गर्दीत या झालो कुठे सामील मी
बसलो तिथे केली सुरू मैफील मी
मदतीस तू बोलाविता आलो पुढे
विसरून गेलो घाव ते मागील मी
घेशील रसिका तू मला डोक्यावरी
गझलेमुळे झालो पहा मंदील मी
स्वर्गाहुनी ती रात्र होती देखणी
मित्रा, तुला देऊ कसा तपशील मी
सुटणार मदतीची सवय माझी कधी?
हातात चंद्राच्या दिला कंदील मी
आलीस तू हेही मला कळले कुठे ?
प्रेमात या इतका कसा गाफील मी !
जे काय आहे ते अता अपुले म्हणू
काढून टाकू आज दोघांतील ‘मी‘
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply