संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.
मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “ ही यात्रा केवळ भारतीय शासन आयोजित असे. वर्षातून फक्त तीन महिने ती यात्रा चाले. ३० दिवसाची यात्रा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन ह्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशातून अर्ज मागविले जात. यात्रेला जाण्यासाठी थोड्याच लोकांना प्रवेश मिळे. किचकट नियमातून प्रवेश मिळणे अत्यंत अवघड होते. मी पण अर्ज केला होता. नशिब चांगले म्हणून नंबर लागला. तार मिळाली ” कैलास मानसरोवर यात्रेसाठी तुमचा अर्ज मंजूर केला गेला. १५ दिवसात फार्म भरून अनामत रक्कम पाठविणे.” धावपळ सुरु झाली. यात्रा दोन महिन्या नंतर सुरु होणार होती. संबंधित बाबींची पूर्तता करण्याची गरज होती. शासकीय नोकरी. तेंव्हा ३० दिवसाची रजा मंजूर करून घेणे महत्वाचे होते.
डॉक्टर देशमुख त्यावेळी संबंधित वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना भेटलो व परिस्थिती समजावून सांगितली. रजेचा अर्ज दिला. माझ्यासाठी नशिबाने ही एक मिळालेली संधी असल्याचे सांगितले. त्यांनी क्षणभर विचार केला. प्रशासकीय कारण देत अर्ज नामंजूर केला. मी खूप निराश झालो. विनंत्या केल्या. वेळ पडल्यास बिनपगारी राजा द्यावी, हे ही मागितले. परंतु डॉक्टर देशमुख यांनी निर्णय बदलला नाही. माझा अर्ज फेटाळून लावला. मिळालेली संधी वरिष्ठांच्या हट्टापाई गमावून बसलो.
१२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, मी केंव्हाच विसरलो होतो. आणि आज अचानक ज्याचा विचार केव्हाच मनांत येणार नाही ते घडले होते. डॉक्टर देशमुख माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचे मी स्वागत केले. खूप आनंद व समाधान व्यक्त केले. मी देखील निवृत झालो होतो.
डॉक्टर देशमुख सांगू लागले. ” मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. माझ्या जीवनात मी अनेक वरिष्ठ जागा भुषविल्या. अनेक निर्णय घेतले. शकतो नियमानुसार काम करण्याचा प्रयत्न केला. नियम हे फक्त मार्ग दर्शक असतात.
निर्णय मात्र तुम्हाला सारासार विचार करून, परिस्थितीचा अभ्यास करून, त्याच्या परिणामाचा विचार करून, घ्यावा लागतो. त्यात असते तुमचे ज्ञान, अनुभव, कार्याची क्षमता, आणि तुमचा स्वत:चा स्वभाव गुणधर्म. निर्णयात स्वभावाचा सहभाग अल्पसा असला तरी अनेक निकालांची तो उलट सुलट करु शकतो. तुमचे राग लोभ अहंकार, कुणाबद्दलचे समाज, गैरसमज ह्या बाबी तुमच्या स्वभावाला बंदिस्त चाकोरीत टाकतात. अजाणतेपणाने तुमच्या निर्णयामध्ये त्याचा अप्रत्यक्ष सहभाग होऊन जातो. अशाच कांही मी घेतलेल्या निर्णयाचे आज मी विश्लेषण करीत आहे. कांही निर्णया बाबतीत, मला खंत वाटते. तो भूत काळ होता. मी आता कांहीच करु शकत नाही.
पश्चात्ताप होणे हेच एक प्रायश्चित असते. चुका करणे हा मानवी स्वाभव. परंतु त्याची तीव्रतेने जाणीव होणे हा निसर्ग. त्याला मानणे हे त्या दुष्ट चक्रातून केलेले बचवात्मक समाधान. ज्या ज्या निर्णयामध्ये जर कुणाची हानी झाली असेल तर आणि त्यांत मला स्वत: ची चूक उमगली असेल, तर त्याची क्षमा मागण्यासाठी मी आलो आहे. वेळ गेली, काळ गेला. भोगनाऱ्याने जे भोगले, त्यांच्या दु:ख निर्मितीत माझा अप्रत्यक्ष सहभाग होता. क्षमा व्यक्त करून मी मनाचे सांत्वन इच्छितो.”
९००४०७९८५०bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply