पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक दीड महिन्यांवर आली असताना सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वातच तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाचे प्रमुख व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झालेले त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो-झरदारी हे देश सोडून थेट दुबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) प्रचार मोहिमेस मोठा धक्का बसला आहे. पीपीपीचे सहप्रमुख म्हणून अलिकडेच नियुक्ती झालेले बिलावल हे येत्या निवडणुकीत पक्षाचे “स्टार प्रचारक” मानले जात होते. मात्र, बिलावल यांचे वडील आसिफ अली झरदारी आणि बहिण फरयल तालपूर यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याने त्यांनी थेट देश सोडण्याचा निर्णय घेतला. देशातील दहशतवादी कारवाया, शिया पंथियांविरोधातील हिंसाचार या मुद्यांवर पिता-पुत्रात वाद असल्याचे सांगण्यात येते.
रक्तरंजित निवडणुका
अज्ञातवासात गेलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानात चार वर्षानंतर परतले आहेत. पाकिस्तानात परतल्यास त्यांची हत्या केली जाईल, असा इशारा तालिबानने दिला होता. पण अद्याप तरी मुशर्रफ जिवंत आहेत. मात्र ते यापुढे जिवंत राहतीलच, याची खात्री देता येत नाही. याचे कारण त्यांचा काटा काढण्यास बरेच लोक टपलेले आहेत. २००६ मध्ये बेनझीर भुत्तो परदेशातून परतल्या होत्या आणि निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रचार करत असतानाच त्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानमध्ये राजकीय नेते आणि हुकूमशाह यांच्या हत्याकांडाची परंपरा आहे. १९७७ मध्ये झुल्फीकार अली भुत्तो यांची अशीच हत्या जनरल झियउल हक यांनी केली होती. त्यांनी भुत्तो यांच्यावर खुनाचा खोटा आरोप लावून त्यांना फाशी देऊन त्यांचा काटा काढला. १९८८ मध्ये याहया खान यांचे विमान पडले आणि त्यात चा मृत्यू झाला. हा अपघात होता की, घातपात होता याची अद्यापही चौकशी झालेली नाही. याबद्दल पाकिस्तानात कोणाला साधी कैदेचीही शिक्षा झाली नाही. परंतु याहया खान यांच्या राजवटीत भुत्तो कुटुंबातल्या सर्वांना परदेशात आश्रय घेऊन राहावे लागले होते. याहया खान यांच्या हत्येनंतर बेनझीर यांनी पाकिस्तानात आगमन केले. पण आपला भाऊ मीर मूर्तजा याला पाकिस्तानात येऊ दिले नाही. याहया खान यांच्या माघारी बेनझीरला सत्ता मिळाली खरी. पण तिला आपल्या भावाचाच भरवसा नव्हता. परदेशातून तो मायदेशी परतला. पण त्याच्या मेव्हण्याने म्हणजे आता अध्यक्ष असलेल्या झरदारी यांनीच त्याचा काटा काढला आणि पत्नीचा मार्ग निर्वेध केला. दरम्यान, भुत्तो कुटुंबातल्या आणखी एकाचा फार पूर्वीच बेनझीरच्या सल्ल्यानेच काटा काढण्यात आला होता. “पेरले तसे उगवते” याचा अनुभव बेनझीरलाही घ्यावा लागला. २००६ मध्ये तिची हत्या झाली. याही हत्येबद्दल कोणाला शिक्षा झाली नाही आणि कोणाची चौकशीही झाली नाही.
दरम्यानच्या काळात मुशर्रफ यांनी २००० मध्ये नवाज शरीफ यांना हटवून सत्ता हस्तगत केली होती. या सत्तांतराच्या वेळीही नवाज शरीफ यांच्या जीवाला धोका होता. पण त्यांना कुवेतच्या शेखांनी अभय मिळवून दिले. त्यामुळे वाचलेले शरीफ कुवेतला जाऊन राहिले. मुशर्रफ यांनी त्यांना सोडले आणि पाकिस्तानात सात वर्षे लष्करी सत्ता चालवली. त्यांनाही २००८ मध्ये सत्तांतर झाल्यावर पळून जावे लागले. ते ब्रिटनमध्ये अज्ञातवासात राहत होते. मुशर्रफ सत्तेवर असताना अमेरिकेच्या तालावर नाचत पाकिस्तानमधील इस्लामी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून दहशतवादी त्यांना मारायला टपले आहेत. मुशर्रफ यांच्या हत्येचे दोन प्रयत्नही झाले होते. पण त्यातून ते बचावले. हे दहशतवादी आता त्यांना मारण्याची संधी शोधत आहेत. बेनझीर भुत्तो यांचा काटा त्यांनीच काढला, असा मुशर्रफ यांच्यावर आरोप आहे आणि भुत्तो यांचे समर्थकही त्यांना मारायला टपले आहेत. पाकिस्तानात कोणीही सत्तेवर आला की, तो असा काही कारभार करतो की, त्याचा जीवच धोक्यात येतो. मुशर्रफही त्याला अपवाद नाहीत. मुशर्रफ जीवाची बाजी लावून आणि धोका पत्करून मैदानात उतरले आहेत. पाकिस्तानातील ही निवडणूक रक्तरंजित होणार, यात काही शंका नाही. मात्र पाकिस्तानातील ही रक्ताची होळी हा त्यांच्या ६४ वर्षांपासून जोपासलेल्या विशिष्ट राजकारणाचा परिपाक आहे.
पाकिस्तानातील परिस्थिती चिंताजनक
पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून प्रथमच पार्लमेंटने पाच वर्षांचा कार्यकाळ पुरा केला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने पाच वर्षांची मुदत पूर्ण करण्याची घटना पाकिस्तानात पहिल्यांदाच घडल्याने लोकशाहीची पहाट अवतरल्याची द्वाही काहीजण फिरवू लागले आहेत; परंतु वास्तव काय आहे? पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे हे संख्यात्मक यश आहे, गुणात्मक नव्हे. लोकशाहीचे खरे “स्पिरीट” पाकिस्तानात का येत नाही. कारण पाकिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. “तालिबानी” दहशतवादाचा विळखा देशाच्या अधिकाधिक भागाला बसू लागला आहे. राजकीय व्यवस्थेवरील आपली पकड जराही ढिली होऊ देण्याची तेथील लष्कराची तयारी नाही. राजकीय पक्षांची दिवाळखोरी तर जगजाहीरच आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारी या समस्यांनी हैराण झालेल्या सामान्य जनतेच्या असंतोषाचे उद्रेकही घडताहेत. मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये सत्ता मिळविली होती ती अशा पोकळीचा फायदा घेऊनच; परंतु त्यांना फारसे भरीव काम करता आले नाही. त्यामुळे देश सोडून जाण्याची वेळ आली.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुशर्रफ यांच्या या पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्याचे एक कारण म्हणजे बेनझीर भुत्तो यांची ऐन प्रचारात झालेली हत्या. २७ डिसेंबर, २००७ रोजी रावळपिंडीत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येला जनरल मुशर्रफ थेट जबाबदार आहेत की नाही, हे न्यायालयात ठरेल. आज तालिबान्यांनी मुशर्रफ यांना कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवणार नाही, असा विडा उचलला आहे. तालिबान्यांनी हा इशारा काही प्रथमच दिलेला नाही. मात्र , तो लक्षात घेऊन मुशर्रफ यांनी स्वतःभोवती खासगी सुरक्षेचे कडे पहारे अहोरात्र तैनात ठेवले आहेत.
“लोकशाहीतील प्रक्रियेची पाकिस्तानात सुरुवात झाली आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले पण लोकशाही सरकार असल्याने मोर्चे निघू लागले आहेत. लष्करी चिडीचूप शांततेपेक्षा लोकशाहीचा गोंधळ अनेकपट सर्जनशील, चैतन्यदायी असतो, याचा अनुभव पाकिस्तानी समाज सध्या घेतो आहे. तिथली लोकशाही टिकणे व स्थिरावणे, हे भारताच्याही अखेर हिताचेच आहे.”
ज्यांनी आपली हयात हुकूमशाही राबवण्यात घालवली तेच मुशर्रफ आता जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची स्वप्ने पाहात आहेत हाच मोठा विनोद आहे. त्यांनी निवडणूक लढवण्याचा इरादा जाहीर केला असला तरी त्याने पाकिस्तानच्या राजकारणात कोणताही फरक पडणार नाही. मुशर्रफ हे पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिलेले अध्यक्ष नव्हते तर १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची सत्ता लष्कराच्या मदतीने उलथवून ते सत्तेवर आले होते. मुशर्रफ सत्तेत असतानाच दहशतवाद्यांचे नंदनवन अशी पाकिस्तानची ओळख होती. तसेच बलुची नेता अकबर खान बुगती हत्येच्या संदर्भातही त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले आहे. २००७ मध्ये इस्लामाबादच्या लाल मशिदीवर कारवाईचे आदेश मुशर्रफ यांनी दिले होते. या कारवाईत शंभरावर निरपराधांना प्राण गमवावे लागले. परवेझ मुशर्रफ यांच्या मायदेशी परतण्याचा पाकमध्ये ११ मे रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम होणार नाही. मुशर्रफ यांचे आगमन ही एक ठळक घटना आहे हे खरे, परंतु खूप महत्व द्यावे एवढी ती मोठी नाही.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply