काल २६ जानेवारी होती… दर कारगील दिन ,१५ आँगस्ट , २६ जानेवारी अशा दिवशी हमखास मला आठवण होते.. आर. के. पठाणिया यांची.. मी १०वीत असतानाची गोष्ट आहे… करगील युध्द सुरु होत…शाळेत मग एक उपक्रम म्हणुन आम्हा सगळ्यांना कोरे टपाल पत्र हातात दिली.. आणि सांगितल की सैनिकांना पत्र लिहा.. सांगा आम्ही तुम्हाला विसरलो नाहीत… आम्ही तुमच्या सोबत आहोत…मला नाही माहित त्यावेळी इतर मुलींनी त्यांच्या पत्रात काय लिहल होतं.. पण मी खुप मनापासुन ते पत्र लिहलं होत… नेमकं काय लिहल होतं ते नाही आठवत.. पण लिहीताना डोळ्यात पाणी होतं.. झालं.. ते पत्र कारगीलला जाऊन पोहोचलं… जशी सगळ्याची पत्र पोहचली…तसचं.. मग नंतर काही मुलींना त्या पत्राची उत्तर खुद्द सैनिकांकडुन आली… सगळी उत्तर औपचारीक होती… पण सैनिका कडुन पत्र? पेपरात छापुन सुध्दा आलेलं.. मी जराशी हिरमुसले होते कारण माझ्या पत्राला कोणाचचं उत्तर नव्हत मिळाल..आणि मी ते पत्र खुप मनापासुन लिहिलेलं… तशी सगळ्यांना उत्तर नव्हती आली..पण.. तरीही..
तो दिवस उजाडलाच पोस्टमन काकांनी मी शाळेत जाण्याच्या तयारीत असतानाच ते सैनिकी पत्र माझ्या हातात दिलं… मला काही सुचतचं नव्हतं काय करावं… खुद्द एका सैनीकाने मला पत्र लिहलं? काय असेल त्यात…? मग मी हळुवारपणे ते आंतर्देशीय सैनिकी पत्र फोडलं… तेव्हा उमगलं ते पत्र फक्त माझ्यासाठी आलेलं..सगळ्यांपेक्षा वेगळं.. एका स्नेहासाठीचं पत्र.. ते पत्र वाचुन खुप भरुन आलेलं…मी शाळेतनं पाठवलेलं त्या दिवशीचं पत्र कुण्या आर.के.पठाणिया नावाच्या सैनिकाकडे पोहचलं होत.. ते (पठाणिया)जणु माझ्याच पत्राची वाट बघत होते.. ते बॉर्डरवर लढत होते.. पुढे वाचतील न वाचतील या शंकेत…एक हुरहुर त्यांच्या मनाला सतावत होती… त्यांच्या सख्या बहिणीच नाव होत स्नेहलता.. ते तिच्या पत्राची वाट बघत होते.. त्यांच्या सगळया
अप्तेष्टांची पत्रं त्यांना मिळाली
होती पण फक्त त्यांच्या लाडक्या बहिणीने त्यांना पत्र पाठवल नव्हतं… पण ज्या वेळेस त्यांच्या हातात माझं पत्र पडल… त्यांना खुप समाधान मिळालं.. ते म्हणाले स्नेहा और स्नेहलता क्या फ़रक पडता है? नाम तो एक ही है.. त्यांनी त्या पत्रात बरचं काही लिहलं होतं… त्या सगळ्यातुन एकच जाणवत होत…त्यांना त्यांच्या बहिणीच पत्र मिळलं याच समाधान.. त्यांना निर्भिडपणे लढायला बळ मिळालं होतं… त्यांनी मला त्यांचा पत्ता आवर्जुन दिला होता… आणि बजावलही होत… ये पत्ता न किसीको देना अथवा फ़ाड देना…
मला पत्राच उत्तर आलं पण ते सगळ्यांपेक्षा वेगळं होत… माझ्या नकळत मला एक भाऊ मिळाला..तोही साधासुधा नाही तर देशासाठी लढणारा सैनिक… त्या नंतर लगेचच राखीपौर्णिमा होती…मी राखी पाठवली… त्याचही उत्तर अगदी संक्षिप्त मिळालं.. त्यापत्रा मध्ये त्यांनी खंत व्यक्त केली होती.. ते मला ओवाळणी पाठवु शकत नव्हते म्हणुन कारण ते खुप उंचावर लढत होते.. त्यावेळी त्यांनी त्यांच्या या स्नेहाला वचन दिलं होतं.. मी परतलो की नक्की ओवळणी पाठवेन म्हणाले होते… पण अजुन मला माझी ओवळणी नाही मिळाली ना नंतर पाठवलेल्या कुठल्याही पत्राच उत्तर…मी अजुनही वाट बघतेय….
प्रत्येक १५ आँगस्ट, २६ जानेवारी आणि आणि कारगील दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम साजरे होतात.. तेव्हा कान असुसले असतात कदाचित कुठेतरी हे आर. के. पठाणिया हे नाव ऐकु येइल..
— स्नेहा जैन
Leave a Reply