पंचाच्या कुटुंबाला प्रसाद
12 ऑगस्ट 1923 रोजी जन्म झालेल्या एका बालकामुळे पुढे कसोटीविश्वात एक अद्भुत घटना घडली. जॉन केनेथ कॉन्स्टन्टाईन हॉल्ट हे त्याचे नाव. 15 जानेवारी 1954 रोजी जमैका बेटांवरील किंग्स्टन शहरात असलेल्या ‘बिना’त (सबिना पार्क या मैदानाचे स्थानिक नाव) वेस्ट इंडीज आणि इंग्लंडदरम्यान पहिला कसोटी सामना सुरू झाला. हा सहा दिवसांचा सामना होता. पहिल्या दिवस अखेर पदार्पणवीर हॉल्ट 76 धावांवर नाबाद होता. दुसर्या दिवशी त्याने आपल्या कालच्या धावांमध्ये 18 धावांची भर घातली. ब्रायन स्टॅथमच्या एका चेंडूवर पायचित दिला गेल्याने त्याचे शतक षटकाराएवढ्या अंतरावरून हुकले. हॉल्टचा हा हुकलेला डाव (हॉल्टचे हे घरचे मैदान) प्रेक्षकांना खपला नाही. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणार्या श्रीमती पेरी बर्क आणि चिरंजीव पेरी बर्क यांच्यावर हल्ले करण्यात आले. ते फारसे गंभीर नव्हते पण हल्ल्यांमागचे कारण – हॉल्टला जे बोट आभाळाकडे उठल्यामुळे डावातून उठावे लागले ते बोट पंच पेरी बर्क यांच्या मालकीचे होते!
फ्रॅंक वॉरेल तंदुरुस्त नसल्याने या सामन्यात खेळत नव्हते. यजमानांच्या 417 धावांच्या उत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव 170 धावांमध्येच आटोपला. विंडीज कर्णधार जॉफ्री स्टोलमेयरने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. त्यालाही प्रसाद मिळता मिळता राहिला. अनेकदा प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली.
12 ऑगस्ट १९९६
हेडिंग्लेवर एक चमत्कार. वसिम अक्रमचा चेहरा धूमकेतूच्या शेपटाने माऊन्ट एव्हरेस्टला धडकून जाण्याची घटना नुकतीच पाहिल्यासारखा झाला होता. तब्बल सहा वर्षांच्या अंतरानंतर इंग्लिश कप्तान माईक आथर्टनने कसोटी सामन्यात चेंडू टाकण्यासाठी हात फिरवला होता आणि वैयक्तिक 7 धावांवर खेळणारा वसिम अक्रम त्या चेंडूवर पायचित दिला गेला होता. कर्णधाराकडून कर्णधार बाद. पहिल्या डावातही अक्रम 7 वर बाद झाला
होता. आपल्या तोवरच्या 61 सामन्यांच्या कारकिर्दीतील आथर्टनचा हा केवळ
दुसरा बळी होता.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply