मारलेला एक शेरा त्याला महाग पडला. तो बिचारा सहज म्हणाला, “दारा सिंग आपल्या नामजोशी सरांना इझीली मारू शकेल, नाही?” तो शेरा नामजोशी सरांनी ऐकला. दुसऱ्या दिवशी मैदानात आल्या आल्या त्याला पुढं बोलावून सरांनी त्याच्याकडून आधी गुन्हा वदवून घेतला. मग “मी तुला कसा इझीली मारतो, ते बघ.” म्हणत त्याच्या दोन कानाखाली दिल्या नि नंतर मैदानाला पाच फेऱ्या मारायला लावल्या.
पुढे काही काळ आम्ही त्याचे देमार सिनेमे चवीने पाहिले. बहुतेक सिनेमे श्रीकृष्ण टॉकीजला लागत. सिनेमाचा प्रभाव इतका असे की सिनेमा सुटल्यावर सायकल स्टॅन्डवरून सायकल काढताना आम्ही ती उचलून डोक्यावर आडवी धरून बाहेर यायचो. दारा सिंगच्या नायिका नाजूक वाटून त्यांची उगाच काळजी करायचो. मुमताजची काळजी तर फारच केली आम्ही. असो.
पुढे ती लाट संपली. ते सिनेमे संपले. दारा सिंग ज्येष्ठ कलाकार झाले. गॉडफादर सिनेमातल्या लुका ब्रासी या गुंडाची भूमिका त्यांनी धर्मात्मा सिनेमात केली. ती आवडली नाही. पण त्यांच्याबद्दल आदर मात्र सतत मनात राहिलाच.
आणि त्यांचा हनुमान, तो कोण विसरील? ती भूमिका अजरामर
च राहील.
एक जुनी मजेदार आठवण सांगायलाच हवी. एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. दारा सिंग पहिलवान. आणि तो पत्रकार साडेचार फुटी. त्याने मुलाखत घेतली ते ठीक झालं. पण त्याने दारा सिंगशेजारी कोचावर बसून फोटो काढला. नि त्या अंकाच्या मुखपृष्ठावर छापला. इतका विनोदी फोटो त्यानंतर आजवर पाहिला नाही.
दारा सिंग यांची माहिती नेटवर चाळत होतो. त्या भरात सगळे बालपण उगाळून घेतले. आमच्या बालमनातला अनेक आख्यायिकांचा नायक, अजिंक्यवीर, जगज्जेता पहिलवान दारा सिंग… त्याला मनःपूर्वक श्रद्धांजली.
— विजय तरवडे
Leave a Reply