अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुणीही कांही न बोलण्याची विलक्षण स्वभाव शैली, ह्याना जमलेली असते. आपण भारतीय गप्पा मारणे, मन मोकळे करणे, नको त्या चौकशा करीत समर्थानाचे मार्ग शोधण्यात तरबेज असतो. ” एक हात लाकूड, त्याची दहा हात धलपी ” ह्या प्रमाणे वेळ घालविण्याची कला साध्य केलेले.
निवृत्तीचे वय. सकाळ संध्याकाळ फिरावयास जाणे. अचानक बागेमध्ये माझ्याच वयाचे एक गृहस्थ डॉ. सुब्बुराज भेटले. दक्षिण भारतातले प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले. एकमेकाचा परिचय झाला. ते पण थोड्याश्या काळाकरीता त्यांच्या मुलीकडे आले होते. विचारांची देवान घेवन झाली. थोड्याच वेळांत लक्षांत आले की आमची वैचारीक बैठक, विषय आवडी निवडी बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत. वेव्ह लेंग्थ जमली म्हणतात तसे झाले. मुख्य म्हणजे दोघेजण भारतीय असून मित्र व मन मोकळे करण्यासाठी कुणाच्या तरी सहवासाची गरज पूर्ण झाली. दोघेही आनंदी व समाधानी झालो. वेळ ठरवून दररोज भेटू लागलो. वेळ खूप मजेत जात होता. दोघांजवळ पाठीशी जीवनामधल्या प्रचंड अशा अनुभवाचे गाठोडे होते. शिवाय अध्यात्म, समाजाची कुटूंबाची बदलत चाललेली रचना वा घडी ह्यावर बोलत असू. शिक्षण क्षेत्रामध्ये होत जाणारे बदल, राजकारण अर्थकारण ह्यात होणाऱ्या प्रचंड उलाढाली, वातावरणामधले बदल इत्यादी एक नाही अनेक विषय प्रसंगानुसार हाताळले जात होते. चर्चा होत होती. मतासाठी आग्रह होत होता. दोघांचे ही अनुभव मनाला चटका देणारे, रोमांचकारी, हसवणारे, राग आणणारे, निसर्ग वा ईश्वर अप्रतीम अस्तित्वाची जाणीव देणारे होते. आगदी थोड्याशा काळांत दोघानाही एकमेका बद्दल अस्था आदर व सहवासाचे प्रेम वाटू लागले. भेटण्याची वेळ ह्याची उत्सुकता होवू लागली. वेळेचे बंधन नसल्यामुळे पूर्ण आनंद उपभोगला जाई. कधी बागेत, कधी नदीकिनारी, जात असू. वृद्धापकाळी जे लागते ते मिळू लागले. चांगली हवा, चांगले जेवण, चांगली बौद्धीक चर्चा, शरीराला तजेले करणारे फिरणे, सारे आनंदी व समाधानी चालले होते.
अचानक कौटूंबीक वैयक्तीक कारणास्तव त्याना भारतात परत जावे लागले. ते माझा प्रेमाचा व निराशमय निरोप घेऊन ते निघून गेले.
नदीकिनारी खडकावर बसलो होतो. नदीला पूर आलेला होता. ती दुथडी भरुन वाहत होती. मन खिन्न झालेले होते. कसलीतरी निराशा मनाला बेचैन करीत होती. डॉ. सुबुराज ह्यांचा अचानक परीचय झाला. फार थोड्या दिवसाचा त्यांचा सहवास लाभला. त्या सहवासाची तिवृता, ओढ, आपूलकी, आदर, वैचारीक प्रेमाची देवाण घेवाण, ही हा छोटासा काळ आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो ही जाणीव होत होती. सहवास किती काळ असावा ह्यापेक्षा कसा असावा हेच महत्वाचे ठरते.
माझे लक्ष वेधले गेले ते दुर अंतरावरावरुन दोन दिशानी पाण्यांत वाहात येणाऱ्या दोन लाकडाच्या ओंडक्याने. पाण्याच्या लाटांनी दोन्ही ओंडके जवळ आणले. एकमेका जवळ आले. प्रवाहा मध्ये बरेच अंतर ते एकत्र राहून वाहात होते. अचानक पाण्याच्या उसळणाऱ्या लाटेने त्यांना वेगळे केले. दोघांचीही दिशा व प्रवाह बदलले. ते वेगळ्या दिशेने निघून गेले. नजरेच्या टापू आड झाले.
निसर्ग, वातावरण, परिस्थीती ही अशीच आपल्याशी खेळ खेळत असते. जीवनाच्या टप्यावर प्रत्येकजण एकमेकास भेटतो. सह चालतो. आणि एक दिवस दुर निघून जातो. पाण्याचे अस्तित्व, लाटांचे वाहणे, आणि ओंडक्यांचे अवलंबून असणे, ह्याची जर खऱ्या अर्थाने जाणीव झाली तर जीवनचक्राचे ज्ञान झाले म्हणावे लागेल. त्यांत नसेल निराशा, न खंत, न दुःख. फक्त एक सत्य अनुभव—जीवनाचा मार्ग — जीवन चक्र.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
नमस्कार.
लेख आवडला. अनेक वृद्धांना असा अनुभव हवा असतो, पण तो मिळेलच असें नाहीं. तुम्ही नक्कीच लकी.
– ओंडक्यांचें जें उदाहरण तुम्ही दिलें आहे, त्यासाठी संस्कृतमध्ये एक म्हण आहे – ‘यथा काष्ठंच काष्ठंच’.
– यावरूनच ग.दि. मा. गीत रामायणात म्हणतात- ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट । एक लाट तोडी दोघां, पुन्हां नाहीं गाठ ।’
स्नेहादरपूर्वक,
सुभाष स. नाईक