नवीन लेखन...

बब्बड : प्रेमाची चव

खरं सांगते, कालचा गोड-गोड अनुभव मी माझ्या आडव्या आयुष्यात (अजून मी ‘उभी’ राहात नाही ना,म्हणून म्हंटलं) कधीही विसरणार नाही!
क्षणभर, माझा अजुनही विश्वास बसत नाही. पण…

मी दोन कानांनी ऐकलं.
दोन डोळ्यांनी पाहिलं.
आणि एका नाकाने वास घेतला,
म्हणून माझा विश्वास बसला!

रात्री दूध प्यायल्यावर थोडीशी टंगळमंगळ केली की मी ढाराढूर झोपत असे.
मी दूध पीत असताना, कधीकधी बाबा म्हणत,“व्वा! बब्बडचं जेवण चाललंय वाटतं? छान छान!
मग, आपण सारे जेवूया. बब्बड जेवून झोपली की आपण जेवायला मोकळे.”

आता हे ऐकल्यावर मला वाटायचं,“ही मोठी माणसं जेवतात म्हणजे माझ्या सारखंच बाटलीने दूध पीत असणार. मग थोडावेळ दंगामस्ती करुन झोपी जात असणार.”

मी काल दूध प्यायल्यावर मुद्दामच झोपले नाही.
मनात म्हंटलं “आज पाहूयाच, ही मोठी माणसं कशी दूध पीतात ते?”
आता माझ्या सारख्या लहान मुलांना बाटलीतून दूध म्हणजे या मोठ्या माणसांना बादलीतून किंवा पिंपातून दूध! असं मी मनाशी ठरवलं होतं.

प्रत्येकासाठी वेगवेगळी दुधाची बादली आणि छोटीमोठी पिंपं पण असणार.
“बाबा, आजोबा आणि आजी आपापल्या बादलीत तोंड घालून दूध पीत आहेत.
बाबांनी एक बादली फस्त करुन, पिंपातून दुसरी बादली भरुन घेतली आहे” असं दूध दृश्य मला दिसू लागलं होतं.

इतक्यात लगबग करत आई आली.
माझे दूध पिऊन झाले असल्याने आईने मला खांद्यावर घेतलं.
प्रेमाने कुरवाळलं. पाठीवर हळूवार पणे थोपटलं.
माझ्या केसातून हात फिरवत मानेला मालीश केलं.
मला दोन-चार ढेकरा आल्यावर आईने मला अलगद गादीवर ठेवलं.
मला सावकाश थोपट-थोपट थोपटलं. गुण-गुण,गुण-गुण गाणं गुणगुणलं.
पण मी काही झोपलेच नाही.

आईने दिवा बंद केला तर मी डोळेच उघडले.
आईने माझं दुपटं सैल केलं तर मी हात पाय झाडले.
आईने माझ्या डोक्यावरुन हात फिरवला तर मी फूर्रऽऽ फूर्रऽऽ करत थुकी उडवली.

मी आता काही झोपणार नाही हे आईने ओळखलं.
तोच बाबा म्हणाले,“चला जेवायला. सगळी तयारी झालीय बरं. हं, आणि त्या बब्बडला दे माझ्या मांडीवर.”

मी तर त्याचीच वाट पाहात होते.
आईने मला उचललं.
बाबांनी मला अलगद घेतलं.
आम्ही तिघे बाहेरच्या खोलीत आलो.

बाबांच्या खांद्यावर मान ठेवून “कुठे दुधाच्या बादल्या किंवा पिंपं दिसतात का?” हे मी पाहू लागले.
पण छे, तसं काही नव्हतंच!!
या मोठ्या माणसांच्या जेवणात मला कुठेच दूध दिसेना.
मी मान उंचावून पाहिलं तर, निरनिराळ्या आकाराची पातेली,छोटे मोठे डबे, रंगीबेरंगी बाटल्या, जाड बारीक चमचे आणि भांडी घेऊन ही मोठी माणसं जेवायला बसली होती.
बाबा मला घेऊन खाली बसले. मी बाबांच्या कुशीत बसले.
आता मी सगळं जवळून पाहात होते.
सगळ्यांच्या समोर गोल-गोल पसरट ताटं होती.
या ताटांचं काय करणार? की ही ताटं घेऊन, आता ही मोठी माणसं गाडी-गाडी खेळणार?
मला काही कळेना.
पातेल्यावरची झाकणं काढली की त्यातून भसा-भसा वाफ यायची.
आणि भसकन कुठलेसे चमचमीत वास यायचे.
मला तर फटाफट दोन -तीन शिंका आल्या! बाबा दचकले मग मी हसले.
आई आणि आजी पदर खोचत उठल्या आणि म्हणल्या,“चला वाढूया.ठ
त्या काय वाढताहेत हे मला पाहायचं होतं.
पण तितक्यात बाबांनी मला खांद्यावर घेतलं.
बाबा मला थोपटत होते. त्यांना वाटत होतं थोपटल्यावर मी झोपेन. पण मी चुळबूळ सुरू केली.
मी मान वळवून पाहिलं तर… मी चाटच पडले!
आई आणि आजीने त्या पसरट ताटात खूपच रंगीबेरंगी गोष्टी वाढल्या होत्या!!
मी आतापर्यंत निरनिराळ्या रंगीबेरंगी साड्या, बांगड्या, अंगठ्या, शर्ट, चष्मे,घड्याळं, पॅण्टी, चपला, रुमाल, टोप्या, दुपटी, गोधड्या, चादरी, उश्या, बेडशीटस्, खेळणी आणि चित्रंसुध्दा पाहिली होती. पण…..
चित्र-विचित्र वास येणारे आणि त्यातूनच गरमा गरम वाफा येणारे खाण्याचे इतके रंगीबेरंगी पदार्थ मी आयुष्यात प्रथमच पाहात होते.
हे खाताना कुडूम-कुडूम, कुर्र-कुर्र, चॅक-चॅक असे वेगवेगळे आवाज सुध्दा येत होते.
मला वाटायचं जेवण म्हणजे दूध. आणि दूध असते पांढरे.
पण इथे तर काही वेगळाच प्रकार.
मोठ्या माणसांचं जेवण म्हणजे,“रंग, वास, वाफा आणि आवाज!!”
मी तर भलतीच खूश झाले!
मस्त रंग, चमचमीत वास, उडणाऱ्या वाफा आणि कुरूकुरू-चुरूचुरू आवाज… वाह रे व्वा!
“कधी एकदा हे सगळं गट्टं करते” असं झालं मला.
मी आरडाओरडा करायला सुरुवात केली.
चुळबुळ सुरू केली.
हात पाय नाचवू लागले.
पण बाबांन काही कळेचना.
त्यांनी मला एका हाताने जाम दाबून धरलं आणि दुसऱ्या हाताने पानातले ते रंगीत-संगीत पदार्थ ते स्वत:च्याच तोंडात कोंबू लागले.
खाताना चॅक-पॅक करत मिटक्या मारू लागले.
मधेच माझ्याकडे बघत बोटं चोखू लागले.
मी हाताखाली दबून-दबून बघत होते.

मला वाटलं,आता बाबांनी इतकं खाल्ल्या नंतर तरी एखादा घास मला मिळेल.
मग मी सुध्दा मिटक्या मारीन….. हाताचीच काय पण पायाची पण बोटं चोखीन!
मी विचार करू लागले,’ आपण तर हे खाऊन पाहिलंच पाहिजे.
काय आयडीया करावी बरं?’
हां सुचलं!
मी डिस्को करायला सुरुवात केली.
फुर्र-खुर्र करत थुंकी उडवत डोळे मिचकावू लागले. हात पाय झाडत,मान वळवत पडल्या-पडल्या नाचू लागले.
माझा हा डिस्को पाहून बाबा एकदम दचकलेच!
बाबा भीत-भीत म्हणाले,“अगं हे काय? बब्बडला झालं काय?”
आई हसली.
आईने माझ्या मनातलं बरोबर ओळखलं.
आई म्हणाली,“अहो, आपण सगळेच तिच्या पुढ्यात खात बसलोय,तर…… तिची नाही का भूक चाळवणार?
अंऽऽ एक मऊसर घास भरवा तिला.. काऽय?”
मला खूप आनंद झाला!
मला वाटलं आता मिळालाच आपल्याला घास.
माझ्या तोंडाला पाणी सुटलं.
पण “कसचं काय नी दुपट्यात पाय!’
आजी म्हणाली,“अगं सुनबाई, आधी बब्बडची उष्टावण करू मग तिला घास देऊ. कसे?”
(जेवायला बसल्यावर माझी आजी, माझ्या आईला “सुनबाई” म्हणते हे मला आत्ताच कळलं.)
आजीने असं म्हणताच,बाबांनी मान डोलवली आणि माझी चुळबूळ आणखी वाढली.
मी हात पाय झाडत रागाने गुरगुरू लागले, तेव्हा मात्र बाबा चांगलेच गांगरले!
आणि…..
मला गप्प करण्यासाठी बाबांनी, त्यांचा उष्टा उजवा हात माझ्या तोंडावर चटकन ठेवला……… आणि……… मी तो पटकन चाटला ……..

“या आडव्या आयुष्यात, मला प्रथमच, अन्नाची चव कळली!!!”

मी रागाने गुरगुरणं बंद केलं आणि चव घेत मिटक्या मारायला सुरुवात केली.
मी आनंदाने मिटक्या मारते आहे हे पाहताच, “आजीची सुनबाई” खळखळून हसली.
आणि,
“आपल्या मुलाने काहीतरी गडबड केली” अशी शंका आजीला आली.
पण,
मधल्यामधे माझी मात्र चंगळ झाली!!
हं, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच की……
अहो अन्नाची चव सांगता येते.
पण…
आई बाबांच्या प्रेमाची चव चाखता येते… पण सांगता येत नाही!! हे कालंच कळलं मला.

राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..