सोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे. तरीही पित्ताशयातील खडे, मूतखडे, मूत्रपिंडाचा आकार हे कळण्यासाठी साधा फोटो आजही सांगितला जातो व या फोटोसाठी आदल्या दिवशी पोट साफ होण्याचे औषध घेऊन उपाशी पोटी सकाळी गेल्यास हा फोटो चांगला येतो. थोडे पाणी पिऊन किंवा चहा पिऊनही रुग्ण या तपासणीसाठी जाऊ शकतो. अॅपेंडिक्सच्या इमर्जन्सीमध्ये निदान करण्याच्या आधी हा फोटो अत्यंत जरुरीचा आहे कारण पोटात येणारी कळ मूतखड्यामुळे तर नाही ना हे त्वरीत समजते आणि अकारण ऑपरेशन टळते.
पोटाचा अत्यंत महत्त्वाचा एक्स-रे म्हणजे “उभा काढलेला एक्स-रे जेव्हा पोटात कळा येतात त्यावेळी अॅपेंडिक्स फुटले आहे की अल्सर फुटला आहे ते कळते. शिवाय आतड्याला पीळ पडला असेल तर तेही साध्या एक्स-रे वरुन त्वरित कळते. हा एक्स-रे रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. मूतखडा खाली घसरताना येणार्या कळा जीवघेण्या होतात तेव्हा एक्स-रे, के. यु.बी. हे दोन एक्स-रे काढावे लागतात. यामध्ये ओटीपोटाचा वेगळा एक्स-रे ट्यूबला अॅंगल देऊन काढावा लागतो. तरच तो स्पष्ट येतो.
पोटाच्या साध्या एक्स-रे बरोबरच बेरियम टेस्ट ही खास पोट व आतडी यासाठी करावी लागते. तसेच मोठ्या आतड्यासाठी बेरियम एनेमा हे एक्स-रे डॉक्टर काढायला सांगतात.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply