सावता आणून देतो रोज भाजी
जेवतो संसार हा ताटात माझ्या
रोज स्वप्नांचा विणे मी एक शेला
रंग ज्याला लाभतो रक्तात माझ्या
पेटला पंजाब अन धावून आली
नानकाची आसवे डोळ्यात माझ्या
एकनाथाने जगाच्या वाळवंटी
घातले पाणी पुन्हा तोंडात माझ्या
सूरदासाने दिले मज सूर काही
आर्तता मीरा भरे गाण्यात माझ्या
ही जनाबाई दळे आयुष्य माझे
मीच वर्षे टाकतो जात्यात माझ्या
त्या विमानाचे कळेना काय झाले
हा पुन्हा आला तुका गावात माझ्या
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply