भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम सुरू केले. १९५० सालाच्या आसपास आलेल्या ‘जग्गु’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. बालपण संपल्यानंतर त्यांनी बहिणीच्या वगैरे भूमिका केल्या. त्यांचा या पर्वातला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘तुफान और दिया’. यात बहिण भावाच्या नात्याची एक विलक्षण कथा व्ही शांताराम यांनी मांडली होती. यातल्या बहिणीच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष बेबी नंदा यांच्याकडे गेले. त्या पाठोपाठ १९५७ साली आलेल्या ‘भाभी’ या चित्रपटामधली त्यांची भूमिकाही विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘काला बाजार’ या देवआनंद यांच्या चित्रपटातली त्यांची भूमिकाही अशीच गाजली होती. त्या पाठोपाठ आलेल्या ‘धूल का फुल’ या चित्रपटातही त्यांनी एक लहान भूमिका केली होती. नायिका म्हणून बेबी नंदा यांचा पहिला चित्रपट होता तो एल व्ही प्रसाद यांचा ‘छोटी बहन’. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून लगेच प्रस्थापित केले. त्याच वर्षी ‘हम दोनो’ या चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘अल्ला तेरो नाम..’ या गाण्याच्या वेळचा तिचा अभिनय आजही अनेकांना आठवत असेल. १९६० साली आलेल्या ‘आचल’ या चित्रपटासाठी बेबी नंदा यांना पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळाले होते. बेबी नंदा यांनी अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले असले तरी शशी कपूर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘चार दिवारी’ व ‘मेंहदी लगी मेरे हाथ’ या त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले. त्य़ांच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी स्विकारलेले नसले तरी १९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटाने या जोडीला मोठं यश मिळवून दिलं. बेबी नंदा यांची काश्मिरी वेषातली छबी अनेक रसिकांच्या मनात घर करुन गेली. या सिनेमातली सगळी गाणी गाजली असली तरी ‘ये समा..’ या गाण्यातला त्य़ांचा अभिनय विशेष गाजला. याच वर्षी आलेल्या ‘गुमनाम’ या चित्रपटातला बेबी नंदा यांचा अभिनयही विशेष गाजला. ‘इत्तेफाक’ या कोणतेही गाणे नसलेल्या चित्रपटातली राजेश खन्ना बरोबरची त्यांची भूमिकाही चांगलीच गाजली. मनोज कुमार यांचा ‘शोर’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘छलिया’, ‘नया नशा’ अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या चित्रपटांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी नायिका म्हणून काम करणे थांबवले. ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात पद्ममिनी कोल्हापुरे च्या आईच्या भूमिकेत त्यांनी चरित्रभूमिकांद्वारे पुनरागमन केले. ‘मजदूर’ व ‘प्रेमरोग’ या चित्रपटातल्या भूमिकांनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. १९९२ साली दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी नंदा यांचा साखरपुडा झाला. मात्र, त्यानंतर मनमोहन देसाई यांचे अपघाती निधन झाले. नंदा आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply