“We are at the beginning of a Golden Age of journalism — but it is not journalism as we have known it. Media futurists have predicted that by 2021, citizens will produce 50 per cent of the news peer-to-peer. However, mainstream news media have yet to meaningfully adopt or experiment with these new forms.”
न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे. 2003 मधे इराक युद्धात अहमद या नागरिकाने युद्धभूमीवरून थेट धाडलेल्या बातम्या जागतिक स्तरावर गाजल्या होत्या. दोन देशांमधे जेंव्हा युद्ध होते तेंव्हा तेंव्हा दोन्ही देशाच्या प्रसारमाध्यमातून येणार्या बातम्या या बर्याच वेळा एका बाजूला झुकलेल्या आणि त्यामुळे वस्तुस्थितीपासून दूर जाणार्या असतात असा आपला आजवरचा अनुभव आहे. या अहमदने मात्र जे घडते आहे तेच सांगितले, जे पाहिले ते कथन केले त्यामुळे जागतिक पातळीवर सुद्धा या युद्धाची सत्यस्थती समजली आणि त्यावरून जागतिक संबंधांचा अभ्यास करता आला. 1988 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीत ही नागरिक पत्रकारितेची चुणूक पहायला मिळाली. निवडणूकामधे काय होणार, कोण निवडून येणार, जनतेला काय हवे आहे. याविषयी प्रस्थापित पत्रकारांच्या अंदाजाबद्दल जनमानसात एक अविश्वासाची भावना निर्माण झाली होती. आणि या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातले वास्तव या नव्या पत्रकारितेमधून पुढे आले.
१९०४ मधे रादरगेट या नावाने प्रसिद्ध असलेली ब्लॉगर्सच्या यशस्वी पत्रकारितेची गाजलेली घटना इथे सांगावीशी वाटते. डॅन रादर हा सीबीएस या प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन चॅनलचा नावाजलेला पत्रकार आपल्या सिक्स्टी मिनिट या कार्यक्रमात तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या राष्टीय संरक्षण सेवेसंबंधी काही कागदपत्रे त्यांनी वाहिनीवर दाखविली. ती विश्वासार्ह नाहीत असा दावा काही ब्लॉगर्स नागरिकांनी पुराव्यासहित केला. अर्थातच वाहिनीला माफी मागावी लागली आणि डॅन रादर यांनी आपली सेवा निवृत्ती त्याचा विहित कालावधी संपण्याच्या एक वर्ष आधीच 2005 मधे जाहिर केली. एका नावाजलेल्या पत्रकाराची माहिती खोटी ठरवणे आणि पुराव्यानिशी ती सिद्ध करणे हा नागरिक पत्रकारितेचा सर्वोत्तम नमुना मानायला हवा. गेल्या 10-12 वर्षात ही पत्रकारिता इंटरनेटच्या प्रसारामुळे सर्वसमावेशक आणि सुनियंत्रित स्वरूपात पुढे येऊ लागली आहे. वेब2.0 या नावाने प्रसिद्ध असलेली संगणक प्रणाली 2004 मधे विकसित झाली. माहितीचे आदानप्रदान त्यामुळे सुकर झाले. लोकांचा सहभाग मोठया प्रमाणात होऊ लागला. ब्लॉग,चर्चास्थळं, ब्रॉडकास्टींग यांच्या माध्यमातून घटना सर्वदूरपर्यंत पोहोचवता येऊ लागल्या. यातून या पत्रकारितेची कक्षा विस्तारली.
आपल्याला असा प्रश्न पडेल की सर्वसाधारण नागरिक म्हणून या पत्रकारितेचे नेमके महत्त्व काय आहे? यांनी खरंच समाजामधे येणारी माहिती अधिक प्रगल्भ, नि:पक्षपातीपणे येत आहे का? एकूणच बातम्यांचा स्तर सुधारला आहे का? तर याचे उत्तर बऱ्याच अंशी होकारार्थी येईल. सिटिझन पत्रकारिता हा जनतेच्या सहभागातून पुढे आलेला प्रवाह असल्यामुळे त्याला एक अंगभूतच विश्वासार्हता प्राप्त झालेली आपल्याला दिसेल.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची हत्त्या चित्रित करणारा एक सर्वसाधारण नागरिक हा आद्य नागरिक पत्रकार मानला जातो.
दिल्ली मधे नुकत्याच झालेल्या जंतरमंतर इथल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे ते एका रात्रीत देशाचे महानायक बनले. यामधे राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांचा वाटा मोठा आहेच पण इंटरनेट माध्यमातून भारतभर तरूणाईमधे यामुळे निर्माण झालेली चैतन्यमय सळसळ यांनी या चळवळीला फार मोठी ताकद दिली. एक जनाधार दिला. फेसबूक आणि ट्विटर या माध्यमातून लाखो लोकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. माहितीची देवाणघेवाण करणं आणि त्यावरून मतं बनवणं हे पारंपरिक पत्रकारितेचे काम आता हा सिटीझन जर्नालिस्ट प्रभावीपणे करू लागला आहे. भल्याभल्या राजकीय नेत्यांना जे जमले नाही ते या नगर जिल्ह्यातल्या सामान्य निवृत्त लष्करी सैनिकाने ८ दिवसात करून दाखवले. अण्णा हजारे हा न्याय आणि भ्रष्टाचार विरोधात लढणारा एक ब्रँड झाला याचे श्रेय नि:संशयपणे त्यांच्या चारित्र्यसंपन्न इतिहासाला आहेच तसेच ते त्यांच्याबाबत जनमानसात निर्माण होणार्या वाढत्या प्रतिसादालाही आहे.
सिटीझन जर्नालिस्ट हा नि:संशयपणे समाजातील सक्रिय लोकांमुळे पुढे आलेला एक प्रागतिक विचार आहे. समाजाच्या विकासाचा जास्तीतजास्त चांगला विचार समाजच करु शकतो. गेल्या १० वर्षांत २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनींच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे बातम्या आणणार्या बातमीदारांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष गरज यामधे मोठी तफावत पडू लागली. यातूनच बातम्या संकलनामधे समाजाच्या थेट सहभागाची संकल्पना आकार घेऊ लागली. सर्वच महत्त्वाच्या वृत्तवाहिन्यांकडे अशा निवडक पत्रकारांची आता फौज निर्माण झाली आहे.
बातमी म्हटलं की राजकीय,सामाजिक, क्रीडा विषयक, अर्थकारण, वैद्यकीय या परिक्षेत्राचा विचार प्राधान्यानं होत असे पण आता बातमी ही अत्यंत बहुआयामी, समाजातील सर्व स्तरांचा विचार करणारी आणि मुख्यत्वे लोकांच्या भावविश्वाशी अधिक तादात्म्य पावणारी या स्वरूपात पुढे येताना दिसते. खऱ्या अर्थानं आता बातमीचे वस्तूकरण झाल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
अर्थात त्यामुळे ही आपली बातमी नावाची वस्तू आकर्षक, विश्वसनीय आणि इतरांपेक्षा हटके असावी असे सर्वच प्रसारमाध्यमांना वाटू लागले. यातून समाजाच्या सर्वांगापर्यत जाण्याची या वृत्तसंकलन करणार्या संस्थांना निकड भासू लागली आणि यातूनच ही पत्रकारिता सर्वमान्य होऊ लागली. अर्थात या पत्रकारितेबद्दल काही आक्षेपही आहेत. ज्यांना पत्रकारितेचं प्राथमिक शिक्षण नाही त्यांनी या क्षेत्रात अशा प्रकारे काम करणे हे काहींना मान्य नाही. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामुळेच एरवी माध्यमांना कळणारही नाहीत अशा घटना बातम्या होऊन पुढे येऊ लागल्या आहेत. अमेरिकच्या ट्विन टॉवरवर झालेला दहशतवादी हल्ला, २६.११ ला मुंबईवर अतिरेक्यांनी घातलेली झडप या सारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटनेत सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या ब्लॉग्ज वरून प्रसारित केलेली माहिती तपासकार्यामधे उपयोगी पडल्याचे सिद्ध झाले आहे.
आपण एक लक्षात घेतले पाहिजे की जेंव्हा कोणतीही घटना घडते तेंव्हा तिथे पत्रकार उपस्थित असेलच असे नाही. किंबहुना बऱ्याच प्रसंगी तो नसतोच. या घटनेला साक्षीदार असतो तिथे त्यावेळी हजर असलेला सर्वसाधारण माणूस, नागरिक. त्यात कोणी विद्यार्थी असतो, चाकरमानी असतो, फेरीवाला असतो कुणी गृहिणी असते तर कुणी व्यापारी. यातूनच पुढे येतो नागरिक पत्रकार ज्यांच्याकडे असते घटनेची इत्यंभूत माहिती, त्याला हे पत्रकारितेच्या शास्त्रानुसार कसे सांगायचे हे माहिती नसते हे मान्य करूनही सत्यता हा बातमीचा महत्त्वाचा निकष मानला तर माध्यमांतून आँखो देखा बातमी मिळते हे निश्चित.
त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर्स जेंव्हा घिरटया घालत होती ती बातमी. एका संगणक अभियंत्याने ती घरघर ऐकली आणि ती माहिती ट्विटर वर टाकली. त्यावेळी त्याच्या संपर्कात केवळ ७५० व्यक्ती होत्या पण या बातमीने त्याच्या संकेत स्थळावर झुंबड उडाली. त्याची संख्या झाली ८६ हजार. आंतरराष्ट्रीय महत्त्वाची बातमी सर्वप्रथम जाहिर करण्याचे ६श्रेय अशाप्रकारे एका नागरिक पत्रकाराला मिळाले. इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांना राजीनामा देण्यास भाग पाडून पदच्यूत करण्यात नागरिक पत्रकारानी केलेल्या चळवळीचा वाटा मोठा आहे.
एक जागतिक चळवळ म्हणून याकडे आता पाहिले जात आहे त्याचा आवाकाही आता मोठा होत आहे. ऑल व्हॉइसेस सारख्या संस्थेकडे आज जगभरातून 5 लाख नागरिक पत्रकार आपल्या भागातल्या घटना नियमितपणे या संकेतस्थळावर नोंदवत आहेत.
नागरिक पत्रकारितेची काय वैशिष्टये आहेत याचा नीट विचार केला तर या सगळया सोपस्कारातून आपल्याला अनेक भौत्रिक गोष्टींची माहिती मिळते, नव्या संकल्पना पुढे येतात. वेगवेगळी माणसं समजतात, अनेक प्रकल्प साकार होतात. आपल्याला रूची असणाऱ्या मानवी व्यवहारातील काही अद्भूत, कधी मनाला चटका लावणार्या तर कधी स्फूर्ती देणाऱ्या सत्य घटना आपल्या पर्यावरणाचा भाग बनतात. आणि हे सगळं होण्याचं कारण म्हणजे ही माहिती देणारा कुणी पगारी पत्रकार नसतो, केवळ कर्तव्यबुद्धी आणि व्यवसायाचा भाग यात नसतो. असते एक सूप्त इच्छा सांगण्याची व्यक्त होण्याची. इंटरनेटच्या मायाजालात अनेक ब्लॉग्ज आणि सार्वजनिक संकेतस्थळं ही माणसाच्या याच व्यक्त होण्याच्या अतिव इच्छेतून जन्माला आलेली आहेत. फेसबूक हे संकेतस्थळ तर जगातल्या माणूस नावाच्या समस्त समाजाचं व्यक्त होण्याच्या आणि नातेसंबंध फुलवण्याच्या उर्मीचं आणि ऊर्जेचं एक प्रतीक बनून राहिले आहे. माध्यमजगात होणार्या वेगवान बदलाचा हा पत्रकारितेचा नवा फंडा हा एक सकारात्मक अविष्कार आहे.
अर्थात ही पत्रकारिता सोपी नाही, जाताजाता करण्यासारखी गोष्ट नाही याचं भान आपण ठेवायला हवं. त्यासाठी बातमी कशाला म्हणायची याची प्राथमिक जाण आपल्याला हवी. कारण आपण पाठवत असलेल्या घटनेचा तपशील हा सर्वसाधारण वाचकांना, श्रोत्यांना, प्रेक्षकांना भावणारा हवा. तुमचे वैयक्तिक अनुभव सार्वत्रिकतेची डूब घेऊन पुढे यायला हवेत. सार्वजनिक जीवनात वावरताना तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, सरकार, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून तुम्हाला येणारे अनुभव प्रभावीपणे आणि थोडक्यात मांडण्याची हातोटी तुमच्याकडे हवी. आपल्या आजूबाजूला डोळसपणे पाहाण्याची आणि संवेदनशील मनाने या घटना टिपण्याची एक नजर तुमच्यात विकसित झाली तर तुम्ही एक आदर्श नागरिक पत्रकार होऊ शकता.
दोन महिन्यांपूर्वी पावसाळ्यात इंदोर जवळील व एका पर्यटनस्थळी वाहुन गेलेल्या माणसांची दृश्ये ही अन्य एका पर्यटकानं मोबाईलमध्ये चित्रित करून चॅनलला दिली अन् सर्वांना पहाता आली. असंख्य अपघातांची तिथे हजर असलेल्या सामान्य नागरिकांनी चित्रित केलेली दृश्ये चॅनलला खूप उपयुक्त ठरतात.
२००५ मधे आपल्या देशात माहितीचा अधिकार हा हक्क सर्वसामान्य नागरिकांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे सजग नागरी मंच, सिव्हिल सोसायटी या संकल्पना मूळ धरू लागल्या. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने गोपनीय अशी माहिती सोडून बाकीची सर्व माहिती मागणी केल्यास नागरिकांना उपलब्ध करून देणे कायद्याने अनिवार्य झाले. संपूर्ण राज्यकारभारात, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात एक पारदर्शकता निर्माण झाली. या साऱ्या घडामोडींमुळे नागरी पत्रकारितेच्या विकासाला चांगला हातभार लागला.
आपल्या देशात या वर्षाच्या सुरवातीला गाजलेला कॉमनवेल्थ खेळातील भ्रष्टाचार आणि मुंबईच्या आदर्श सोसायटीतील अनियमितता ही वृत्तवाहिन्यांनी चव्हाटयावर आणली त्यात त्यांच्या शोधपत्रकारितेचा मोठा वाटा आहेच पण सर्वसामान्य नागरिकांकडूनही त्यांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. सजग नागरिक हा एक चांगला पत्रकार होऊ शकतो हेच या प्रसंगाने सिद्ध झाले.
सिटीझन जर्नालिस्ट ही आता मान्यताप्राप्त संकल्पना झाली आहे. अमेरिकेतील महत्त्वाच्या राजकीय परिषदांना आता या मंडळीना अधिकृत निमंत्रणे येऊ लागली आहेत. ऑलिंपिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमंत्रणांमधे सिटीझन जर्नालिस्ट यांचा होणारा समावेश हे याला मिळत असलेल्या लोकमान्यतेचे उदाहरण म्हणता येईल. अमेरिके सारख्या संपन्न देशात आज नागरिकांच्या बातमी मिळण्याच्या स्त्रोतात बदल झाल्याचे दिसतात. आता वेबसाईट्स वरून, ट्विीटर वरून येणाऱ्या बातम्या जास्त वाचल्या जातात. यात मिळणार्या बातम्या या नागरिकांनी परस्परात वितरित केलेल्या अशा स्वरूपाच्या असतात. साहजिकच त्यामुळे नागरीक पत्रकारितेला मिळणारा प्रतिसाद हा वाढत आहे.
विकीपिडीया हे या वाचकांच्या सहभागातून त्यांनी तयार केलेल्या मजकूराच्या, माहितीच्या महाजालामुळे केवढया प्रमाणात विस्तारित झाले आहे ते आपण पहातो आहोतच. विकीन्युज हे त्यांचे संकेतस्थळ हे नागरिक पत्रकारितेलाच वाहिलेले आहे. गुगल हे असंच एक शोध संकेतस्थळ यावर कोणतीही माहिती एका क्लिकसरशी आपल्या पुढयात येते यावरचा बराच मजकूर हा सर्वसामान्य नागरिकांच्या माहिती स्त्रोतातून उपलब्ध झालेला असतो.
अर्थात सोशल साईट्सवर टाकला जाणारा प्रत्येक मजकूर म्हणजे नागरिक पत्रकारिता नव्हे याचे भान ही बाळगणे आवश्यक आहे. म्हणूनच या पत्रकारितेवर काही जण प्रतिकूल अभिप्रायही व्यक्त करताना दिसतात. यातला मुख्य म्हणजे ही पत्रकारिता नाही, एखाद्या ठिकाणी हजर असलात आणि तुमच्याकडे कॅमेरा असला म्हणजे तुम्ही पत्रकार होत नाही. पत्रकारितेचे रितसर शिक्षण न घेता पत्रकार म्हणून मिरवणे याला काही जणांचा विरोध आहे. शिवाय बातमी कशाला म्हणायचं याचं ज्ञान अनेक जणांना नसतं त्यामुळे बऱ्याच वेळा निरर्थक मजकूर, आणि अनावश्यक माहिती पुढे येते. शिवाय ती कशी मांडायची याचे एक शास्त्र आहे. नागरिक पत्रकारांनी ते समजावून घेतल्यास अनेक प्रसार माध्यमं ते प्रसिद्ध करण्यास तयार होतात असा अनुभव आहे. स्थानिक घडामोडी आपल्या विभागातल्या नागरिकांपर्यंत पाहोचवणे आणि सामाईक प्रश्नांवर, समस्यांवर परस्पर विचारविनिमयामधून मार्ग शोधणे यासाठी सिटीझन जर्नालिस्ट हे अत्यंत उपयुक्त असे व्यासपीठ आहे. तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संपर्क सुविधांमुळे एरवी आत्म केंदि्रत झालेला समाज आता हळूहळू बोलायला लागला आहे. अर्थात जगाच्या बातम्या समजून घेताना आपल्या शेजारच्या सदनिकेत रहाणाऱ्या मुलाचे नाव काय? तो कितवीत आहे हे माहित नसणार्यांची संख्याही शहरी भागात लक्षणीय आहे. आपण फक्त माहितीचे भुकेले आहोत. एवढे असून चालणार नाही. आपली संवेदनशीलता, आत्मियता ही जाणीवपूर्वक वाढवायला हवी. कारण आपण शेजाऱ्याचा विचार केला तरच समाजाचा, देशाचा विचार करू शकू. आपण ग्लोबल बनताना आपला लोकल चेहरा पुसला जाणार नाही याची काळजी आता आपल्याला घ्यायला हवी. यातच खऱ्या नागरिक पत्रकाराची मूल्यं दडलेली आहेत. नागरिक पत्रकाराची भूमिका ही ‘जागल्याची’ असली पाहिजे. आप ्याला मिळालेली माहिती जर जनहितविरोधी असेल अथवा कल्याणकारी असेल तर ती त्यानं चॅनल अथवा वृत्तपत्रांना त्वरित कळवायला हवी. त्या बातमीची सत्यासत्यता, महत्व आणि गांभीर्य ठरविण्याचं काम माध्यमं करतील. त्यासाठी सामान्य नागरिक पत्रकाराने कायदा हातात घेवू नये अथवा त्याचा गैरवापर करू नये ही त्याच्यावरची मोठीच जबाबदारी आहे.
डॉ. केशव साठये
9,सावरी सोसायटी, हॅपी कॉलनी, कोथरूड,
पुणे 411029 मो: 98221 08314
keshavsathaye@gmail.com
www.tvmediamasters.com
— डॉ. केशव साठये
Very nice information about citizens journalism. And useful.