नाचणी हे एक दुर्लक्षित धान्य आहे. आपल्याकडे नाहीतरी रंगाला अतिमहत्त्त्व देण्याची पद्धत आहेच. नाचणी मुळात मरून लाल रंगाची असते. आणि तिचं पीठ जरासं काळपट रंगाचं होतं. नाचणीची भाकरीही काहीशी लालसर काळपट रंगाची होते. त्यामुळे कदाचित नाचणी आपल्याकडे म्हणावी तितकी खाल्ली जात नाही. अपवाद दक्षिणेकडच्या राज्यांचा. कर्नाटकात नाचणीचं सर्वाधिक उत्पादन होतं. कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात नाचणी भरपूर प्रमाणात खाल्ली जाते.
के. टी. आचार्य या खाद्यसंस्कृती अभ्यासकांच्या मते नाचणी हे मूळचं पूर्व आफ्रिकेतलं धान्य. नंतरच्या काळात ते भारतात आलं आणि आता भारतात नाचणीचं ब-यापैकी उत्पादन होतं. नाचणीमध्ये आवश्यक असे अमायनो एसिड्स भरपूर असतातच, शिवाय कॅल्शियमचं प्रमाणही खूप असतं. त्यामुळेच नाचणीचा आपल्या आहारात समावेश करणं लाभदायक ठरतं.
मी नाचणीचे डोसे करतेच. त्याची रेसिपीही यापूर्वी मी शेअर केलेली आहे. शिवाय मी आठवड्यातून निदान तीनदा नाचणीची भाकरी खाते. कधी नुसती नाचणी तर कधी त्यात ज्वारी किंवा बाजरी मिक्स करून मी भाकरी करते. परवा नाचणीच्या डोशांसाठी उडदाची डाळ भिजवून ठेवली होती. रात्री ती वाटून त्यात दुप्पट नाचणीचं पीठ घालून मी ते आंबवते आणि सकाळी त्यात कांदा-मिरची-कोथिंबीर घालून डोसे करते. तर डाळ वाटल्यावर परवा मी त्यात १ वाटी नाचणीचं पीठ आणि १ वाटी बेसन घालून आंबवायला ठेवलं आणि सकाळी त्याचे आप्पे केले. अतिशय उत्तम झाले होते. आज त्या आप्प्यांचीच रेसिपी मी शेअर करणार आहे.
नाचणी-बेसन आप्पे
साहित्य – १ वाटी उडदाची डाळ (४-५ तास भिजवून ठेवा), १ वाटी नाचणीचं पीठ, १ वाटी बेसन, ३-४ हिरव्या मिरच्या-७-८ लसूण पाकळ्या-१ इंच आलं-अर्धी वाटी कोथिंबीर (हे सगळं एकत्र वाटून घ्या.), १ मोठा कांदा बारीक चिरून, मीठ चवीनुसार, थोडंसं तेल
चटणी साहित्य – अर्धी वाटी डाळं, पाव वाटी ओलं खोबरं, २-३ हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं, भरपूर कोथिंबीर (निदान वाटीभर) चवीनुसार मीठ
आप्पे कृती –
१) भिजलेली उडदाची डाळ मिक्सरमधून वाटून घ्या.
२) त्यात नाचणीचं पीठ आणि बेसन घाला. सगळं हातानं चांगलं फेसून घ्या.
३) त्यात चवीनुसार मीठ घाला आणि रात्रभर आंबवायला ठेवा.
४) सकाळी त्यात आलं-लसूण-मिरची-कोथिंबिरीचं वाटण आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
५) आप्पे पात्रात थोडंथोडं तेल घालून आप्पे घाला. दोन्ही बाजूंनी छान लाल होऊ द्या.
चटणी कृती –
१) दिलेलं सगळं साहित्य एकत्र करून वाटा. त्यात थोडं पाणी घालून जरासं सरबरीत वाटा. अगदी पेस्ट करू नका.
२) हवी असल्यास वरून मोहरी-हिंग-उडदाची डाळ-कढीपत्ता अशी फोडणी द्या. नाही घातली तरी चालतं
आप्पे आणि चटणी खायला घ्या. इतक्या साहित्यात ३५-४० आप्पे होतात. आप्पे पात्र नसेल तर उत्तप्पे करा.
मग करून बघा आणि कसे झाले तेही कळवा.
या पेजवरची ही तसंच इतर सर्व पोस्ट्स तुम्ही माझ्या www.shecooksathome.com या ब्लॉगवरही बघू शकता.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.
#healthiswealth #dietplan #Mumbaimasala #अन्नहेचपूर्णब्रह्म #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #नाचणी #नाचणीआप्पे #नाश्ता #नाश्त्याचेपदार्थ #breakfast #healthybreakfast
सायली राजाध्यक्ष
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
Leave a Reply