नवीन लेखन...

देव नव्हे मित्र !



साध्या रुपातला मनमोहक, सोज्ज्वळ गणू मला भावतो. तो माझ्यासाठी आशीर्वाद देणारा देव नसून म्हणणं ऐकून घेणारा जीवलग सखा आहे. त्याच्या उदारपणामुळेच आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आजकाल गणेशोत्सवाचं स्वरुप खूप पालटलं आहे. त्याबद्दल खूप दु:ख वाटतं. प्रत्येकाने गणेशोत्सव

स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर श्रद्धेने आणि भक्तीभावाने साजरा करावा असं मला वाटतं.

आमच्या घराण्याला 150 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्यामुळे गणपतीशी माझं अगदी जवळचं नातं आहे. मला बसलेला गणपती जास्त भावतो. जास्त झगमग, चकचक आवडत नाही. कारण, त्यामुळे मूर्तीतला मूळ साधेपणा, प्रसन्नता नाहीशी होते. आजकाल नारळ, नाणी, सुपारी अशा विविध प्रकारचे गणपती पहायला मिळतात. ही सगळी रूप खोटी वाटतात. मला अगदी जवळचा मित्र भासणारा सोज्वळ गणूच आवडतो. एका वर्षीच्या गणेशोत्सवात मी हिरवा गणपती पाहिला होता. मला तो अजिबात आवडला नाही. कारण, अशा रूपांमुळे त्याचं मोहक रूप बदलल्यासारखं वाटतं. काही गणेशाच्या मूर्ती नटलेल्या, सजलेल्या आणि हिऱ्यांनी मढलेल्या असतात. सजलेला असला तरी छोटा गणपती लक्षवेधक असतो. गणपतीची भलीमोठी मूर्ती मला ‘लार्जर दॅन लाईफ’ वाटते आणि मग ती आपलीशी वाटत नाही. पुण्यातील मंडईच्या गणपतीची मूर्ती याला अपवाद आहे. मूर्ती मोठी असली तरी त्याचं स्वरूप विचित्र नाही. अनेक वर्षांनंतरही या मूर्तीच्या चेहर्‍यावरचा भाव लोपलेला नाही. आजकाल गणपतीच्या मोठमोठ्या मूर्तींना सार्वजनिक स्वरूप दिलं जातं. मूर्तींसाठी हजारो, लाखो रूपये खर्च केले जातात. भव्यदिव्य आरास करण्यासाठी मंडळांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगलेली असते.

या स्पर्धेमध्ये गणपती बसवण्याची मूळ संकल्पना लोप पावते. त्यामुळे मंडळांनी केवळ आरास करण्यावर आणि भलीमोठी मूर्ती आणण्यावर खर्च न करता पैसे सत्कारणी लागतील अशा प्रकारे योजना राबवल्या पाहिजेत. गोरगरिबांना मदत करायला हवी.

बरेचदा काही ना काही कारणावरून गणेशोत्सव मंडळांमध्ये भांडणे होतात

आणि संपूर्ण उत्सवाचा विचका होतो. अशी भांडणे करायची असतील तर त्यापेक्षा गणेशोत्सव साजरा न केलेलाच बरा. आजकाल गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळांचा उत्साह पूर्वीच्या तुलनेत खूप कमी झाला आहे. पूर्वी संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी उत्सव साजरा केला जात असे. त्यावेळी गणेशोत्सवात शास्त्रीय संगीताचे कार्यक’मही व्हायचे. आता फार तर सिनेमे, नाटके आयोजित केली जातात. इतर प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम फारसे होत नाहीत. मी पूर्वी दादरच्या हिंदू कॉलनीचा गणपती बघायला आवर्जून जायचे. आता गणेशोत्सवाचं बदललेलं स्वरुप पाहून अजिबात जावसं वाटत नाही. बरीच गणेशोत्सव मंडळे लोकांना धमक्या देऊन वर्गणी गोळा करतात. त्यामुळे उत्सवाचा मूळ भावच लोप पावला आहे. गणेशात्सवाच्या निमित्ताने सेलिब्रिटींना बोलावलं जातं. त्यांना गणपतीचं पहिल्यांदा दर्शन घेण्याची मुभा दिली जाते. सामान्य लोक मात्र तासन्तास रांगेत उभे असतात. या सर्व गोष्टींचा अक्षरश: तिरस्कार वाटतो. गणपतीचं मार्केटिंग केलं जातंय की काय अशी भावना मनात निर्माण होते.

आमच्या घरात सात्विक आणि सोज्ज्वळ पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. मला गणपतीजवळ काहीही मागायला आवडत नाही. मी त्याच्याशी गप्पा मारते. गणपती आशीर्वाद देणारा देव नव्हे तर म्हणणं ऐकून घेणारा जिवलग सखाच वाटतो. वास्तव आयुष्यात जिवलग मित्रासमोर आपण सुख-दु:ख मनमोकळेपणाने व्यक्त करू शकतो. तो आपल्याला मदत करू शकत नसला तरी आपलं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. त्यामुळे आपल्या मनालाही शांती मिळते. गणपती बाप्पाचं रुपही असंच आहे. त्यामुळे त्याच्याशी मनोभावे गप्पा मारता येतात. तो आपलं दु:खं समजून घेणार याची खात्री असते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी आणि राणी (राणी वर्मा, माझी बहिण) ‘ती’ नावाचा कार्यक’म सादर करतो. या कार्यक्रमातून स्त्रीच्या संस्कारांचा, जाणिवांचा आणि भावनांचा प्रवास उलगडला जातो. हा कार्यक्रम आम्ही जगभर केला आहे. जपान, बंगळुरू, हैदराबाद, टोकिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचे दौरे झाले आहेत. भारताप्रमाणेच इतर देशातही मराठी माणूस उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो. कारण ते मराठी माणसाचं आराध्यदैवत आहे. त्यामुळेच प्रत्येक शुभकार्याची सुरूवात गणपतीच्या पूजनाने केली जाते. गणपतीचं शीर हत्तीचं असल्याने बुद्धिमत्तेचं प्रतीक मानलं जातं. या बुद्धीच्या देवतेनं सामान्यांनाही अशीच चांगली बुद्धी द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

(अद्वैत फीचर्स)

— वंदना गुप्ते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..