पहिल्या महायुद्धात चांदीचा तुटवडा निर्माण झाला,
धातूंच्या नाण्याऐवजी कागदी नोटेतून माझा जन्म झाला !
त्यावेळच्या बँकांनी मला मोठी केली,
एक रुपया आणि अडीच रुपयांनी
माझी पहिल्यांदा ओळख झाली !
बँक ऑफ बंगालने मला मोठा मान दिला,
१००, २५०, ५०० ने माझा भाव वधारला,
पण माझी ओळख कागदावर एका बाजूनेच होती,
कालांतराने दोन्ही बाजूने झाली होती !
ब्रिटिशांनी १९३५ मध्ये भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना केली,
आणि माझ्या भावंडांच्या जन्माची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली,
बँकेने पाच रुपयांची पहिली नोट सहाव्या जॉर्जच्या चित्राने छापली !
रिर्झव्ह बँकेने माझी ओळख दहा, शंभर आणि एक हजारात केली,
१९३८ मध्ये मला दहा हजाराची किंमत दिली !
माझ्या मूल्याची हमी देऊन त्याखाली स्वाक्षरी करण्याची पद्धत
रिर्झव्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर सर जेम्स टेलर यांनी सुरू केली !
११ ऑगस्ट १९४३ रोजी गव्हर्नर बनलेले पहिले भारतीय
श्री.सी.डी.देशमुख यांचीही माझ्यावर स्वाक्षरी दिसू लागली !
त्या काळीही माझी नक्कल करण्याचा प्रयत्न झाला,
पहिल्यांदाच सिक्युरिटी थ्रेडच्या वापराने हाणून पडला !
भारत सरकारने १९४९मध्ये माझ्या बाह्य रुपात बदल केला,
राजाला काढून अशोकस्तंभ आणला !
१९६४मध्ये माझा आकार कमी केला !
आणि १९९६ला माझ्यावर महात्मा गांधीजींचं चित्र विराजमान झालं !
सध्या पाकिटात मला कसबस कोंबण्यात येतं,
प्रदूषणाने मला अधिकच घुसमटायला होतं !
माझ्या अंगावर पेनाने काहीबाही लिहून
माझ्यावर अत्याचार करण्यात होतं !
मला नको तेथे रंग उधळून उधळण्यात येतं,
श्रीलक्ष्मीने दिलेलं माझं स्थान डळमळीत होतं !
आता तर मला प्लास्टिकचे बनविण्याचा घाट घातला जात आहे,
का तर म्हणे माझे आयुष्य वाढविण्याचा प्रयत्न चालला आहे !
जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply