सोनियाजी व शरदराव त्यांच्या दुखण्याच्या इलाजासाठी वारंवार परदेश गमन करून करदात्यांचा पैसा उधळतात. हो उधळणे असा शब्द मी वापरला आहे, कदाचित त्यांचे दुखणे पाहून हा शब्द, असहिष्णू असाच वाटेल; नाही तो आहेच हे माझे हि ठाम मत आहे, कदाचित लोकांचा रोष ओढवून घेण्यासाठीच मी हा शब्द वापरत आहे असे त्यांच्या भक्तांनी समजावे.
आपल्या देशात साठ वर्षातील एकहाती सत्तेत राहून या नेत्यांनी चांगले डॉक्टर्स बनविण्यासाठी का महाविद्यालये बनवली नाहीत? भारतीय डॉक्टर इतक्या सुमार दर्जाचे आहेत का, कि ज्यांना या नेत्यांचे दुखणे बरे करता येत नाही? मग याचा अर्थ आमच्या सारखे आम भारतीय, अश्या सुमार डॉक्टरांचे उपचार घेतो आहोत हा आमच्यासाठी शापच म्हणावा लागेल, असे नाही का वाटत?
भारतात दरवर्षी हजारो लोक कॅन्सर सारख्या रोगाने मरतात, तेच भोग या नेत्यांच्या वाट्याला आले आहेत, हे सर्वश्रुत आहे, पण केवळ परदेशात जाऊन आमच्या पैशावर इलाज घेऊन यांना दुखण्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, हाच अधिकार आम भारतीयाला का नाही? आपल्या देशातील सरकारी दवाखाने याना नरकासारखे भासतात, पश्चिमात्य देशांनी जवळपास वीस वर्षांपूर्वी टाकून दिलेल्या तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय यंत्रे आपल्या देशात दसपट किमतीने विकत घेतली जातात, यातून सरकारचे नुकसान तर होतेच, व मूळ किमतीच्या वरची नऊपट किंमत यांच्यासारखे भ्रष्ट खाऊन मातब्बर होतात, म्हणूनच यांचा या देशातील दवाखान्यातील वैद्यकीय यंत्रांवर व त्याचा वापर करून इलाज करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास नाही, हे यांच्या परदेशात जाऊन उपचार घेण्यावरून सिद्ध होते.
या नेत्यांचा हा आजार कालपरवाचा नाही, गेल्या कित्येक वर्षांपासून हे परदेशी जात आहेत, त्यांना असलेला आजार आज देशातील हजारो लोकांना आहे. जर हे खरे लोकनेते असते तर त्यांनी सुरवातीची वैद्यक सेवा तिथे घेऊन असे ठणकावून सांगितले असते, की माझ्या मातृभूमीतच मी पुढची सेवा घेईन, त्यासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रे त्वरित खरेदी करण्यात यावीत, ज्यामुळे मला परत परदेशात जावे लागणार नाही, तसेच माझे देशबांधव ज्यांना माझ्यासारखे दुखणे आहे त्यांना सुद्धा या सुविधांचा वापर अल्पदरात करता येईल. जाऊ दे ओ, इतकी वैचारिक परिपक्वता असती तर, या देशात हे नेते व त्यांची पिल्लावळ स्वातंत्र मिळाल्यानंतर सत्तर वर्षांनी सुद्धा हम गरीब लोगोंके लिये काम कर रहे है, असा राग आळवत बसले नसते. आजकाल या नेत्यांनी गरीब हा शब्द जरी उच्चारला तरी मला भयंकर राग येतो.
या देशातील डॉक्टरांचा सर्वाना सार्थ अभिमान आहे, हे माझे ठाम मत आहे. आज हजारो विदेशी लोक उपचारासाठी दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई सारख्या शहरातील नामांकित हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येत आहेत. नुकतीच एक जवळपास पाचशे किलोची महिला भारतात वजन कमी करण्यासाठी दाखल झाली, आणि येथील डॉक्टरांनी ती मायदेशी चालत जाईल असे आत्मविश्वासाने सांगितले, तसेच हृदय, यकृत व मूत्रपिंडरोपणासाठी सुद्धा असंख्य परदेशी लोक स्वस्त व मस्त सुविधा आहेत पाहून भारतात येतात, हे आम्ही वरचेवर पेपर मध्ये वाचतो, तसेच अवयव दानासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा भिडवत पोलीस यंत्रणा सुद्धा काम करताना दिसते, याचे नुसते कौतुक वाटत नाही, तर गर्वाने उर भरून येते. असे असताना याना परदेशात जाण्याची दुर्बुद्धी का होते? यातून या नेत्यांना आपल्याच डॉक्टरांच्यावर विश्वास नसल्याचे अभिप्रेत होते, असे मीच म्हणतो असे नाही, तर प्रत्येक भारतीय असे म्हणतो आहे.
या बाबतीत सुषमा स्वराजजींचे कौतुक करायला हवे, त्यांच्या दोन्ही किडण्या (मूत्रपिंड) निकामी झाल्या, त्या उपचारासाठी मंत्री या नात्याने परदेशात जाऊन सरकारी खर्चाने उपचार घेऊन येऊ शकल्या असत्या, पण तसे न करता, आपल्या देशातील AIIMS हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन, किडन्या बदलून संसदेमध्ये कामावर रुजू झाल्या. यातून आपल्या डॉक्टरांच्यावरचा त्यांचा विश्वास दिसून येतो, यातून एक चांगला संदेश आम जनतेत गेला आहे.
असे म्हणतात, A leader should lead by an example, असे लीडर बनण्याची लायकी असावी लागते, जाऊ दे, कोळसा कितीही घासला तरी तो काळाच राहणार आहे.
जाता जाता विनंती, डॉक्टरांच्यावर हात उचलून/ उगारून प्रश्न सुटत नसतात. आपल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात खूप कमी डॉक्टर्स आहेत, म्हणून सरकारी रुग्णालयात सर्व रुग्णांवर हवे तसे लक्ष्य देऊन डॉक्टरांना उपचार करता येत नाहीत, यासाठी सय्यम हाच एकमेव उपाय आहे, हे आपण जनतेने लक्ष्यात घ्यायला हवे. हाताची पाची बोटे सारखी नसतात, तसे काही डॉक्टर भातातल्या खड्यांसारखे असतीलही, त्यांना उघडे पाडायला हवे, आणि त्याच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन ने योग्य कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करायला पाहिजे.
आता थांबतो.
धन्यवाद
— विजय लिमये
Leave a Reply