बदकाचे कौतुक!6 ऑगस्ट 1999 : किवींच्या इंग्लंड दौर्यातील तिसर्या कसोटीचा दुसरा दिवस. बदकावर परतणार्या एका खेळाडूला मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील प्रेक्षक उभे राहून मानवंदना देत होते. ते साधेसुधे ‘बदक’ नव्हते. 52 चेंडू त्या बदकाच्या पोटात होते. हे बदकपुराण थोडक्यात असे : यजमानांचा डाव कोलमडला होता. अॅन्डी कॅडीक धावबाद झाला – 8 बाद 152. पीटर सच मैदानात उतरला. समोरचा त्याचा साथीदार होता मार्क रामप्रकाश. पीटर खेळू लागला. धाव काढण्याची त्याने बिल्कुल घाई केली नाही. पहिले 10 चेंडू, पुन्हा 10 चेंडू, आणखी 10 चेंडू, परत 10 चेंडू, पुढचे 11 चेंडू…पीटर निवांत आणि ढिम्म. त्याने धावच काढली नाही. या 51 चेंडूंचा तो टोल्या (स्ट्रायकर) होता हे तर सोडाच पण बिनटोल्या (नॉन-स्ट्रायकर) म्हणून “एवढे” सगळे चेंडू आणि वर 10 चेंडू पडलेले त्याने पाहिले होते. तसा तो पळाला होता – नवव्या जोडीसाठी त्याने 31 धावा जोडल्या होत्या. अखेर 52व्या चेंडूवर व्हेटोरीने त्याला बाद केले. 72 मिनिटे पीटर पट्ट्यावर होता. कसोट्यांच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात लांब बदक होते. पहिल्या क्रमांकाच्या बदकाचे वय याच्याहून 29 मिनिटांनी जास्त होते.
रोशन-सुरिया6 ऑगस्ट 1997 : भारत-श्रीलंका मालिकेतील प्रेमदासा मैदानावरील पहिल्याच कसोटीचा शेवटचा दिवस… सनथ थेरन जयसुरिया 340वर खेळत होता. कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येपासून अवघ्या 35 धावा दूर इतक्या जवळच्या अंतरावर…राजेश चौहानच्या गोलंदाजीवर गांगुलीच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. 5-6 ऑगस्ट 1997 हे दिवस विक्रमांचेच होते. श्रीलंकेने दुसर्या डावात 6 बाद 952 धावा केल्या – इतिहासात सर्वाधिक आणि आजही अबाधित!! दोन पूर्ण दिवस खेळत जयसुरिया-महानामाने 576 धावा जोडल्या – कुठल्याही गड्यासाठीचा विक्रम!! (हे मैदानच पाटा खेळपट्टीसाठी
प्रसिद्ध आहे. सध्या सुरू असलेल्या मलिकेतील दुसर्या सामन्यात तिने पुन्हा धावांच्या बरसातीची आपली
परंपरा कायम राखली आहे.) नऊ वर्षांनंतर जयवर्दने-संगकाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 624 धावा जोडत हा विक्रम मोडला…आणखी एक गमतीची गोष्ट – लक्षात ठेवावं की विसरावं हे नीलेश कुलकर्णीला विचारा. हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर त्याने मर्वन अटापट्टूचा बळी मिळविला. अशी कामगिरी करणारा तो बारावा (आणि पहिलाच भारतीय) गोलंदाज होता. त्याच्या गोलंदाजीचे ‘अखेरचे’ पृथक्करण होते – 70 षटके, 12 निर्धाव, 195 धावा आणि 1 बळी. बिचार्याचे द्विशतक हुकले होते – त्या डावात राजेश चौहानने दोन-डझन-कमी-त्रिशतक आणि अनिल कुम्बळेने द्विशतक केले होते!
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply