हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे. किंमत रु.२२५/-.
चंद्रशेखर जोशी,दत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०,दूरध्वनीः २४४७४७६२, २४४७५३७२, भ्रमणध्वनीः ९३२५०९७८९४,
ई-मेलः madhavipublisher@gmail.com
कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे. काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
ह्याकरता ह्या पुस्तकातील काश्मीरच्या साद्यंत इतिहासाचे विवेचन वाचणे जरूर आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या इतिहासाचे अनोखे तपशील देणारा मजकूर, राज्याच्या भौगोलिक सीमांचे यथार्थ दर्शन करविणारे सुरेख मुखपृष्ठ आणि राज्याच्या वर्तमान परिस्थितीचा जणू भावार्थप्रदीप शोभेल असा आढावा, ह्यांनी हे पुस्तक सजलेले आहे.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. इंग्रजांनी त्यास स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. मुस्लिमबहुल लोकसंख्येचे आधारे, पाकिस्तान त्याचेवर पाकिस्तानात विलीन होण्याकरता दबाव टाकत होता. भारत नेहमीप्रमाणे तटस्थ होता. जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरिसिंह स्वतंत्र राहू चाहत होते. पाकिस्तानने त्या राज्यावर हल्ला चढविला. काही कळायच्या आतच, राज्याच्या मोठ्याशा भूभागावर पाकिस्तानने आपली सत्ता प्रस्थापित केली. महाराजा हरिसिंह ह्यांना भारताची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. त्याकरता, नेहरूंनी जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन करावे अशी अट घातली. महाराजा हरिसिंह ह्यांनी हा निर्णय घेण्यास लावलेल्या अक्षम्य विलंबाचे पर्यवसान, आपण आज पाकव्याप्त काश्मीरच्या स्वरूपात पाहतो आहोत. हा सर्व उत्कंठावर्धक इतिहास ह्या पुस्तकात तपशीलाने दिलेला आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्याचे भारतात झालेले विलीनीकरण, सोबत अनेक समस्या घेऊनच झाले. घटनेचे ३७० कलम, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानने चीनला दिलेला भारतीय भूभाग आणि चीनच्या ताब्यात असणारा आकाशी चीन, मुस्लिमबहुल प्रांतातील हिंदू अल्पसंख्यांकांचे प्रश्न, घूसखोर-निर्वासित आणि विस्थापितांच्या समस्या, ह्या त्या समस्यांपैकीच काही आहेत. ह्या समस्यांच्या निरसनार्थ भारतीय संघराज्याची संसाधने मग सततच खर्च होत राहिली. काश्मीरातील लोकांच्या समस्यांकरता भारतीय संघराज्याचा पैसा प्रमाणाबाहेर खर्च होऊ लागला. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या बिमारू राज्यांनाही कधी मिळाली नाहीत, एवढी संसाधने काश्मीरावर खर्ची पडू लागली. जिथे जाऊन राहू शकत नाही, जिथली जमीन खरेदी करु शकत नाही, त्या राज्यास, इतर राज्यांनी मदत तरी किती करायची! हा आर्थिक असमतोलाचा प्रश्न मग उपस्थित झाला. ह्या आर्थिक प्रश्नाची सम्यक ओळख ब्रिगेडिअरसाहेबांनी ह्या पुस्तकात व्यवस्थित करून दिलेली आहे. त्याकरताही हे पुस्तक वाचनीय आहे.
अशीच समाज-प्रबोधक आणि शासनास ज्ञानदीप ठरावीत अशी, निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके निरंतर लिहिली जावीत, अशी सदिच्छा मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो.
दहशतवाद हा लघुउद्योग झाला असून मोठय़ा प्रमाणावर तरुणांना याकडे खेचले जाते. या चक्रव्यूहातून त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. काश्मीरप्रश्नी इतिहासात अनेक चुका झाल्या आहेत. राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या सहनशक्तीला दुर्बलता समजली जात आहे.
काश्मीरला भारतापासून वेगळी करेल अशी कोणतीही ताकद जगात नाही. परंतु, ते आपल्याकडे ठेवण्यासाठी किती बळी जाणार हा प्रश्न आहे. एखाद्या राष्ट्रापासून वेगळे होणे ही तेथील लोकांची मानसिक युती आहे. त्यामुळे तेथील लोकांमध्ये जोपर्यंत ही भावना निर्माण होणार नाही तोपर्यंत काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असेही ते म्हणाले.
काश्मीर हे भारताचे डोके आहे. त्याचा एक लचका चीन तोडत आहे आणि दुसरा लचका हा पाकिस्तान तोडत आहे. हल्ले होतात तेव्हाच आम्ही एकत्र येतो. बांग्लादेश स्वतंत्र झाले त्यावेळेसच काश्मीरचा प्रश्न निकाली लागला असता. चुका लष्कराकडून घडत नसून, राजकारण्यांकडून घडत आहेत.
भारतीय सैन्यामुळे आज देश एकसंध आहे. काश्मीरमधून आज ज्या नद्या वाहत आहेत त्या पाकिस्तानला सुजलाम-सुफलाम बनवत आहेत. काश्मीर स्वतंत्र देश व्हावा, ही अमेरिकेची कुटनिती आहे.
सक्षम नेतृत्वाची गरज
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवायला आणि दहशतवाद नष्ट करण्यासाठी सामर्थ्यवान शासन आणि सक्षम नेतृत्व हवे. जम्मू काश्मीरमधील तरुण सीआरपीएफ, सैन्याच्या जवानांवर दगडफेक करतात. अफवा पसरवून बंद पुकारतात. जिहादी कारखाने युवकांना पैसा पुरवितात. पाकिस्तान येथे दहशतवादाची शाळा चालविते. मात्र तिथले राज्यकर्ते या कारवाया विरोधात कारवाई न करता समर्थनच करतात. हे थांबविण्याची आज गरज आहे.
१९८० पासून काश्मीरमध्ये छुप्या युद्ध रचनेला सुरुवात झाली. ते आजही सुरु आहे. जम्मू काश्मीर समस्येचे मूळ हे ज्या काश्मीरखोर्यात आहे. या खोर्यामध्ये राहणारे लोक हे पाकधार्जिणे आहेत. येथील लोकांना भारताशी जोडून घेण्याची गरज आहे. जिहादच्या यंत्रणा सज्ज असून कोणत्याही क्षणी दगडफेकीच्या घटना, अफवा पसरविण्यामध्ये आयएसआय त्यांना मदत करते. येथील ८० टक्के नागरिकांना भारतापासून वेगळे होण्याची इच्छा नाही. काश्मीरमध्ये कुशासन आणि भ्रष्टाचार प्रचंड आहे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply