नवीन लेखन...

पाकिस्तानला अद्दल घडवा : हुरियतच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा

सत्तेवर आलेले जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप यांचे आघाडी सरकार स्थिर होण्याच्या आत दहशतवादी रंग दाखवू लागले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘शांततेत मतदान पार पडू दिल्याबद्दल’ मुफ्ती महंमद सैद यांनी मानलेले आभार ‘लष्करे तोयबा’ चे बोलविते धनी विसरले असावे. नाही तर लागोपाठ दोन दिवस भीषण हल्ले करून दहशतवाद्यांनी जम्मूत रक्ताचे सडे घातले नसते.

आधी दहशतवाद्यांनी कथुआ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर हल्ला चढविला. तेथे सहाजणांना ठार केले. लष्कराने अखेर हे दोन दहशतवादी ठार केले. शनिवारी, पुन्हा दोन दहशतवाद्यांनी सांबा जिल्ह्यात हल्ला चढविला. या हल्ल्यातले दोन्ही दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यांनी राज्य आणि केंद्र सरकारपुढे आव्हान उभे केले आहे.

एकीकडे, पीडीपी सातत्याने ‘लष्करी विशेषाधिकार कायदा’ रद्द करण्याची मागणी करीत आहे. दुसरीकडे, काश्मीर पेटवणारा मसरत आलामसारखा दहशतवादी तुरुंगातून बाहेर येत आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात खंबीर भूमिका घेण्याबाबत पीडीपीचा इतिहास फारसा उज्ज्वल नाही. काश्मिरात शांततेत मतदान होऊ दिले याचा अर्थ पाकिस्तानने हा विषय अजेंड्यावरून पुसून टाकला असा होत नाही. अशावेळी, केंद्र सरकारला मुफ्ती महंमद सैद व त्यांची कन्या मेहबूबा यांना नियंत्रणात ठेवता येते का, यावरच काश्मीरची पुढची वाटचाल अवलंबून आहे.

फुटीरतावाद्यांना गोंजारण्याची नीती कायम
पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील जहाल फुटीरतावाद्यांना गोंजारण्याची दुष्ट नीती कायम ठेवली आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल वसित यांनी ‘पाकिस्तान डे’ निमित्त मसरत आलम याला शाही खान्यासाठी दावत दिली. पाकिस्तानच्या या वर्तनाविरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. या समारंभाला फुटीरतावादी अनेक नेते उपस्थित होते. यासीन मलिक याने तर ‘पाकिस्तान डे’ ला आपण गेली २२ वर्षे न चुकता हजर राहतो’ अशी शेखी मिरवली. पाकिस्तानच्या राजदुताने निमंत्रण दिलेल्या शाही खान्याला तब्येत बरी नसल्याने मला जायला जमले नाही. पण माझ्या सहकार्‍यांना त्यासाठी धाडले आहे, असे मशरत आलम याने सांगितले. ‘हुर्रीयत कॉन्फरन्स’ चे अध्यक्ष मिरर्वेझ उमेर फारूख यांनी पाकिस्तानचे उच्चायुत अब्दुल बसित यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.

सर्व वादांवर चर्चेतूनच तोडगे निघतील : मोदी
राजधानीतील ‘पाकिस्तान डे’ च्या समारंभाला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी हजेरी लावली. पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमाला भारत सरकारच्या आदेशावरूनच हजेरी लावल्याचे स्पष्टीकरण व्ही. के. सिंग यांनी दिले. सरकारने या कार्यक्रमासाठी मला पाठविले. मी कार्यक्रमाला हजेरी लावली आणि दहा मिनिटांनी परत आलो, असे सिंग यांनी सांगितले.

गेल्या वर्षी ‘हुर्रियत’च्या नेत्यांना पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी आपल्या निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले होते. त्यावरून भारताने पाकिस्तानशी चर्चा थांबवली होती. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी जम्मू-कश्मीरमधील फुटीरतावाद्यांना मेजवानीसाठी दावत दिल्यानंतर भारताने नेहमीपणे कडक शब्दांत आपली भूमिका जाहीर केली.

हिंसाचार आणि दहशतवादापासून मुक्त असलेल्या वातावरणातील द्विपक्षीय चर्चेतूनच वादाच्या सार्‍या प्रश्‍नांवर तोडगे निघतील, याची मला खात्री आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाठवलेल्या एका पत्रात म्हटले आहे. २३ मार्चला ‘पाकिस्तान डे’ साजरा झाला. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोदी यांनी हे पत्र शरीफ यांना पाठवले आहे.

पाकिस्तान चे चाळे
पाकिस्तान दिवस साजरा करत त्या दिवशी काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांनी म्हणे चर्चा केली. पाकिस्तानचा भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासितना आपण भारतामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधी आहोत याचा विसर पडून आपण आयएसआयचे अधिकारी आहोत असा समज झाला असावा? उघड उघड भारतात हे महाशय काश्मीरमधल्या फुटीरतावादी गद्दारांशी भेटून चर्चा करतात. हे चालले तरी काय?

मुसलमानांसाठी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारा ठराव २३ मार्च १९४० रोजी लाहोर येथे करण्यात आला होता. हा दिवस पाकिस्तानात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला ‘पाकिस्तान डे’ असेही म्हटले जाते. मुळात भारतात पाकिस्तान दिवस साजरा करण्याचे औचित्य ते काय?

पाकिस्तानला अद्दल घडवा
देशद्रोहिंना थोडी संधी मिळाली की त्यांचे धाडस वाढतच जाते. बासितने पाकिस्तान दिवस साजरा करताना दावत दिली आणि त्यासाठी भारतातून फुटून निघण्याची दिवसरात्र कारस्थाने करणार्‍या हुरियत कॉन्फरन्सच्या देशद्रोही लोकांना बोलावले. गेल्या वर्षी भारत-पाकिस्तान सचिव पातळीवर चर्चा ठरलेली असताना अशाच प्रकारे पाकिस्तानच्या उच्चायुक्ताने हुरियतच्या फुटीर लोकांशी चर्चा केल्यामुळे भारताने ही सचिव पातळीवरची चर्चाच रद्द केली होती. तरीही या वर्षी पुन्हा त्यांनी तोच उद्योग केला आहे. आता यांना चांगली अद्दलच घडविली पाहिजे.

दोनच दिवसांपूर्वी सलग दोन हल्ले काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या असल्या चर्चा आणि त्यात शांततेची भाषा या लोकांच्या तोंडी शोभत नाही. पाकिस्तान उच्चायुक्त आणि हुरियत यांची सगळी चर्चा भारतापासून काश्मीरचा लचका कसा तोडायचा याच उद्देशासाठी आहे. असल्या चर्चा भारत सरकारच्या नाकावर टिच्चून दिल्लीत घडत असतील, तर त्यावर जालीम उपाय करण्याची गरज आहे.

पाकिस्तानची लढण्याची ही खुमखुमी तीन वेळा भारताने जिरवूनही, बांगला देश त्यांच्यापासून बाजूला झाला तरी अजून जिरलेली दिसत नाही. असंख्य प्रश्‍नांनी गांजलेले पाकिस्तानातील सरकार आपले अपयश झाकण्यासाठी नेहमीच संकट वाढले की भारताच्याविरोधात वातावरण तापविण्याचा हथकंडा वापरत आले आहे. आता फुटीरतावाद्यांशी भारताच्या राजधानीत चर्चा करणे या घडामोडीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

बासितना पाकिस्तानचा रस्ता दाखवा
काश्मीरचे भारतात बिनशर्त विलीनीकरण झालेले आहे. भारतीय संसदेने काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचा ठराव पास केलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणी जर काश्मीर भारतापासून तोडण्याचे मनसुबे मनात ठेवून उघड उघड या देशात येऊन देशाच्या राजधानीत चर्चा करत असतील, तर तो देशद्रोह समजला पाहिजे. इतिहासातील घोडचुकांचा गैरफायदा घेत हुरियत आता काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचा कांगावा करण्याच्या प्रयत्नात आहेत. बासित येथे जर देशद्रोह्यांना फूस देत असतील, तर त्यांना पाकिस्तानचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे.

हुरियतच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा
काश्मीरची समस्या काश्मीरमध्ये नसून ती दिल्लीत आहे . काश्मीर प्रश्‍नाचा गुंता दिल्लीतील सोयीने राजकारण करणार्‍या भंपक राजकारण्यांनी वाढविलेला असेल तर आता दिल्लीच्या कणखर नेतृत्वानेच हा प्रश्‍न सोडविला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची खरी कसोटी, ते पाकिस्तानच्या घडामोडींबाबत नेमकी काय भूमिका घेतात, यावरच लागेल. मोदी यांनी पाकिस्तानचा आगामी दौरा रद्द करावा. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाशी लढावे लागत असल्याने विकासकामांकडे लक्ष देता येत नसल्याची खंत नुकतीच व्यक्त केली. जो पर्यंत दहशतवादी हल्ले थांबत नाही तो पर्यंत चर्चा करणे अयोग्य आहे. पाकिस्तानी उच्चायुक्ताला उघड उघड भेटून फुटीतरतेची बिजे पेरणार्‍या हुरियतच्या लोकांना दिल्लीतच तातडीने अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविला पाहिजे. शांतता, चर्चा, बोलणी, सामोपचार, तोडगा असे शब्द वापरून ही मंडळी उघड उघड भारताच्या विरोधी कारस्थाने आखत आहेत. ही कारस्थाने वेळीच उधळून लावली पाहिजेत!

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..