नवीन लेखन...

प्रेमकवी सावरकर

”सकाळीच तू तोडित असता जाईजुईच्या फुलां.
माडीवरुनी सुंदर कन्ये, पाहियलें मी तुला.
उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी.
कुरळ केश रुळताती गोरट्या मानेवरी सुटूनी.”

ह्या ओळी वाचल्या तर आपल्या मनात शंका सुद्धा येणार नाही की ह्या ओळी सावरकरांच्या आहेत. सशस्त्र क्रांतीच्या युद्धात स्वतःला समिधेप्रमाणे झोकून देणारे सावरकर प्रेमकवीता रचू शकतील असं कुणालाही वाटलं नसणार. एकिकडे “आत्मबल” या कवितेत सावरकर लिहितात,
“अट्टाहास करित जईं धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणी. अग्नी जाळी मजसी ना खडग्ं छेदितो. भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो.”
असं असूनही सावरकर उत्कृष्ट प्रेमकविता रचू शकतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मला वाटतं सावरकर हे मुळातंच संवेदनशील रसिक व कवी होते. परिस्थितीमुळे ते सशस्त्र क्रांतिकारक झाले. म्हणूनच एखाद्दा उद्दानाकडे जावे तसे सावरकर अंदमानाकडे गेले व अंदमानाच्या भयाण कारागृहातही त्यांची रसिकता सजीव राहिली. वरील “तनूवेल” नावाची कविता त्यांनी अंदमानच्या कारागृहात रचली आहे. पण कविता लिहायला सावरकरांना कधीच “मूड”ची गरज भासली नाही. ते शिघ्रकवी होते. कुठल्याही प्रसंगावर ते सहज कविता रचत. बालवयात गाण्याच्या भेंड्या खेळताना ते स्वरचित ओव्या जागच्याजागी रचून म्हणत व सर्वांना पराभूत करत. श्रूंगार हा मानवी जीवनाचा महत्वाचा भाग आहे, याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी कधीच ब्रह्मचार्याचे प्रयोग केले नाही. उलट श्रूंगारिक कविता रचल्या.
“कामव्याकुल शंभु लागला भिल्लिणिचे पाठी.
पुराणीच ही कथा, कथीनची मी कुठला खोटी.
नाचत निसटे माया भिल्लिण तोही तिजमागे.
कामव्याकुल, आकाशाच्या अंगणात लागे.
टपकत संचितवीर्य प्रभुचे बिंदु बिंदु गेले.
तयांचि तारे म्हणूनी ज्योतिषी भले भले चकले.
“तारकांस पाहून” या किवितेतील ह्या श्रूंगारिक ओळी आहेत. पण त्यात अश्लीलता कुठेच नाही. “मोपल्यांचे बंड” या कादंबरीत एका ठिकाणी स्त्री पुरुषांच्या प्रणयाचे वर्णन अतिशय सात्विकपणे करताना लिहीतात, “संकटाच्या आघाताने पिचलेल्या तिच्या ह्रदयास इतक्या भयंकर संकटानंतर कुरवाळणार्‍या ममत्वाचा तो स्पर्श, ते प्रेमळ कुरवाळणे सहन झाले नाही. वेडी ती स्रियांची जात, तिने आपले तोंड वर केले, दामू माझा…ती लाजली. पण शब्द सोडलेली वाक्ये वाचण्याचा प्रेमाचा पुरातन अभ्यास आहे. दामूने तिची हनुवटी वर केली. लक्षीबाई, भिऊ नका मी तुमचाच आहे, असे म्हणत त्या हिंदूवीर युवकाने त्या हिंदू कन्यकेचा मुका घेतला आणि त्या मुक्याबरोबर तिचे जीवनही चोखून टाकिले.” किती सुंदर नि सात्विक शब्दात सावरकरांनी प्रणयदृष्याचे वर्णन केले आहे. असे वर्णन सर्वांनाच करता येत नाही. बर्‍याचदा प्रणयदृष्ये रंगवताना किंचीत अश्लिलता व चावटपणा नावाचे अतिरेकी लेखणीत शिरकाव करण्याचा धोका अधिक असतो. पण सावरकरांनी आपली लेखणी तलवारीसारखी फिरवली असल्यामुळे कुठलेही अतिरेकी नि निरुपयोगी शब्द त्यांना भिऊन असायचे व त्यांच्या आसपासही फिरकण्यास धजावले नाही. एकदा आचार्य अत्रे आणि प्रा. फडके यांच्यात प्रचंड वादविवाद झाले तेव्हा फडके म्हणाले, अत्रे नेहमी फडकेंच्या साहित्यावर टीका करताना म्हणतात की त्यात अश्लील, बिभत्स प्रसंग रगविलेले आहेत, पण ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाही. त्यावर अत्रे म्हणाले, फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते. पण सावरकरांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली कि त्या बलात्कार करणार्‍याला चाबकाने झोडपावे, त्याला कठोर शिक्षा करावी असे वाटू लागते. मला वाटते हाच खरा भेद आहे सारकरांच्या लिखाणात व अन्य लेखकांच्या लिखाणात. सावरकर म्हणतात, नाटकात संसार कसा करावा हे दाखवावे. मानवी जीवन दाखवण्यापेक्षा मानवी जीवनाचे आदर्श दाखवावे. आपल्या लेखणीने जगातील पीढी वाया जाऊ नये अशी त्यांची दिव्य ईच्छा आहे व असा उपदेश ते सर्व साहित्यिकांना करतात. ज्या “तारकांस पाहून” या कवितेत सावरकर श्रूंगारीक वर्णन करतात त्याच कवितेत सीता अपहरणाच्या प्रसंगाचे वर्णन करताना लिहितात,
“दशाननें पळवूनी जानकी नभःपथे नेली.
अश्रुबिंदु जे देवी टपटप ढाळित त्या काली.
तेचि राहिले असे चकाकत जाणो दिव्यबले.
तयांचि तारे म्हणूनी ज्योतिषी भले भले चकले.
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना ते एकाच कवितेत करतात हे सुद्धा त्यांचे वैशिष्ट्य आहे. कारण सावरकर हे शब्दांचे दास नव्हते तर अर्थांचे प्रभू होते. फार कमी जणांना ही विद्या प्राप्त असते.
सावरकरांची काव्यशक्ती पाहून नाशीकमधील शीघ्रकवी बळवंतराव पारख म्हणाले होते की, मुला, तुझ्या अंगभूत तेजामुळे तुझ्यातील काव्यशक्ती जळून जाईल अशी भीती मला वाटते. एका अर्थाने त्यांची भीती खरी ठरली. कारण सावरकर म्हटले की आपल्याला जयोस्तुते व सागरास, ही दोन काव्ये प्रामुख्याने आठवतात. त्यांनी लिहिलेले खंडकाव्ये, भावगीते आठवत नाही. सावरकर हे माराठीतील उत्कृषट प्रेमकवी आहेत असे शकर वैद्दांनी लिहीले आहे. तरीसुद्धा त्यांचे जवळचे मित्र बॅ. असफअली म्हणतात, सावरकरांचे व्यक्तिमत्व देखणे व धीरोदात्त होते. ते प्रतिभाशाली होते. वक्तृत्वसंपन्न होते, साहसी होते, पराक्रमी होते. यापैकी एखादा जरी गुण कुणाच्याही अंगात आढळला, तर जगातील कोणतीही लावण्यश्रीमंत ललना त्याच्या सुखासाठी आपल्या कोमल शरीराची शय्या करायला आतुर असते. पण सावरकरांचे चित्त अशा उन्मादक प्रलोभनांना बळी पडले नाही, if at all their was any sweetheart in his life, that was his motherland only. त्यांना मातृभूमीचे वेड लागले होते, हे वेड त्यांनी सुखासीन झालेल्या मदनलाल् धिंग्रालाही लावले व त्यांच्या सहवासात आलेल्या सहकार्‍यांनाही लावले. सावरकरांचे आयुष्य इंग्रजांशी दोन हात करण्यातच गेले. असे असतानाही ते हाडाचे रसिक व कवी होते. त्यांना फुलांचे वेड होते. प्रायोपवेशन करुन मृत्यूशय्येवर पडलेले असतानाही शेवटची भेट घ्यायला आलेल्या आपल्या मुलीपाशी तिच्या उद्दानातील फुलावेंलींची चौकशी त्यांनी केली. एकदा दिल्लीच्या हिंदु महासभा भवनाच्या उद्दानात वि. घ. देशपांडे व पु. भा भावे रात्रीचे बारा नंतर गप्पा मारत बसले होते. तेव्हा त्यांना एक आकृती दिसली. ती आकृती उद्दानातील फुलझाडांना कुरवाळीत होती. भावे व देशपांडे आकृतीच्या जवळ गेले तर ती आकृती दुसरी कुणी नसून स्वतः सावरकर होते. भाव्यांना आश्चर्य वाटले की दिवसभर धकून भागून दमलेले सावरकर मध्यरात्री फुलांशी हितगुज करीत होते. हे सावरकरांचे वेगळेपण आहे. काळे पाणी या कादंबरीत आई आणि वयात आलेल्या मुलीचे सबंध स्पष्ट करताना ते लिहीतात, “तिच्या एकुलत्या एक मुलीचे लडिवाळ शब्द ऎकताच रमाबाईंच्या वात्सल्याचे इतके भरते आले की, एखाद्दा पित्या लेकरासारखे तिच्या लेकराचे मुके घेण्यासाठी रमाबाईंचे ओठ फुरफुरले. पण आईचे प्रेम जितके उत्कट असते तितकेच वयात येऊ लागलेल्या मुलीशी वागताना ते संकोची असते. मालतीच्या गालाला अगदी लागत आलेले आपले तोंड मागे घेऊन तिच्या आईने त्या वयात येऊ लागलेल्या लेकीच्या वदनाला दोन्ही हातात क्षणभर दाबून धरले आणि हळूच मागे सारीत मालतीला आश्वासिले.” काय सुंदर वर्णन केले आहे आई नि मुलीच्या प्रेम-संबंधाचे. आपली मुलगी वयात आलेली असल्यामुळे तिला न दुखावता तिच्याशी शिष्टाइने वागले पाहिजे. याची जाणीव सावरकर आपल्याला करुन देतात. त्यांनी ठाण्याच्या कारागृहात सप्तर्षी काव्य रचायला सुरुवात केली. हे जगातलं उत्कृष्ट काव्य आहे असं समिक्षकांचे मत आहे. स्वा. सावरकरांचे काव्य एखाद्दा उत्तुंग मनोर्‍याप्रमाणे वाटते. दुरवर पसरलेल्या उजाड प्रदेशांत विस्कळीतपणे पडलेल्या जीर्णभग्न अवशेषांमध्ये, मागील काळाचा हा भव्य प्रतिनिधी पुढील काळाच्या उदरांतील गोष्टी आपल्या अतूल शैलीने जनमनावर बिंबवीत अदभूतपणे उभा आहे, असे ना. ग. जोशींनी लिहीले आहे.
सावरकर हे खर्‍या अर्थाने प्रेमवीर व प्रेमकवी होते. पण त्यांचे प्रेम केविलवाणे नव्हते. त्यांचे प्रेम भिल्लासारखे होते, बाणावरती खोचलेले म्हणून मातीमध्ये उगवून मेघापर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळेच त्यांच्या तलवारीसारख्या धारदार लेखणीतून फुलांचा वर्षाव होतो. सावरकर करुण स्वरात मातृभूमीविषयी आपल्या मनात असलेली प्रेमभावना व्यक्त करताना म्हणतात,
“हे मातृभूमि, तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले
तुतेंची अर्पिली नव कविता रसाला
लेखाप्रती विषय तुचि अनन्य झाला”

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..