मुंबईत फ्लॅट घेणे ही किती जिकीरीची गोष्ट आहे याचा प्रत्यय आम्हाला गेले सहा महिने येत होता . आमच्या गजाला मुंबईत एक फ्लॅट विकत घ्यायचा होता आणि त्यासाठी आम्ही सहा महिने वेगवेगळ्या बिल्डरांकडे चकरा मारत होतो , वेगवेगळ्या प्रोजेक्ट साईटसना भेटी देत होतो ,वर्तमानपत्रातल्या जाहिराती चाळत होतो , एकंदर जे जे काय शक्य आहे अशा सर्व गोष्टी आम्ही करत होतो .पण आम्हाला पटेल असा ( म्हणजे आमच्या खिशाला परवडेल असा ) फ्लॅट मुंबईत काही आम्हाला मिळत नव्हता . हल्ली पनवेल , वाशी वगैरे भागालासुध्दा मराठी माणूस मुंबईच म्हणतो कारण ओरिजिनल मुंबईत फ्लॅट मिळणे मराठी माणसाला ( त्याच्या खिशाला ) अशक्यप्राय गोष्ट आहे. याठिकाणीही आम्ही बरेच प्रयत्न केले पण व्यर्थ ! माझी गोष्ट त्यातल्यात्यात बरी कारण आमच्या पिताश्रींनी त्यांची आयुष्यभराची कमाई खर्ची टाकुन कल्याणला दोन रुमचा बंगला ( हल्ली मुंबईत आम्ही असेच बोलतो ) विकत घेतला आणि वारसाहक्काने तो मला मिळाला. गजाच्या वडीलांना हे शहाणपण न सुचल्याने त्यांनी मुंबईत फ्लॅट न घेता मराठवाड्यातल्या आपल्या गावी घर बांधले .गजाने शेवटी रिटायरमेंटनंतर मुंबईत न राहता आपल्या गावी जाण्याचे ठरवले आणि आम्ही हा विषय इथेच सोडला.
आता एकदा हा विचार पक्का ठरल्यानंतर पुन्हा बदलायचे काही कारण नव्हते .पण आमचा गजा हा असाच. सकाळी सहालाच त्याने दार ठोठावले आणि “ वहिनी, चहा” ही फेवरेट आरोळी ठोकली . मी दातबित घासुन येईपर्यंत पठ्ठयाने चहा संपवला होता आणि पेपर चाळीत बसला होता .
” काय गजा , आज सकाळीसकाळीच आठवण ? “
” मी मुंबईत फ्लॅट घ्यायचा विचार पक्का केलाय .” गजा शांतपणे म्हणाला.
“ तो विचार तु खुप दिवसांपुर्वीच पक्का केला होतास . पण खिशाला परवडेल का ? हा विचार केला नाहीस . त्यामुळे तुझा प्लॅन फिसकटला .” मी बोललो . खरी परिस्थीती गजाला दाखवणे मित्र म्हणुन माझे कर्तव्य होते .
” पण आता मला परवडेल अशा किमतीत मला मुंबईत फ्लॅट मिळणार आहे . फक्त तु आज सकाळी माझ्याबरोबर चल .”
एवढे बोलुन गजाने पुन्हा आपले डोके पेपरात खुपसले. गजा कुठलीही गोष्ट डायरेक्ट सांगणार नाही . सस्पेन्स ठेवणार . मीपण फारसे काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही .
” कन्हैयालाल गिडवाणी माजी आमदार “
दारावरची पाटी बघुन मी हबकलो . गजा मला यांच्याकडे घेऊन आलाय ? मी गजाकडे बघितले . त्याने मला श्शु …. अशी खुण केली आणि हाताला धरुन तो मला मधे घेउन गेला.
आरामखुर्चीवर एक वयस्क बसले होते. एकटेच .आजुबाजुला कार्यकर्त्यांची गर्दी नाही की फायलींचा गठ्ठा नाही .
” नमस्कार .” गजाने नमस्कार केला.
“ हे बघा , ती सोसायटी पुर्णपणे अधिक्रुत आहे. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही .सरकारची जमीन लाटलेली नाही . सध्या सीबीआय चौकशी चालु आहे , आणि आपल्याकडे गुन्हा सिध्द झाल्याशिवाय कुणालाही कायद्याने गुन्हेगार मानता येत नाही . चौकशी पुर्ण झाल्यावर मी दोषी आढळलो तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन . आणि कोर्ट जी शिक्षा देइल ती भोगायला मी तयार आहे .” साहेब एका दमात बोलुन गेले.
” साहेब मी गजानन . मी आपल्याला फ्लॅट विकत घेण्याबद्दल — “
” ओ सॉरी , सॉरी . हल्ली काय आमच्याकडे फक्त पत्रकारच येतात . आणि तेचतेच प्रश्न विचारतात . त्यामुळे ते उत्तर मी पाठच करुन ठेवलेय . आणि मी तुम्हाला पत्रकारच समजलो . त्यामुळे हा घोटाळा झाला . बर बोला काय पाहिजे ? “
” साहेब मी गजानन . माझे वडिल पाकिस्तानविरुध्दच्या लढाईत लढले. पण त्यांना काही मुंबईत फ्लॅट विकत घेता आला नाही . मी मुंबईत लहानशी नोकरी करतो .पण मुंबईत रहायला जागा नाही . फ्लॅटच्या किमती परवडत नाहीत . आपल्या नावावर आदर्शमधे तीन फ्लॅट असल्याचे ऐकतो. त्यातला एकजरी मला दिला तरी माझा आयुष्यभराचा प्रश्न सुटेल .”
” हो देउ ना एखादा तुम्हाला . पण किंमत माहीत आहे का ? “
” साहेब , तुम्हाला फ्लॅटस फ्री मिळाल्याचे ऐकतो . माझ्याकडे फक्त दहा लाख आहेत. “
साहेब गप्प झाले . पाच मिनीटांनी मधे निघुन गेले. मधल्या माणसाने बाहेर येउन आम्हाला घरी जायला सांगितले . ‘ हल्ली कुणीही काहीही मागतात’ असा अविर्भाव त्यांच्या चेहेर्यावर होता .
आम्ही निमुटपणे घरी परतलो .
आता एक धक्का बसल्यावर गजा शहाणा होईल ही माझी अपेक्षा होती . पण गजा सुधरायला तयार नव्हता . आपल्याला दिल्लीला जायचे आहे एवढेच सांगुन घरी गेला .गजा निटसे काही सांगायला तयार नव्हता , पण बोलण्याबोलण्यात मला एवढे कळाले की आपल्याला दिल्लीला अशोकरावांच्या बंगल्यावर जायचे आहे, बंगल्यावरचा एक माणुस गजाच्या गावाकडचा आहे , आणि त्याने साहेबांची आणि गजाची भेट घालुन देण्याचे नक्की केले आहे .
अशोकरावांच्या बंगल्यावर भयंकर वर्दळ दिसत होती.पण गजाच्या मित्राने आम्हाला डायरेक्ट साहेबांच्या खोलीत नेउन बसवले . साहेब खुर्चीवर बसले होते. पाठमोरे होते, त्यामुळे काही दिसत नव्हते , फक्त फोनवर बोलण्याचा आवाज ऐकु येत होता .साहेब भयंकर टेन्शनमधे दिसले .साहेबांना सतत फोन चालु होते . ” कारगिल , आदर्श , आर्मीची जागा , माझ्या कारकिर्दीत सही , ” असे अनेक शब्द ऐकु येत होते पण काही कळत नव्हते . आम्ही आपले चुपचाप बसुन होतो .
अचानक साहेब वळले . त्यांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह बघुन गजा बोलुन गेला
” साहेब मी गजानन . आदर्शमधे तुमच्या नावावर चारपाच फ्लॅट असल्याचे ऐकतो . एकादा फ्लॅट माझ्या नावावर —– ” गजाने आपली पुर्ण कहाणी साहेबांना ऐकवली .
” बघु … विचार करु. सध्या दिवस वाईट आहेत . विरोधक आक्रमक आहेत . मुख्यमंत्रीपद जाते का राहाते अशी अवस्था आहे . पण जर मुख्यमंत्रीपद टिकले तर ते सर्व फ्लॅटस मी दान देउन टाकणार आहे . त्यावेळी आम्ही नक्की तुमचा विचार करु .”
मुख्यमंत्रीपद राहिले तर साहेब त्यांचे फ्लॅट आम्हाला दान करणार म्हणुन आम्ही खुप खुष झालो. एवढ्यात साहेबांना फोन आला .साहेबांनी ” आता तुम्ही या ” अशी खुण केली , आणि साहेब बोलण्यात गर्क झाले .
गेले दोन दिवस आम्ही दहा जनपथ समोर बसुन आहोत . मॅडमची गाडी दिसली की गाडीसमोर जाउन घोषणा देतो
” अशोकराव मुख्यमंत्रीपदी राहिलेच पाहिजे.”
“ अशोकराव जिंदाबाद.”
आणि मॅडम अशोकरावांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवतील अशी प्रार्थना देवाकडे करतो आहोत .
राजकारणी किंवा बडा सनदी अधिकारी नसणारा सामान्य मराठी माणुस दुसरे काय करु शकतो ?
— निखिल नारायण मुदगलकर
Leave a Reply