साधारणपणे पावसाळयात अगदी भरपूर उगवणारी हि पालेभाजी तशी सगळ्यांच्याच पुष्कळ आवडीची.अगदी खमंग चुरचुरीत अळुवड्या म्हणा,अळुचे फतफते म्हणा किंवा हरतालिकेला केली जाणारी ऋषिची भाजी ह्या सगळ्याच पदार्थांची चव अगदी लाजवाब लागते त्यामुळेच आपले सर्वांचेच विशेष प्रेम ह्या भाजीवर आहे(तसे काही महाभाग असतील ज्यांना हि भाजी आवडत हि नसेल पण ती संख्या तशी नगण्यच समझावी).
अळुचे रोप हे ११/२ -२ फुट लांब उगवते,ह्याची पाने मोठी व पसरट असतात.आणि ह्यावर पावसाचे पाणी चिकटून रहात नाही त्यामुळेच काही क्षणभंगुर गोष्टींना अळवावरचे पाणी ह्या म्हणीने संबोधले जाते.
ह्याचे काळा,पांढरा,हिरवा,गर्द हिरवा असे अनेक प्रकार असतात.त्यातील फिकट हिरवा पातळ पानांचा प्रकारास तेर असं म्हणतात आणी ह्याच्या पानांची भाजी आंबट चिंचेचा वापर न करता केल्यास भरपूर खाजते.
खायला काळा व गर्द हिरवा अळु उत्तम.अळुची चव हि तुरट गोड असते आणी हा थंड असतो त्यामुळे हा शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.
ह्या अळुचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत बरंका ते आता थोडक्यात पाहूयात:
१)गळु फुटण्यास अळुची पाने व देठ वाटून त्याचा पोटीस गळूवर बांधावा.
२)बाळंतीणीस दुध वाढायला जेवणामध्ये नियमीत थोडी अळुची भाजी खायला द्यावी.
३)जखमेवर अळुच्या पाल्याचा रस वाटून लावल्यास त्यातील रक्त स्त्राव बंद होतो व जखम लवकर भरते.
४)अळुच्या पानांचे देठ मीठासोबत वाटावेत व बंद व सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करावा.
५)सर्वांगाची आग होत असल्यास अळुची भाजी,फुल्के व तुप ह्यासोबत खावी.
अळुची भाजी जास्त खाल्ल्यास पोटात वात धरतो व बद्धकोष्ठाचा त्रास होतो.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply