श्री समर्थ आणि दीपज्योती बचत गटाने नुकतेच सुरु केलेले पेस्ट कंट्रोल हे पुण्यातील पहिलेच युनिट ! पापड, कुरडई करणार्या महिला आता पेस्ट कंट्रोलसारख्या व्यवसायातही आपले अस्तित्व दाखवत आहेत. पुणे जिल्ह्यातील वडगांव बु।। येथील समर्थ महिला बचत गटाने पुरुषांच्या मक्तेदारीला बगल देवून आपले सामर्थ्य सिध्द करुन दाखवले आहे.
जी कामे पुरुष करु शकतात ती कामे अधिक सफाईदारपणे महिला करु शकतात. कारण स्वच्छता, नीटनेटकेपणा हा ह्यांचा स्थायीभाव आहे. कुरडई, पापड, लोणची करणारी आजची आधुनिक महिला दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात अधिक धिटाईने पुढे येत आहे. याचे कारण तिच्यात आलेला आत्मविश्वास! तिच्यातील या आत्मविश्वासाने ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास धडपडत असून प्रत्येक ठिकाणी स्वत:चे अस्तित्व दाखवत आहे. पेस्ट कंट्रोल करण्याचे काम आजपर्यंत पुरुषवर्गच करत आला आहे. कारण घरोघरी फिरणे हे महिलांसाठी दगदगीचे काम आहे. असे समजून याकडे महिलांचे दुर्लक्षच होते. मात्र, यातही आम्ही पुरुषांपेक्षा अधिक चांगले काम करु शकतो हे वडगाव बुद्रक येथील समर्थ महिला बचत गट व दीपज्योती बचत गटातील महिलांनी दाखवून दिले आहे.
समर्थ महिला बचत गटाच्या संघटिका सुप्रिया काकडे यांनी सांगितले की, दीपज्योती व समर्थ गटाच्या आम्ही १० महिला असून हे काम सुरु केले आहे. घर सांभाळून हा व्यवसाय आम्ही करत असल्याने आमच्या कामाची वेळ १० ते ५ ही ठेवली आहे. आम्हाला आजपर्यत २५ ऑर्डर मिळाल्या. प्रत्येक ठिकाणी आम्ही दोघी किंवा तिघी जातो. ही कल्पना मला सुरुवातीला माझ्या घरापासूनच सुचली. कारण माझ्या घरात झुरळे झाली होती. आपणच घरी पेस्ट कंट्रोल करावे या उद्देशाने मी पेस्ट कंट्रोल केले. मात्र हे सर्व करताना मुलांना त्याचा साईड इफेक्ट व्हायला
नको तसेच बारीक-बारीक झुरळे कोठे लपून
बसू शकतात याचा विचार केला गेला. त्यावेळी लक्षात आले की मी एक महिला असल्याने या सर्व बाजूंचा अधिक बारकाईने विचार केला. परंतु हे सर्व विचार पुरुषांकडे असतातच असे नाही. मी माझ्या गटातील इतर भगिनींसमोर हा विचार मांडला तेव्हा त्या सर्वांनीच या नवीन कामासाठी होकार दिला. यातूनच आम्ही आमचा पुण्यातील पहिला पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय सुरु केला.
वैशाली थोपटे, सुजाता पासलकर, विजया बच्छाव, सरला वाबळे, कुसुम दहिरे, निर्मल बोले, शोभा सुतार, निर्मला मिश्रा, मैत्रेयी बारसोडे या आम्ही सर्वजणी मिळून हा व्यवसाय करत आहोत. पेस्ट कंट्रोल करतांना आम्हांला अनेक चांगले अनुभव आले. महिला पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांनी आमच्या या नवीन कामाचे अभिनंदन केले. अनेकींनी तर महिला असल्यामुळे संकोच वाटत नाही असेही सांगितले. कारण अनेक घरातून महिलाच घरी असतात. त्यामुळे महिलांसाठी ही एक आनंदाची बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.
स्पर्धेच्या या युगात महिलांनी कुरडई, पापड, लोणची याबरोबर वेगळया वाटेचं पेस्ट कंट्रोल क्षेत्रातील जे युनिट चालू केलं असल्याने समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ढेकूण, झुरळ, वाळवी यांसारख्या ६४ प्रकारच्या जीवजंतूंचा १०० टक्के नायनाट हर्बल केमिकल ट्रिटमेंट आणि पेस्ट कंट्रोलने करतो. हा नवीन व्यवसाय करताना आम्हांला आपण काही वेगळं करत आहोत याचा अभिमान वाटतो आहे, असे सुप्रिया काकडे यांनी सांगितले.
(महान्यूजच्या सौजन्याने)
— बातमीदार
Leave a Reply