धूम्रपान हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सिगारेटच्या धूरातील कार्सिनोजेन्समुळे हा कर्करोग जडतो. हा कर्करोग जडल्यानंतर रुग्ण वाचण्याची शक्यता अत्यल्प असते. निदानानंतर या कर्करोगाचे साठ टक्के रुग्ण वर्षभरातच मृत्यूमुखी पडतात. या व्याधीपासून दूर राहायचे असेल तर ताबडतोब धूम्रपान सोडायला हवे.
कर्करोगाच्या सर्व प्रकारांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग सर्वात घातक असतो. एका पाहणीनुसार फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 90 टक्के रुग्णांना ही व्याधी धूम्रपानामुळे जडलेली असते. धूम्रपानामुळे हृदयरोग तसेच ब्रेनस्ट्रोक येण्याची शक्यताही असते. तसेच धूम्रपानामुळे ब्रॉंकायटीसही होऊ शकतो. तंबाखूच्या कोणत्याही प्रकारातील सेवन म्हणजे कर्करोगाला निमंत्रणच ठरते. सिगारेटच्या धुरात कार्सिनोजेन्सचे प्रमाण खूप असल्याने तो अतिशय घातक असतो. धूम्रपानाचे व्यसन किती काळापासून आणि तसेच रोज किती प्रमाणात धूम्रपान होते यावर कर्करोगाचा धोका अवलंबून असतो. धूम्रपाना सोडण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे धूम्रपान सोडल्यानंतर दरवर्षी कर्करोगाचा
धोका कमी होत जातो. कारण, धूम्रपानामुळे असामान्य (अॅबनॉर
मल) बनलेल्या पेशींची जागा नवीन पेशी घेतात.
धूम्रपाना करणार्यांनाच नव्हे तर ते न करणार्या पॅसिव्ह स्मोकर्सनाही धूम्रपान घातक ठरते. पॅसिव्ह स्मोकिंगमुळेही फुफ्फुसांचा कर्करोग जडू शकतो. हल्ली धूम्रपानाची लोकप्रियता वाढत असून महिलाही या व्यसनाला बळी पडत आहेत. यात सर्व आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांचाही समावेश आहे. हल्ली विशेष लोकप्रिय होऊ लागलेल्या हुक्क्यामध्ये सुगंधी तंबाखूचा वापर केला जातो. धूम्रपानाचा हा प्रकार आशियाई राष्ट्रातील अनेक महिला आणि पुरुषांमध्ये लोकप्रिय आहेत. तो सौम्य असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात तेवढाच घातक असतो. धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता वाढते. या कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर असे या प्रकारांचे वर्गीकरण केले जाते. स्मॉल सेल लंग कॅन्सरच्या तुलनेत नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरचे प्रमाण अधिक असते.
फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे फुफ्फुसातील असामान्य (अॅबनॉर्मल) पेशींची अनियंत्रित वाढ. धूम्रपान हे या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण असले तरी काही रुग्णांना धूम्रपान न करताही हा कर्करोग होऊ शकतो. सामान्य फुफ्फुसाच्या उती ठराविक पेशींपासून बनलेल्या असतात. या पेशींमुळे फुफ्फुसाला ठराविक आकार प्राप्त होतो आणि त्याचे कार्य सुरू राहते. निसर्गाने पेशींचे तसे प्रोग्रॅमिंगच केलेले असते. काही वेळा या पेशींना चुकीच्या सूचना मिळतात आणि त्या पेशी आणि त्यांच्यापासून निर्माण होणार्या पेशी मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. या पेशी फुफ्फुसाचा आकार आणि कार्य यावर नियंत्रण राखू शकत नाहीत. पेशींची अनियंत्रित वाढ झाल्याने फुफ्फुसांमध्ये गाठी तयार होतात. या गाठींमुळे फुफ्फुसाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. फुफ्फुसांचा आकार मोठा असल्याने कर्करोगाच्या गाठी अनेक वर्षांपर्यंत वाढत राहतात. ही बाब लवकर लक्षातही येत नाही आणि कर्करोगाची शंकाही येत नाही. हा कर्करोग कोणत्याही लक्षणांशिवाय फुफ्फुसाच्या बाहेरही पसरू शकतो. सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य लक्षण असते. खोकल्यामुळे रुग्णाला सर्दी किवा ब्रॉंकायटीसची शक्यता वाटते आणि त्यामुळे कर्करोगाचे लवकर निदान होऊ शकत नाही.
या विषयावर झालेल्या संशोधनातून सिगारेटच्या धुरात आढळणार्या विविध प्रकारच्या कार्सिनोजेन्समुळे कॅन्सरच्या गाठी होतात असे आढळून आले आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसे आणि धुराच्या थेट संपर्कात येणारे मुख या दोन अवयवांमध्ये कर्करोग होतो. धुरातील घातक घटक शरीरात शोषले जाऊन ते इतर अवयवांमध्येही पसरतात आणि त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांमध्येही कर्करोगाची शक्यता निर्माण होते. कर्करोगाचा धोका रोज ओढल्या जाणार्या सिगारेट्सची संख्या, धूम्रपानाचा कालावधी, धूम्रपानाची सवय लागल्याचे वय आणि कोणत्या प्रकारची सिगरेट ओढली जाते यावर अवलंबून असतो.
मेसोथेलिओमा किंवा मॅलिग्नंट मेसोथेलिओमा हा फुफ्फुसाच्या कर्करोगाचा घातक प्रकार असून तो फुफ्फुसांच्या पेरीटोरियम या भागाला झडतो. छातीची पोकळी आणि फुफ्फुसांच्या मध्ये असलेल्या उतींच्या पातळ थराला पेरीटोरियम असे म्हणतात. मेसोथेलिओमा हा कर्करोगाचा प्रकार असाध्य मानला जातो. या व्याधीचे निदान झाल्यावर रुग्ण वर्षभरात मृत्यू पावतो. अॅस्बेस्टॉसच्या संपर्कात येणार्या व्यक्तींना मेसोथेलिओमा होण्याची शक्यता अधिक असते. 1960 मध्ये ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ मध्ये अॅस्बेस्टॉस आणि मेसोथेलिओमाचा संबंध सिद्ध करण्यात आला होता. 1999 पासून इंग्लंडमध्ये घरांच्या निर्मितीत अॅस्बेस्टॉसचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मेसोथेलिअम सेल्स म्हणजे छातीच्या, पोटाच्या आणि हृदयाच्या पोकळीतील वैशिष्ट्यपूर्ण पेशी होत. या पेशींपासून बनलेल्या उतींना मेसोथेलिअम म्हणतात. या उती वंगणासारखा द्रवपदार्थ निर्माण करून या पोकळ्यांमधील अवयवांना संरक्षण देतात. या द्रवपदार्थांमुळेच फुफ्फुसे श्वसनादरम्यान छातीच्या पोकळीत हलू शकतात. या पेशी आणि उतींची अनियंत्रित वाढ झाली तर गाठी तयार होऊन मॅलिग्नंट मेसोथेलिओमा होतो. हा विकार अॅस्बेस्टॉसच्या संपर्कात आल्यावर होत असल्याने अॅस्बेस्टॉसची निर्मिती करणार्या कंपन्यांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील 30 वर्षांमध्ये या
विकारामुळे दहा लाख मृत्यू होण्याची शक्यता आहे. या विकाराबरोबरच एकूणच फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल अधिक जनजागृती होणे अपेक्षित असून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन बंद करणेही आवश्यक आहे. या जागतिक लंग कॅन्सर दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याचा स्वत:पुरता निर्णय घेतला तरी मोठे कार्य होऊ शकेल.
— महेश जोशी
Leave a Reply