अनेक रोग शरीरावर आघात करतात. ते देहाला घातक वा मारक देखील असतात. मनुष्यप्राणी आपल्या बुद्धीप्रभावानें त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. दोन आघाड्यावर हे प्रयत्न झालेले जाणवतात. निश्चीत विज्ञान ज्ञान प्राप्ती व लोक अनुभवानुसार त्याची उकल करतात. कॉलरा, प्लेग, नवज्वर, धनुर्वात, क्षय आणि अशाच रोगाविषयी असेच झाले. प्रथम ते रोग अज्ञात होते, परिणामाची भिती होती. त्याच्या पासून बचाव म्हणजे, त्या वातावरणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न. तांत्रिक द्रिष्टीने ते फार गैर सोईचे होत असे. आता त्यावर अनेक उपाय निघालेत. लसीकरण हे महत्वाचे हत्यार सापडले. प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अण्याण्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.
फार जुनी गोष्ट, सत्तर वर्षा पुर्वीची. बीड जिल्ह्यातील माजलगांव हे तालुक्याच्या ठिकाण. माझे वडील शासकीय सेवेत तेथील प्रमुख आधिकारी होते. मी बालवयांत होतो. कळले की प्लेग ह्या रोगाची साथ सुरु झाली. अनेकजण मृत्युमुखी पडत होते. त्याला कारणीभुत असलेल्या उंदरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. अर्थात उंदीर हे लक्ष्य ( Target ) केले जाते. पिसा मुळे हे होते. पिसांचा दुसरा हल्ला माणसावर होतो. ताप, अंगदुखी, वांत्या, काखेमध्ये गोळा (सुज) येऊन रोग झपाट्याने वाढत जातो. हा रोग शरीराला थोड्याच वेळांत नष्ट करतो. त्या रोगवर त्याकाळी योग्य रामबाण उपाय नव्हते. त्या काळी रोगाचा प्रतिकार करताना त्या रोगाच्या वातावरणामधून त्वरित अलिप्त होणे हे केले जात होते. हे कांही काळासाठी असे.
गांवामध्ये त्याकाळी दवंडी पिटून जनजागृण केले गेले. त्याप्रमाणे सर्वाना स्थलांतर करण्यास मार्गदर्शन केले गेले. सर्व गांव सोडून त्या दुषीत व प्लेगयुक्त वातावरणातून दूर जावे लागले. शासकीय आदेश सर्व स्थानिक जनतेला दिले गेले. स्थलांतराची प्रक्रिया त्वरीत होऊ लागली. आम्ही गावातील सर्व जनतेचे स्थलांतर, त्यांची धावपळ, कष्ट, गैरसोयी, निराशा बघीतली. लहान असलो तरी त्यांची दुःखे जवळून अनुभवली. आठवणीने आज त्याची सत्यता व गांभिर्य मनाला पिळवटून टाकते. निसर्गाच्या चक्रांत माणसे कशी हातबल होतात, हे बालपणीचे द्दष्य आजही चटका लावते. मृत्युच्या थैमानाला रोकण्यास सारे असमर्थ वाटत होते. आम्ही पण माजलगांवाच्या बाहेर २-३ मैलाच्या अंतरावर शेतामध्ये झोपड्या उभारुन राहू लागलो. वडीलांचे तेथेच ऑफिसपण उभारले गेले. सर्वजण नजदीकच राहात होते. सर्व शाळा दोन महीने बंद होत्या. तो काळ आम्ही मुलानी निसर्गाच्या सान्निध्यात घालविला. न विसरणाऱ्या त्या आठवणी होत्या. गेल्या ७५ वर्षामध्ये त्यानंतर प्लेगसाठीचे गांव स्थलांतर झाल्याचे बघण्यात वा ऐकण्यांत आले नाही. आजच्या आधुनिक वैद्यकीय विज्ञान शास्त्राने बरीच प्रगती केली आहे. बऱ्याच जुन्या रोगांना समुळ नष्ट केले आहे. अर्थात त्याच वेळी नविन नविन रोगाबद्दल माहीती पुढे येत आहे. मात्र कोणत्याही नविन रोगाची केवळ चाहूल लागताच, जगातील सर्व विद्वान वा शास्त्रज्ञ एकत्र येतात. चर्चा करतात, अभ्यास करुन, प्रयोग करुन उपाय शोधतात. निसर्ग व मानव ह्यांचा असा संघर्ष चालूच राहणार.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***२६
जीवनाचे मुल्य मृत्युच्या छायेत जास्त जाणवते
परंतु मृत्युचे सत्य हे जीवनाच्या मायेत विसरते
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply