नखं कुरतडणे ही अतिशय वाईट सवय आहे… यावर कोणाच दुमत नक्कीच नसेल! अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेकांमध्ये ही सवय आपण पाहिली असेल. वाचकांपैकीसुद्धा अनेकांना हाताच्या बोटांची नखे कुरतडायची सवय असेल कदाचित. खूप जण या सवयीपासून लांब जायचा प्रयत्न देखील करतात, पण ते तितकसं सोप नाहीये, हे ही आपण जाणता. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना, सेलिब्रिटीजनादेखील आपण ही सवय असलेले पाहिले आहे. एका सर्वेनुसार लहान मुलं किंवा वयात येणाऱ्या मुलांमध्ये नख कुरतडण्याचे प्रमाण जास्त असते व ते वय वाढते तसे हळू हळू कमी देखील होते. वयाने मोठ्या असलेल्या माणसांमध्ये ही सवय क्वचितच दिसून येते.
देहबोलीचा विचार केला तर लहान अथवा मोठे, कोणीही नख खाताना किंवा कुरतडताना वाईटच दिसते. मानसशास्त्रानुसार ती एक डीसऑर्डर आहे. पण, हा काही गंभीर मानसिक आजार नव्हे… तर मानसिक अस्वस्थतेच एक लक्षण आहे.
का बर नख कुरतडतात?
मानसिक अस्वस्थता, ताण-तणाव, एकटेपणा, कंटाळा, विचारांमध्ये अति गढून जाणे किंवा परिस्थितीवरील आपले नसलेले नियंत्रण… यापैकी कशामुळेही नख कुरतडण्याची सवय लागू शकते. परीक्षेचा ताण, भीती, इंटरव्ह्यूचे टेन्शन, एखादा निर्णय घेताना येणारा ताण, कंटाळा आलेला असणे, यापैकी कशाहीमुळे आपल्याला नख कुरतडण्याची इच्छा होऊ शकते. ताण-तणावाची कारणे वेगवेगळी असू शकतात. यामध्ये काही क्रॉनिक कारणे असू शकतात व काही तात्कालिक कारणे पण असू शकतात. उदा. एखाद्या मुलीला जर आपला रंग सावळा आहे किंवा आपल्याला पिम्पल्स आहेत यामुळे न्युनगंड वाटत असेल तर त्यामुळे जेंव्हा ती चार माणसांमध्ये मिसळेल त्या वेळी तिला एक प्रकारचा नर्वसनेस आणि अस्वस्थता येऊ शकते व त्या अस्वस्थतेमुळे ती नख खाणे, बोटांच्या अथवा हातांच्या अस्वस्थ हालचाली आदी करू शकते. कधी कधी एकटेपणामुळे काही सुचत नाही म्हणून देखील नख कुरतडली जातात.
या सवयीचे परिणाम
ही नक्कीच वाईट सवय आहे. यावरून समोरच्याला आपल्याला कसला तरी ताण आला आहे, हे लगेचच लक्षात येते. आपण नर्वस होतो आणि नख कुरतडतो, म्हणजेच आपल्याला समोर आलेल्या परिस्थितीला शांत मनाने सामना करता येत नाहीये किंवा आपण अशा परिस्थितीत मनाने अस्वस्थ होतो, असे समोरच्याचे आपल्याबद्दल मत होऊ शकते, जे नक्कीच चांगले नाही. मग आपली ही सवय जर ऑफिसमध्ये आपल्याबद्दलचे मत खराब करणार असेल, इंटरव्ह्यूमध्ये आपले इम्प्रेशन खराब करणार असेल, तर या सवयीपासून कसे दूर जाता येईल हे पाहिले पाहिजे.
कशी सोडवायची ही सवय?
आता आपल्याला माहीत आहे की आपण नर्वस झालो किंवा काही ताण आला की किंवा एकटेपण वाटून कंटाळा आला की आपण नख चावतो / कुरतडतो. मग यावर उपाय काय? मैत्रिणींसाठी यावर सगळ्यात सोपा उपाय आहे की नखांना अतिशय उग्र वासाचे किंवा कडवट चवीचे नेल पॉलिश लावा!! त्यामुळे नख खाणे कमी होईल. थोडा अवघड उपाय म्हणजे, शांतपणे विचार करा आणि लक्षात घ्या की आपल्याला कशाचे टेन्शन येते. त्यावर कशी मात करता येईल याचा देखील विचार करा आणि अशावेळी, आपले हात एकमेकांत गुंफून ठेवून पहा. अर्थात सतत हात गुंफून ठेवणेही चांगले नाही. परंतु, नखं कुरतडण्याची सवय सुटेपर्यंत हे करून पहायला हरकत नाही.
तसेच, मुळात मानसिक एकटेपणा घालवण्यासाठी आपले मन चांगल्या छंदात अथवा चांगल्या गोष्टीत रमवण्याचा प्रयत्न करा. मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळा. सतत मनाला सांगा की ही सवय चांगली नाही आणि चार-चौघात मिसळल्यानंतर आपण नख खातो आहे असे लक्षात येताच ते लगेच थांबवा. आपला आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा. आपला रंग, रूप, भाषा, शिक्षण, आपली परिस्थिती याचा कमीपण वाटून घेऊ नका. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल न्यूनगंड बाळगण्यात आपला फायदा नाही, पण ज्या गोष्टीमध्ये बदल करणे आपल्या हातात आहे, त्या बदलण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा आणि मग पहा, ही सवय कधी सुटली हे तुम्हाला आठवावं लागेल!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-मृणाल काशीकर
Leave a Reply