बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १
चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २
वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३
मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणार्या दृष्टीपटाला
स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४
दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५
प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६
राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७
दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८
तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९
वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०
फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११
आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply