ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, म्युझिक अॅtरेंजर केरसी लॉर्ड यांच्यासमवेत अनेक चित्रपटांत संतूरची साथ करणाऱ्या पं. उल्हास बापट यांनी सांगितलेल्या केरसी लॉर्ड यांच्या आठवणी.
भारतीय सिनेसंगीत क्षेत्रासाठी रविवार.. १६ ऑक्टोबरची सकाळ झाली; पण उजाडले नाही. कारण या दिवशी ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, अॅलरेंजर आणि जगन्मित्र केरसी लॉर्ड यांचे निधन झाले.
त्यांना सांगीतिक विद्वत्तेचा ‘सूर्य’ म्हणू या, की प्रत्येक कामात परफेक्शनिस्ट असलेले आणि नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहणारे, स्वत:च्या विधानावर ठाम असणारे म्हणून ‘पृथ्वी’ म्हणू या? की चंद्राच्या शीतलतेने सर्व सहकलाकारांवर, चाहत्यांवर प्रेम करणारे म्हणून त्यांना ‘चंद्र’ म्हणू या? नको.. इतके सर्व म्हणण्याऐवजी त्यांना ‘केरसीबाबा’च म्हणू या.
माझ्यासाठी ते गुरू होते. मोठे भाऊ होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सच्चे मित्र होते. आमच्या कुटुंबासाठी ते केरसीकाका होते. मी नेहमी गमतीने म्हणायचो, ‘केरसीजींची मोठी चूक म्हणजे त्यांनी मला सिने म्युझिशियन असोसिएशन (CMA) च्या ऑडिशनमध्ये पास केले ही होती.’
१९७४ ची गोष्ट. केरसीजी तेव्हा CMA चे पदाधिकारी होते. ऑडिशन कमिटीत होते. ज्येष्ठ वादक कलाकार परशुरामजी हेही केरसीजींसोबत होते. माझे नाव पुकारल्यानंतर मी संतूर घेऊन आत गेलो. सर्वाना वंदन करून मला जे येत होते ते वाजवायला सुरुवात केली. केरसीजी माझे निरीक्षण करत होते. परशुरामजी माझी उलटसुलट परीक्षा घेत होते. त्यांनी सांगितलेले सर्व म्युझिक पीसेस, अलंकार मी सहज वाजवत होतो. पहिल्या दिवसापासूनच मी बारा सूर मिळवूनच वाजवत असल्याने टय़ुनिंगमध्ये वेळ न घालवता परशुरामजींनी सांगितलेले सर्व स्वरयुक्त स्वरसमूह संतूरच्या काठय़ांतून निघत होते. त्यांना नापास करण्यासारखे काही सापडत नव्हते. तेव्हा बी ग्रुपचे ८५ रुपये व ए ग्रुपचे १०० रुपये मानधन होते. सर्वसंमतीने मला पास करण्यात आले. नवीन असल्याने बी ग्रुप द्यायचे ठरले. तेव्हा केरसीजी ठामपणे माझ्यामागे उभे राहिले. संतूरसारखे वाद्य टॅक्सीशिवाय नेणे शक्य नसल्याने आणि या वाद्याच्या वेगळेपणामुळे मला ए ग्रुपच मिळावा म्हणून त्यांनी आग्रह धरला. आणि तेव्हाच मला जाणवले- ते माझे आहेत.. तेव्हापासून मी त्यांचा झालो.
ते उत्कृष्ट ड्रम्स वाजवत. त्यांनी कॅस्ट्रोनट्स् टेंपल बेल्स, ग्लॉक्स (‘अभी ना जाओ छोड के’ गाण्यात) अशा विदेशी वाद्यांचा वापर पहिल्यांदा केला, हे सर्वपरिचित आहेच. सगळी वाद्ये वाजवणे हा त्यांच्या उजव्या हाताचा मळ असला तरी अॅिकॉर्डियन या वाद्यावर डाव्या हातानेसुद्धा त्यांचे प्रभुत्व होते. डाव्या हाताने बेलोचा वापर ते श्वासानुरूप करायचे. डाव्या बाजूला न दिसणाऱ्या छोटय़ा बटणांवर गाण्याच्या हार्मनीप्रमाणे त्यांची बोटे केवळ स्पर्शाने शिताफीने फिरत. ‘आराधना’तील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात केरसींनी वाजवलेला अॅनकॉर्डियनचा पीस पुन्हा कधी ऐकायला मिळेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.
केरसीजींच्या म्युझिक अॅ रेंजमेंटमध्ये चटकन् ओठावर येणारे गाणे म्हणजे मदनमोहन यांच्या ‘संगीत दिग्दर्शनातील ‘तुम जो मिल गये हो..’मध्ये (‘हॅंसते जख्म’) समुद्राच्या उफाळून येणाऱ्या उत्तुंग लाटांप्रमाणे केलेली व्हायोलिनची रचना ऐकून कधी कधी वाटते की, केरसीजींचे संगीत ऐकून समुद्रही आनंदाने उफाळून लाटारूपी स्वरतुषार आपल्या अंगावर शिडकावतो आहे! त्यांच्या व्हायोलिनचे पीसेस लाटांसारखे असले तरी त्यांनी कोणाचेच संगीत कधी लाटले नाही.
ते संगीताचे ‘लॉर्ड’ होते हे सिद्ध करणारा सिनेमा म्हणजे ‘साथी’! नौशादजींचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे अॅररेंजर केरसीजी होते. यातली गाणी नौशादसाहेबांच्या नेहमीच्या स्टाईलपेक्षा वेगळी आहेत. विशेषत: ‘मेरे जीवनसाथी’च्या वेळी केलेला वेगळ्या पीसेसचा वापर, त्याहीपेक्षा ‘हुस्न जाना इधर आ..’ या गाण्यातले गिटारचे दोन स्ट्रोक एका वेगळ्याच हार्मनीचा वापर हिंदी संगीतसृष्टीला बहाल करून गेला. ‘ऑगमेंटेड’ हार्मनीचा वापर गाण्यात यापूर्वी अन् यानंतरही कधी झालेला नाही. असे ऐकले की, पं. हृदयनाथ मंगेशकरांनीही हे गाणे ऐकल्यावर केरसीजींना फोन करून कौतुक केले होते.
‘शालीमार’ चित्रपटाचे केरसीजींनी केलेले टायटल म्युझिक संगीत क्षेत्राला कोंदण देऊन गेले. अकरा मात्रांत रचलेला पीस भल्याभल्यांची झोप उडवून गेला. त्यातला इलेक्ट्रिक गिटारचा पीस, बाकी वाद्यवृंद अॅेरेंजमेंट आणि त्यात अकरा मात्रा.. मोजता मोजता काय होते, ते सभ्य भाषेत सांगणे कठीण आहे!
पंचमदांचे (आर. डी. बर्मन) ते उजवा हात होते. तसे पंचमदांना बासुदा, मनोहरीदा, मारुतीराव कीर आणि केरसीजी असे चार उजवे हात होते. जसे केरसीजींनी सिंथेसाइझर पहिल्यांदा या क्षेत्रात आणला तसे एकोलाईट मशीनही त्यांनी प्रथम वापरले. म्हणूनच पंचमच्या गाण्यात ‘पंचम पंचम पंचम’ अशा प्रकारचे प्रतिध्वनी येऊ शकले. केरसीजींशिवाय पंचमदांचे रेकॉर्डिग म्हणजे तारांशिवाय पियानो. बदलत्या काळाबरोबर ते स्वत:ला नेहमी ‘अपडेटेड’ ठेवायचे. सिंथेसाइझर असो किंवा कॅमेरा असो, कम्प्युटर असो वा कोणतेही आधुनिक उपकण असो, जगात कोठेही निर्माण झालेली वस्तू दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे असायची. आजच्या तरुणांनाही लाजवील अशी तल्लख बुद्धी त्यांची होती.
वेस्टर्न म्युझिकचे उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या केरसीजी यशस्वी कंडक्टर म्हणून ओळखले जात. उजव्या हातातल्या काठीने कंडक्ट करताना वादकांना त्यांनी योग्य जागी बसवलं, त्यांच्याकडून हवं ते वाजवून घेतलं आणि संगीत खुलवलं. पाश्चात्य संगीताचा गाढा अभ्यास असल्यामुळे भलामोठा वाद्यवृंद असो, टिंफनी असो, ड्रमसेट असो, फ्ल्यूट असो, पियानो असो; सर्वाना काठीच्या एका इशाऱ्यावर त्यांनी एकत्रित वाजवून घेतलं. त्यांचं स्टाफ नोटेशन लेखन अतिशय सुरेख असल्याने अन् ‘व्हाईसिंग’ (प्रत्येक वाद्यसमूहाचे योग्य संतुलन) योग्य असल्याने सर्व विभागांवर त्यांचे वर्चस्व होते. अंगात मूळचाच ताल असल्याने, त्यातही त्यांचे तबल्याचे शिक्षणही खाँसाहेब इनामअली यांच्याकडे शास्त्रोक्त झाल्यामुळे केरसीजींच्या प्रत्येक रचनेला तालाची, त्याच्या विशिष्ट ‘खंडा’ची झालर असायची.
माझ्यातल्या कलेला वेगळ्या उंचीवर नेणारा एक प्रसंग आठवतो. ‘टच डाऊन’ नावाची एअर इंडियाची एक डॉक्युमेंटरी होती. त्याचा रिलीज जगभर होता. त्याचे पाश्र्वसंगीत केरसीजींनी केले होते. ८०-९० वादक होते. व्हायोलिन, व्हिओला, चेलो, डबल बेस.. सर्व वाद्यं होती. त्याव्यतिरिक्त ब्रास सेक्शन, ट्रंपेट, सेक्सोफोन वगैरे, सिल्वर फ्लूट, ड्रम, तबला, ढोलक.. साधारण पूर्ण सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. भारतीय वाद्यांत सितार, संतूर होते. निर्माता हैद्राबादचा रईस होता. सर्व वादकांची यादी पाहिल्यावर तो चकित झाला. संतूरला माझे नाव पाहून तो थबकला. (तेव्हा माझे नावही नव्हते अन् आडनावही झाले नव्हते.) त्यांनी केरसीजींना विचारणा केली. ‘‘यह कौन नया लडका है? आप पैसे की चिंता मत करो. जो भी चाहे वो बडे कलाकार को बुलाओ.’’
केरसीजी म्हणाले, ‘नहीं. मेरा काम उल्हास ही करेगा.’ त्या निर्मात्याला हे चांगलेच झोंबले. केरसीजींनी त्याच्या बोलण्याकडे दूर्लक्ष केलं. फक्त ते निर्मात्याला एवढंच म्हणाले, ‘रेकॉर्डिग के दिन आना और सुनना. बाद मे कहना.’ त्याकाळी ट्रॅक सिस्टीम किंवा डबिंग सिस्टीम नव्हती.
शेवटी तो रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. पहिलाच पीस मला वाजवायचा होता. सर्व वाद्यवृंदाला आपापले पार्ट दिलेले होते. मला दिलेला पीस साधारण आपल्या जोग रागावर आधारीत होता. सुरुवातीला तो पांढरी दोनमध्ये होता. नंतर इतर वाद्यांच्या वेगवेगळ्या हार्मनीनंतर टायटलच्या शेवटी तोच पीस आता पांढरी एकमध्ये वाजवायचा होता.
टेक सुरू झाला. सुरवातीला ४-४ च्या तालात मला ५ चा तुकडा वाजवायचा होता. येथे केरसीजी पुन्हा दिसले! पांढरी दोनमध्ये सुरू झालेला पीस संपूर्ण वाद्यमेळानंतर पांढरी एकमध्ये वाजवायचा होता. गुरुजनांच्या कृपेने पहिलाच टेक ओके झाला. केरसीजींनी निर्मात्याला जवळ बोलावले अन् म्हटले,
‘‘एक ही टाइम में पहले सफेद दो और आखिर में सफेद एक मे पीस बजाना था. ये काम सिर्फ उल्हास क्रोमेटिक पद्धतीसे बजाता है. उस में ही यह मुमकीन है. और कोई नहीं बजा सकता है, इसलिये उल्हास को ही संतूर के लिये बुलाया.’’ माझ्याकरता ही घटना पुरस्कारासारखीच होती.
त्यांना चविष्ट खाण्याची आवड होती. ते कधी कधी सर्वासाठी पेडर रोडला कुठून तरी चिकन कटलेट आणि बुरून पाव मागवायचे. त्यांना खाण्यात.. तेही वाटून खाण्यात जास्त समाधान मिळायचे. लॅमिंग्टन रोडला ‘लीलाधर’मध्ये भेजाफ्राय खाणे त्यांना खूप आवडायचे. ‘लीलाधर’मध्ये गेल्या गेल्या वेटरला सूचना असे- ‘मेरे लिये भेजा फ्राय जास्ती रख देना. खतम नहीं होना चाहिये!’
‘महान’ सिनेमाच्या पाश्र्वसंगीतासाठी आम्ही चेन्नईला प्रसाद स्टुडिओत पंधरा दिवस गेलो होतो. ते पंधरा दिवस अत्यंत बहारदार होते. मला कॅरेमल कस्टर्ड खूप आवडतं. कोणत्याही हॉटेलात गेलं की मी प्रथम विचारायचो, ‘कॅरेमल कस्टर्ड है ना?’ एकदा केरसीजी इतके वैतागले! ‘अरे, पहले खाना क्या है वो सोच. पहले कस्टर्ड क्यों?’ त्या दौऱ्यात माझे नाव त्यांनी ‘केके’च ठेवलं होतं.
..अचानक फोनची बेल वाजली आणि मी गतकाळातून खाडकन् भानावर आलो. कानावर शब्द पडले, ‘‘हॅलो उल्हासजी, संध्याकाळी चार वाजता केरसीजींचे अंत्यदर्शन आणि अंत्यविधी आहे.’
मनात आठवणींचे काहूर माजले असतानाच आम्ही उभयता वरळीला निघालो. अत्यंत आवडत्या केरसीजींच्या अंत्यदर्शनाला! गर्दीत वाट काढत मी त्यांच्यापाशी पोहोचलो. चरणस्पर्श केला. त्या हार्मनीच्या राजाच्या चेहऱ्यावर हार नव्हती, तर सुरांना जिंकल्याचे समाधान होते. जणू तालाचा विचार करता करता आयुष्याची शेवटची सम आली होती.
त्यांच्या तिन्ही मुली झरीन, परी आणि जास्मीन तिथं उभ्या होत्या. तिघींना भेटून निघताना अश्रू आवरेनासे झाले. जास्मीन म्हणाली, ‘’uncle Don’t Cry. He has gone to a better place.’’
पं. उल्हास बापट
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply