आता काही दिवसापूर्वी दूकानातून मी एक बिस्किटचा पुडा विकत घेतला पण गडबडीत मी उरलेले दहा रूपये घ्यायलाच विसरलो. ते ही बर्याच उशिरा माझ्या लक्षात आले. जेंव्हा लक्षात आले तेंव्हा जावून त्या दुकानदाराला आठवण करणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण ठरले असते. त्यामुळे मी त्या दहा रूपयावर पाणी सोडले. या सगळ्यात नक्की चूक कोणाची झाली ? माझी की त्या दुकानदाराची की दोघांचीही म्ह्टलं तर हो आणि म्हटल तर नाही. मी त्या दुकानातून वस्तू विकत घेतली म्ह्णजे मी त्या दुकानदाराचा ग्राहक होतो. मी जरी पैसे घ्यायला विसरलो तरी त्याने ते मला आठवणीने देणे हे त्याचे कर्तव्यच होते. आता हे त्याच्या हातून चुकून झाले असेल तर ठिक पण तसे नसेल तर त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घ्यायला वाव आहे. मी उशिरा जावून आठवण करून दिल्यानंतर कदाचित त्याने माझे पैसे परत दिलेही असते पण त्यामुळे त्याची प्रामाणिकता सिध्द झाली नसती ना !
मुंबईसारख्या शहरात प्रामाणिकपणा आडवा येतो तो सुट्टया पैशांमुळे. रिक्षावाले, भाजीवाले वगैरे बर्याचदा पैसे सुट्टे नसल्या कारणाने ग्राहकचे एक – दोन रूपये नाईलाजाने लाटतात. बसमध्ये कंडक्टर पैसे सुट्टे नसल्यास नंतर देतो अथवा नंतर मागून घ्या वगैरे सांगून गडबडीत प्रवाश्यांना बाकी पैसे द्यायला विसरतो. हे लक्षात आल्यावर प्रवाश्यांच्या नजरेत तो कंडक्टर अप्रामाणिक ठरतो. बर्याचदा रिक्षावाल्यांशी मी एक – दोन रूपयांसाठी हुज्जत नाही घालत कारण बाकीच्यांच माहीत नाही पण मला व्यक्तीशः माझ्याकडे एक-दोन रूपये सुट्टे नाहीत म्ह्णून ते सोडणारे बरेच रिक्षावाले भेटलेत. पण बसमधील कंडक्टर तस करू शकत नाहीत. त्यामुळे मी बसमध्ये नेहमीच सुट्टे पैसे घेऊनच चढतो त्यामुळे बरयाचदा कंडक्टरनेही माझे आभार मानल्याचा माझा अनुभव आहे. आपल्या चुकीमुळे उगाच दुसर्याच्या प्रामाणिकपणा बद्दल आपल्या मनात विनाकारण शंका यायला नको म्हणून मी हे करतो.
असाच एकदा मी एका इलेक्ट्रीक सामानाच्या दुकानात गेलो होतो. मला एक बोल्ड विकत घ्यायचा होता त्या बोल्डची दहा रूपये ही किंमत मला माहित असल्यामुळे मी त्याला दहा रूपये देत म्हणालो एक बोल्ड देना. त्याने बोल्ड देण्यापूर्वीच मला आठवलं आपल्याला एक ब्रशही घ्यायचा आहे मी म्हणालो एक छोटा ब्रश देना. त्या ब्रशची किमंत होती तीस रूपये म्हणून मी त्याला पन्नास रूपये दिले तर त्याने मला दहा रूपये परत दिले. गडबडीत तो मी त्याला पूर्वी दिलेले दहा रूपये विसरला होता आता त्याची त्याला आठवण करुन देणं म्हणजे विनाकारण भांडणाला आमंत्रण ठरम्हणजें म्हणून मी काहीच बोललो नाही पण ! त्याच्या डोळ्यात तेंव्हा माझ्या प्रामाणिकपणाबद्दलची शंका मला स्पष्ट दिसली त्या दुकानात जर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असते तर माझ्या स्वभावानूसार मी राडा घातलाच असता हे नक्की. तेंव्हा पासून या अशा वस्तू हातात दिल्याखेरीज मी त्याचे पैसे कधीच दुकानदाराला देत नाही. सर्वच बाबतीत हे असं करता येत नाही हा भाग वेगळा. सांगायच तात्पर्य इतकच की त्या दहा रूपयांमुळे माझ्या प्रामाणिकपणाबद्दल शंका निर्माण झाली. त्यामुळे मी बहुदा माझ्या ओळ्खीच्याच दुकानात सामान घेतो.
प्रामाणिकपणा आणि आमचा संबंध तसा जूनाच आमच्यावर प्रामाणिकपणाचे संस्कारच झाले होते असं म्हणा नं. लोकांनी आपले पैसे डुबवले तरी चालतील पण आपण कोणाचही एका पैशाचही नुकसान करायच नाही हे आमचं ब्रीद वाक्य होत आणि आजही आहे. आमचा प्रामाणिकपणा आंम्हाला बर्यापैकी महाग पडला होता आणि आजही पडत आहे. पण आमच्या प्रामाणिकपणामुळेच लोक आमच्यावर लाखाचा विश्वास ठेवतात अगदी डोळे बंद करून हे ही तितकच खरं आहे. आंम्ही सांगितलेल्या गोष्टीचा आंम्हाला पुरावा द्यावाच लागत नाही. प्रामाणिकपणा कमावणे हे सोप्प काम नसत त्यासाठी कित्येकदा आपल्याला परिक्षांना सामोर जावं लागत. माझ्यातील प्रामाणिकपणामुळेच अनेक लोक माझ्या मदतीला तत्पर आहेत पण त्यापैकी एकाचीही मदत मी आतापर्यत घेतलेली नाही. पण माझ्या प्रमाणिकपणाचा बर्याचदा दुसर्याचा उपयोग मात्र झालाय याच मला समाधानच आहे. काही लोकांना दुसर्यांच्या हक्काच्या मेहनतीच्या पैशावर ही डल्ला मारून स्वतःचा गल्ला भरण्याची सवय असते अशी लोक माझ्यासारख्यांच्या प्रामाणिकपणाचही भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बर्याचदा प्रयत्नशील असतात अशा लोकांचा आपमान मी त्यांच्या तोंडावरच करतो कारण आमच्या प्रामाणिकपणावर लोकांच्या असणार्या विश्वासालाच ते तडा देत असतात. आपल्या देशातील लोकांच्या मनातील प्रामाणिकपणा कमी झाला आणि देशात भ्रष्टाचार वाढीस लागला. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करण्यापेक्षा प्रामाणिक लोक घडविण्यासाठी प्रयत्न केले तर ते देशाच्या अधिक हिताच नाही का ठरणार ?
— निलेश बामणे
Leave a Reply