नवीन लेखन...

दासी मंथरेमधला विकल्प

रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच त्या प्रसंगाना पुढे पुढे नेत जाणे योग्य ठरते. फक्त घटनेतील मानसिकता उलगडली पाहीजे.रामाला आपला उत्तराधीकारी करण्याचे राजा दशरथाने ठरविले. मुहूर्त निघाला. बातमी सर्व संबंधी व प्रजाजन याना कळली. आनंद व उल्हास याचे वातावरण पसरले.

स्वर्गांत सर्व देव जरी आनंदीत झाले, तरी त्यांच्यात चिंता निर्माण झाली होती.

देवांचा संभ्रम होता की 

” रामाच्या अवताराच प्रयोजन हेच मुळी रावण व त्याच्या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होत. जर रामाचा राज्याभिषेक जर झाला तर तो आयोध्येचा राजा होईल. मग रावणा बरोबरच्या त्याच्या युद्धाची कल्पना बाजूस पडेल. राम हा आक्रमक नव्हता. तो इतर राजाशीं अकारण युद्ध करणार नाही. कोणाची खोडी करुन त्याचे राज्य घेणारा नव्हता. रावण भले दुष्ट असूर प्रवृत्तीचा असला, तरी राम त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या स्वभावाचा होता. आपला राजधर्म तो अत्यंत सत्यबुद्धीने व विवेकाने पाळणारा होता.

जर कांही घडायचे असेल तर राम राजा बनण्यापूर्वीच होणे शक्य आहे. राम हा एक पराक्रमी योद्धा व उत्कृष्ठ  धनुर्धर होता. योद्धा आणि राजा ह्या दोन भूमिका वेगळ्या होत्या. योद्धा म्हणून घडलेल्या अन्यायाविरुद्ध लढणे, व अन्याय करणाऱ्याला तसेच त्याच वेळी शासन करणे ही संकल्पना येते. योद्धा हा प्रत्यक्ष बघतो. व त्याच क्षणी योग्य ती शिक्षा अमलांत अणतो. राजा म्हणून त्याला घटनांचे सर्व पैलू, कार्यकारणभाव, याच्या खोलांत जाऊन विचार करावा लागेल. कारण अन्याय करणारा विरुद्ध , न्याय झाला पाहीजे ही प्रथम समज. नंतर भाग येतो तो शिक्षेचा. त्यामुळे राम राजा म्हणून होण्यापूर्वीच हे घडणे जरुरीचे होते. ”

राज्याभिषेकासमयी कांहीतरी विपरीत घडणार ह्याची त्याना चाहूल होती. ते आपली शंका घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्याना विनंम्र अभिवादन केले.

सर्वांची शंका व व्यथा जाणून ब्रह्मदेव म्हणाले  ” मी काळ व वेळेला  आज्ञा केलेली आहे. घटनांचे सुसुत्रीकरण त्यांच्या हाती दिलेले आहे. हे सारे करण्यास ते सक्षम असतात.  माझ्या योजना विधीलिखीत म्हणून अचुक होत असतात. आपण जा व निश्चींत रहा. ”

 

सर्व देव जाताच   ब्रह्मदेवानी  ” विकल्प ह्याची ”  आठवण केली. तत्क्षणी विकल्प प्रकट झाला. “जा तू पृथ्वीवर जा व योग्य ती कार्यपुर्ती कर.”.

ब्रह्मदेवाला अभिवादन करुन विकल्प अन्तर्धान पावला.

आयोध्येमधील राजवाड्यांत आनंदाचे वातावरण होते. जल्लोश चालू होता. माता कैकयी सुद्धा आनंदमग्न होती. ” माझा राम हा राजा होणार. प्रजेच्या कल्यानासाठी झटणार. एक आनंदी पर्व सुरु होणार “.

तीने तीची वैयक्तीक सेवा करणारी दासी मंथरा हीला हाक दिली.  ” जा बागेंत जाऊन उमललेली ताजी सुंदर टपोरी फुले काढून आण. आज मी स्वतः हार करुन माझ्या रामाच्या गळ्यांत घालणार आहे. त्याच्या भाग्योदयासाठी आशिर्वाद देणार आहे. ” दासी मंथरा जी कैकयीसाठी प्रिय व अत्यंत विश्वासू होती. ती लगेच फुले काढण्यासाठी बागेत गेली.

बागेत आधीच विकल्प फुलझाडावर बसला होता. तो अदृष्य परंतु  प्रतापी होता. मंथरेने एक टपोरे फुल बघीतले. ते तोडले. फुलाचा आनंद घेण्यासाठी ती फार उत्सुक झाली. तीने त्या फुलाचा स्वाद घेत प्रदिर्घ गंध टिपला. विकल्प हा त्याच फुलांत विराजमान होता. त्याने  दासी मंथरेच्या स्वासाबरोबर तीच्या शरीरांत प्रवेश मिळविला. मंथरा फुले तोडण्यास सुरवांत करणार, इतक्यांत तीच्या डोक्यांत एक भावनिक कल्पना आली.

” राम हा राजा होणार. हे ठीक आहे. परंतु माझ्या राणी कैकयीच्या, स्वतःच्या मुलाचे, भरताचे काय होणार? ”  भरत हा सुद्धा राजाचाच मुलगा आहे. वंशाचा तोही दिवा आहे. राजसिंहासन हा त्याचा पण हक्क आहे. भरत फक्त थोड्याशाच अंतराने जन्मलेला. राजा दशरथाचे सर्व पुत्र यज्ञ देवतेच्या आशिर्वादाने, कृपेने, झालेले होते. तीन्ही राण्यानी यज्ञाचे पवित्र पायस ग्रहण करुन त्याना पुत्रप्राप्ती झालेली होती. कां म्हणून मग भरत राजसिंहासना पासून वंच्छीत रहावा? ”

विचारांची मालिका, मार्ग नेहमी एका दिशेने जात असतात. व्यक्तीच्या भावना विचारांना सतत वेगवेगळ्या मार्गने नेण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा एका दिशेने चाललेला विचार भावनेच्या प्रभावाने एकदम विरुद्ध दिशेला पण जाऊ शकतो. आवडणारे क्षणात नावडते होते, वा नावडणारे आवडते बनू शकते. हे सामान्य मानसिक तत्वज्ञान आहे.

रामाविषयी प्रेम व आदर हा दासी मंथरेमध्ये भरलेलाच होता. म्हणूनच ती प्रथम आनंदी झाली होती. रामासाठी फुले आणून हार करण्यास मदत करु लागली. परंतु त्याच क्षणी तीचा स्वार्थ अर्थात स्वतःचे हीत ही भावना चेतवली गेली. हे सर्व साधारण मानवी स्वभावाचेच चित्रण असते. ही तीच्या विचारांची धारणा अयोग्य वाटली, तरी व्यक्तीची मानसिकता ह्यात दडलेली असते. म्हणूनच व्यक्त आणि अव्यक्त विचार ह्यांच्या संघर्षात मनुष्य भरकटला जातो. हेच तर जगासाठी एक व मनासाठी दुसरे होऊ शकते. हे स्वाभाविक असते. मंथरेच्या ह्या विचाराला विक्षीप्त म्हणता येणार नाही.

 

राम आणि मंथरेमधले भावनीक सख्य अंतर , तीच्यापासून खूप खूप दुर होते. तेच तुलनात्मक भरत व तीच्यातील सख्य अंतर खूप जवळचे होते. तीच्या मालकीनीचा आपला पुत्र असणारा. दोन्हीहीमध्ये आदर व प्रेम भावना होती. भरताकडून रामापेक्षा हे सहजगत्या मिळणे दासी मंथरेसाठी सुलभ होते. स्वार्थाच्या ह्याच वैचारीक भावनेने मंथरेला झपाटले. विचारांचे चक्र  सुरु झाले. तीला रामापेक्षा भरताला राजसिंहासनावर आरुढ होताना बघावे ही इच्छा उत्पन्न झाली. ह्यांत वाईट बुद्धी नव्हती. दुष्टता नव्हती. मात्र स्वार्थ पुर्णपणे भरलेला होता. मंथरा सुद्धा अत्यंत चाणाक्ष्य होती. हूशार होती. सर्व परिस्थितीचे अवलोकन करुन आपली मालकीन राणी कैकयी हीच्याकडून कांही जमेल कां?  याचा अंदाज घेण्यासाठी उत्सुक होती. ती बागेतून फुले न आणता तशीच परत राजवाड्यांत आली.

कैकयी ही प्रथम राजकन्या होती. नंतर राजा दशरथाची राणी झाली. स्वतः कैकयी अत्यंत चतूर, दुरदर्शी व मुरलेली राजकारणी होती. राजा दशरथाला राज्यकारभारांत तीचे क्रियात्मक सहकार्य होते. अनेक युद्ध प्रसंगी देखील ती रणांगणावर गेली. तीने एका कसलेल्या योद्ध्याप्रमाणे योगदान दिले होते. एक युद्धांत तर कैकयीने राजाचे प्राण देखील वाचवले. युद्ध जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. राजा आनंदी व खूश झाला. त्याने तीला दोन वर दिले. ती मागेल त्यावेळी ते पूर्ण करण्याचे वचन दिले. ती राजा दशरथाच्या संपूर्ण विश्वास व योग्य मार्ग दर्शनासाठी पात्र ठरलेली होती. तीचा शब्द तोलामोलाचा समजला जायी.

अशा प्रभावी व्यक्तमत्वाच्या कुशल राणी कैकयीने, आपली निजी सेवक व जवळकी करण्यास योग्य असलेली व्यक्ती म्हणून दासी मंथरेला निवडावे ही साधी बाब नव्हती. ही पसंती,  मंथरेच्या चाणाक्ष्य व कर्तबगारीला बघूनच. राजभवनातील सेवकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक व योग्यतेचा कस लाऊनच केली जात असे. विशेषकरुन ज्यांचा संपर्क राजा राणी अथवा त्यांच्या जवळच्या नातेसंबंधात असावयाचा. एखाद्या सामान्य दासी स्त्रीप्रमाणे वा नोकरासारखे बडबड करणे, इकडच्या तीकडच्या गप्पा मारणे, बाहेर बघीतलेल्या बातम्या सांगत बसणे, खऱ्याखोट्याचा आधार घेत चकाट्या मारणे, कुणाच महत्व मोठ वा छोट करणे, असे खालच्या वैचारीक दर्जा असलेल्या व्यक्तीना राजा वा राण्यांच्या संपर्कामध्ये केव्हांच ठेवले जात नव्हते. दासी मंथरेची वैचारीक योग्यता उच्य कोटीतीलच असणार.

एक प्रसंगात मंथरेची वैचारीक झेप लक्षांत येते. भरताला राज्य मिळण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती तीने कैकयीला केली. रामाबद्दल प्रेम व आदर व्यक्त करीत हे तीने सुचविले. राम हा सर्वांचा आवडता आहे, त्याच्या विषयी कोणताही उणा शब्द  वा अनादर कैकयी सहन करणार नाही हे तीला जाणीव होती. त्याच वेळी जर कैकयीने मंथरेचे विचार एकदम धुडकावले वा फेटाळले तर निर्माण होणारा परिणाम निश्चीतच भयावह होईल. मंथराने आपल्या चाणाक्ष गुणधर्माचे योग्य प्रदर्शन केले. अतिशय हळूवारपणे व समजदारीने तीने भरताला राजसिहांसन मिळवे हा विचार  राणी कैकयीसमोर व्यक्त केला.

 

कैकयीला मंथरेचा विचार ऐकून प्रथम गम्मत वाटली. हासू आले. पण ती रागावली नाही. कारण मंथरेच्या हूशारपणाची तीला जाणीव होती. मंथरेमध्ये स्वार्थी विचार असला तरी त्यांत कुणाचा द्वेश नव्हता. एखादी गोष्ट मिळावी ही अभिलाशा होती. कांहीही मल्लीनाथी न करता, कैकयी त्याक्षणी शांत बसली.

एका वेगळ्याच विचारांचे दालन दासी मंथरेने उघडले होते. कैकयीला त्यावर विचार करावयास लावले. राजा दशरथाच्या निर्णयांत फेरबदल करावयास भाग पाडणे, ही अत्यंत अवघड गोष्ट होती. एक प्रकारे जीवाशीच खेळण्याचा हा प्रकार होऊ शकतो. कैकयीला प्रथम राजा दशरथारला हे पटवावे लागणार. न पटल्यास परीणाम वेगळाही होऊ शकतो. राजा दशरथाचा राग, चौकशी आणि दासी मंथरेसह सर्वाना प्रचंड शिक्षेलाही सामोरे जाणारे होऊ शकते.

खरी भूमिका होती ती राणी कैकयीकडून.  तीने राजा दशरथाबरोबर प्रदीर्घ चर्चा केली.  आपला अनुभव. राजकारण, दुरदृष्टी, रावण व इतर आसूरांचा दक्षिणेकडे चाललेला अत्याचार,  अशा निरनीराळ्या त्या काळच्या व परिस्थीतीवर भाष्य झाले. “रावणाचा नाश करणे”   ही सर्वांत महत्वाची प्राथमिकता होती. आयोध्या ते लंका हे अंतर प्रचंड दुर होते. विशेषकरुन पायी चालून वा घोडागाडीने. कदाचित् ती योजना पू्र्ण करण्यासाठी १२ ते १४ वर्षे लागू शकतील. राणी कैकयीने बघीतले की राजा दशरथाला  देखील हे मान्य होऊ लागले. त्याच क्षणी तीने सुचविले की रामाने त्यावेळी राजसिंहासन न घेता पुढील योजनेसाठी दक्षिणेकडे वनांत जावे. ज्या भागांत रावणाचे प्राबल्य असून त्याच्याशी संघर्ष होण्याची खूप शक्यता आहे. राम येईपर्यंत ती गादी राजाचा दुसरा पुत्र भरत सांभाळेल.

राजा दशरथाला ही योजना मान्य होती. परंतु स्वतःचे वाढते वय व रामा विषयी नितांत प्रेम ह्यामुळे तो अतिशय बेचैन झाला, हातबल झाला होता. कैकयीचा प्रस्ताव  मान्य करावा की अमान्य करावा  ह्या द्विधा  विचारांत तो होता. राणी कैकयी मात्र आपल्या योजनेवर ठाम होती. त्याच क्षणी तीने अतिशय चतूरपणे पूर्वी तीला मिळालेल्या दोन वरदानांची आठवण करुन दिली. आणि मागणी केली. रामाचे दक्षिणेकडे १४ वर्षासाठी जाणे व त्या काळांत भरताने राज्य सांभाळणे. ह्या संकल्पना त्यामधूनच साकार झाल्या.

विकल्पाने दासी मंथरेच्या माध्यम रुपाने वैचारीक ठिणगी चेतवण्याचे प्रभावी कार्य केले. कैकयीने त्याचे रुपांतर प्रचंड आगीत केले. वैचारीक भडका उत्पन्न झाला. सत्तांतराची उलथापालथ झाली. रावणाचा वध व खऱ्या रामराज्याचा उदय झाला.

अनेक घटना अघटीत होत गेल्या. आणि सर्व रामायण रोमांचकारी झाले.

ज्याचा शेवट चांगला व समाधानी होतो, त्यालाच विधी लिखीत म्हणतात.

 

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..