निवडणुका जवळ आल्या की अचानक राजकारणी मंडळी जास्तीत- जास्त मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा उद्योग सुरू करतात. मग त्यासाठी राजकारणी मंडळी राजकारणातील आपल्या राजकीय शत्रूंवर आणि प्रसंगी मित्रांवरही टिका करतात, आरोप करतात, त्यांची जुनी लपडी बाहेर काढतात, हे सारे प्रकार निवडणुकीच्या आसपास जास्त होतात हे आता सुज्ञ मतदारांच्याही लक्षात आलेलं आहे. पुर्वीच्या आणि आताच्या मतदारांमध्ये बराच फरक आहे.
पुर्वीचा प्रत्येक राजकारणी आपल्या पक्षाशी, त्या पक्षाच्या विचारांशी आणि तत्वाशी शक्यतो एकनिष्ठ असायचा पण आता तो कपडे बदलावे तसे पक्ष बदलतो आणि नोकरीचा राजिनामा द्यावा तसा पक्षाचा राजिनामा देतो. पुर्वी मतदारांचा एक विशिष्ठ वर्ग कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तो कोणत्या पक्षाला मतदान करेल याचे अचूक अंदाज बांधता यायचे आता तसे ते बांधणे शक्य न राहिल्यामुळेच राजकीय भविष्य खोटी ठरतात आणि राजकीय गणित मांडणार्यांचाही गोंधळ उडतो. आजकालचे राजकारणीच जर आपल्या पक्षाशी एकनिष्ठ नाहीत तर मतदारांनी तरी विशिष्ठ एका पक्षाशी एकनिष्ठ राह्ण्यात काय अर्थ आहे ? असा प्रश्न सुज्ञ मतदाराच्या मनात निर्माण होतोच. कोणत्याही पक्षाने विशिष्ठ एका समुहातील मतदारांना आपल्या ह्क्काचे मतदार म्ह्णून गृहीत धरल्यास तो मुर्खपणा ठरेल. आपल्या देशात नव्याने निर्माण झालेले राजकीय पक्ष इतक्या झपाट्याने का फोफावले त्यामागेही हेच कारण आहे. पुर्वी विशिष्ठ एका राजकीय पक्षावर व त्या पक्षाच्या तत्वांवर असणार्या निष्ठेपोटी मतदारांनी त्या पक्षाच्या उमेद्वाराला मतदान करून निवडून आणलेले असते आणि नंतर त्याच उमेद्वाराला वर्षानुवर्षे मतदारांच्या मनाविरूध्द त्यांच्या माथी मारण्याचा उद्योग सुरू राहिला तर मतदार कधी ना कधी आपली ताकद दाखविणारवच ना ! त्यामुळे यावेळी राजकीय पक्षानी येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेद्वार निवडताना जास्त चोखंदळपणा दाखवायला हवा होता पण तो त्यांनी दाखविलेला नाही. हल्ली कोणत्याच पक्षाला जिंकण्याची खात्री नसल्यामुळे ते बावचळलेत. आपल्या मतदारसंघात काहीही भरीव कार्य न करता पुन्हा मतदारांडे मत मागायला कसे जाणार ? हा शुल्लक विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. लोकसभेत लोकांच्या समस्येबाबत ब्र ही तोंडातून बाहेर काढण्याची तसदी न घेतलेले ही राजकारणी पुन्हा ताट मानेने निवडणुकांना सामोर जाण्यास तयार होतात आणि लोकांकडे पुन्हा मत मागायला त्यांच्या दारात उभा राहतात हा राजकीय निर्लज्यपणाचा कळ्स नाही का ? कोणालाही राजकारणी म्ह्णून आपली भुमिका योग्य प्रकारे चोख बजावायची नसेल तर उगाच खुर्ची गरम करायला राजकारणात यायचच कशाला. राजकारणाच्या पटलावरील जवळ- जवळ आता सर्वच समिकरणे बदलेली आहेत. राजकारणी मंडळीनींही आता मतदारांना गृहीत धरने आता सोडायला हवे. मतदारांना आपल्या बोलण्याने नाही तर कामाने आकर्षित करायला हंवे.
येत्या काही काळात मतदानाच्या माध्यमातून मतदारच राजकीय घराणेशाहीला बाहेरचा रस्ता दाखवतील. आता निवडणुकीत पैशाचा पाऊस जरी पाडला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, जाती- पातीच राजकारण बाजुला पडून प्रगती हे एकमेव उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन लोक मतदान करतील. त्यामुळे आता राजकीय मंडळीना मतदारांच्या भावनांचा आदर करायला शिकायलाच हवे तसे न झाल्यास कदाचित प्रस्थापित राजकीय पक्षानांही आपले अस्तित्व शोधण्याची वेळ आल्याखेरीज राहणार नाही.
— निलेश बामणे
Leave a Reply