आज चैत्यन्याचा रुपेरी झरा अशा वैशिष्ट्याने पडद्यावर वावरलेल्या देव आनंद यांची जयंती. त्यांनी आपल्या अजरामर भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यातील सर्वोत्तम दहा चित्रपट.
१. गाईड (दिग्दर्शक विजय आनंद)
राजू गाईड(देव आनंद) व विवाहीत रोझी (वहिदा रेहमान) यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होते, पण हे प्रकरण खूप वेगळे वळण घेते. या चित्रपटातील देव आनंद यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सर्वोत्तम अभिनय ठरला. चित्रपटाच्या शेवटी त्याचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे, हा देखील त्यांच्या कारर्किदीतील दुर्मिळ योग.
२. ज्वेल थीफ (दिग्दर्शक विजय आनंद)
देव आनंद यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट. आपण चित्रपटाच्या नायकावर( अर्थात देव आनंद) तोच गुन्हेगार असल्याचा संशय ठेवतो (हे दिग्दर्शकाचे कसब). चित्रपटाचा शेवट धक्कादायक. वैजयंती माला आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत.
३. जॉनी मेरा नाम (दिग्दर्शक विजय आनंद)
देवचा सर्वोत्तम गुन्हेगारी पट. हेमा मालिनीशी त्याची जोडी छान शोभली. प्रेमनाथ, प्राण, पद्मा, रंधावा अशा कितीतरी कलाकारांनी हा मसालापट खुलवला. प्रत्येक गाण्यात देव आनंद यांचा मस्तच वापर करण्यात आला आहे.
४. तेरे घर के सामने (दिग्दर्शक विजय आनंद)
गाण्यांतून दिसणारा देव आनंद..अनुभवणाऱयांसाठी हा चित्रपट उत्तम! ‘एक घर बानाऊंगा तेरे घर के सामने’ असो वा ‘दिल का भंवर करे पुकार’ असो पडद्यावर गाणे कसे सजवायचे हे देव आनंद यांनी दाखवून दिले. अर्थात नूतन यांनीही तितक्याच ताकदीने योगदान दिले आहे.
५. तेरे मेरे सपने (दिग्दर्शक विजय आनंद )
सायकलवरचे एक मैने कसम ली असो अथवा जीवन की बगियाँ महकेगी असो मुमताजसोबतची देव यांची जोडी मस्त जमली. गाण्यातून दिसणारा देव आनंद हा देखील त्यांच्या व्यक्तीमत्त्व व अभिनयाच्या शैलीचाच प्रकार.
६. हरे राम हरे कृष्ण (दिग्दर्शक देव आनंद)
देवने प्रेम पुजारी पासून दिग्दर्शनात पाऊल टाकले, पण ठसा मात्र हिप्पी संस्कृतीवरील हरे राम..मध्येच उमटला. झीनत अमानची हिप्पी गर्ल खूपच धाडसी. काठमांडूच्या परिसराने विषय प्रवाभी ठरला.
७. देस परदेस (दिग्दर्शक देव आनंद)
विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये रोजगारासाठी जाणाऱया भारतीयांच्या वाट्याला नेमके काय येते? या विषयाची ‘देव’ शैलीत मांडणी.
८. हम दोनो (दिग्दर्शक अमरजीत)
देव आनंदची दुहेरी भूमिका. जोडीला साधना व नंदा, तर जयदेवच्या संगीतामुळे आणखी आकर्षण वाढले. मूळचा हा कृष्णधवल चित्रपट कालांतराने रंगीत स्वरुपात आला. देवने आपण नवीन चित्रपटाच्या तयारीत गुंतलो आहोत हा व्यक्त केलेला आशावाद सतत पुढेच पाहायचे ही त्याची वृत्ती दर्शवणारा होता.
९. वॉरंट (दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती)
सत्तरच्या दशकातील तद्दन मसालापट. त्यात पन्नाशीपार देव आनंदचा झीनत अमानला उद्देशून केलेला ‘रुक रुक..रुक झाला हमसे दो बाते करके जाना, यह मौसम हे दिवाना’ हा आग्रह त्यालाच शोभला व देव आनंद यांनी रौप्य महोत्सवी यश संपादन केले.
१०. फंटूश (दिग्दर्शक चेतन आनंद)
दूखी मन मेरे सून मेरा कहना जहाँ नही चैना वहा नही रहना.. देवची भावूक मुद्रा व्यक्त करणारे हे सर्वकालीन लोकप्रीय गीत. याच चित्रपटात ‘ए मेरी टोपी पलट के आ’ गात सवयीने तो मोकळेपणाने वावरलाही. शैला रामाणी या चित्रपटात नायिका होत्या.
देव आनंद यांची रुपेरी वाटचाल खूपच मोठी आहे. प्रभातच्या हम एक है (१९४६) पासून नवकेतनच्या ‘जाना जा दिलसे दूर’पर्यंत (२०१० हा चित्रपट अप्रकाशीत) देव आनंद सतत खुलला. फुलला.
चार्जशीट(२०११) हा त्याचा त्यानेच दिग्दर्शित केलेला व प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट..
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
Leave a Reply