नवीन लेखन...

बांग्लादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज

महाराष्ट्रात लाखो बांग्लादेशी घुसखोर

चार-पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी मालेगाव येथे पाच हत्यारबंद बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडले. अर्थातच या अतिरेक्यांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा डाव होता. गेल्या तीन-चार महिन्यात अनेक बांग्लादेशी अतिरेक्यांना पकडण्यात आले होते. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. आजच्या घडीला महाराष्ट्रात खोटी आधारकार्डे, मतदान ओळखपत्रे इत्यादी बाळगणारे लाखो बांग्लादेशी आहेत. यांना पकडून त्यांच्यावर कारवाई होणे हे खूप महत्त्वाचे आहे.

तृणमूल नेत्याच्या घरात बाँबस्फोट

२ ऑक्टोबरला पश्चिम बंगालच्या बर्धवान जिल्ह्यामध्ये एक बाँबस्फोट झाला .या बाँबस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीन/ जमाते इस्लामीचे तीन अतिरेकी गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला व एक अद्याप अत्यवस्थ आहे. हा स्फोट तृणमूल काँग्रेसचे नेते नुरुल हुसेन चौधरी यांच्या घरात झाला. हा बाँबस्फोट झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि ही आग विझविण्याकरीता पश्चिम बंगालच्या अग्निशमन दल आणि पोलीस तिथे पोहचले. त्यावेळी त्यांना दोन बायकांनी पिस्तुलाचा धाक दाखवत रोखले आणि पुढच्या एका तासासाठी पोलिसांना त्या घरात प्रवेश करू दिला नाही. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची दहशतवादी कागदपत्रे, दस्तऐवज, व्हीडिओ सीडीज इत्यादी जाळली.

अतिरेकी कारवायाची योजना

या स्फोटात सापडलेले हे अतिरेकी हे बांग्लादेशी आहेत हे तपासाअंती सिद्ध झाले आहे. यापैकी एकाचे नाव शकील अहमद असे आहे. पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन बायका-जुमशान बीबी आणि अमिना बीबी या मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या पत्नी होत्या. एका तासानंतर पोलिस जेव्हा आत पोहचले, तेव्हा त्यांना ५५ ‘आय.ई.डी. बाँब मिळाले. हे बाँब स्फोटासाठी तयार ठेवले गेले होते. या अतिरेक्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर बाँब तयार करून ठेवले होते, याचाच अर्थ येणार्‍या काळात पश्चिम बंगालमध्ये मोठ्या अतिरेकी कारवाया करण्याची योजना त्यांनी बनवली होती.

‘इन्टेलिजन्स ब्युरो, ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पोहचण्यापूर्वी बाँब नष्ट

बाँब शेवटच्या क्षणी तयार केले जातात व लगेचच त्यांचा वापर केला जातो. हे बाँब तयार करताना हे दोन अतिरेकी अपघातात मारले गेले. त्यामुळेच ही घटना आपल्यासमोर आली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ‘इन्टेलिजन्स ब्युरो आणि ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे घटनास्थळावर पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी हे बाँब नष्ट करून टाकले. पश्चिम बंगालमधील पोलिस ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करीत होते, त्यामुळे त्यांनी अशी कृती केली असल्याचे अनेक वृत्तपत्रात आले हे टीव्हीच्या बातम्यांनुसार सिद्ध होते. त्यांना ही कृती करण्यासाठीचे आदेश अर्थातच पश्चिम बंगाल सरकारकडून आले. भारतातील सुरक्षा संस्थांनी पाहिल्याशिवाय कुठल्याही राज्यातील पोलिस तत्सम बाँब/पुरावे नष्ट करीत नाहीत.

दोन बायका, अतिरेकी व स्फोटात जखमी अतिरेक्याकडून उपयुक्त माहीती मिळेल. या ठिकाणी अल-कायदा या अतिरेकी संघटनेत सामील होण्यासाठी अवाहन करणारी अनेक कागदपत्रे मिळाली. याशिवाय अतिरेक्यांच्या लक्ष्यस्थानी असलेल्या भारतातील अनेक जागांचे नकाशेही मिळाले. हे सर्व पश्चिम बंगाल सरकार लपवण्याचा प्रयत्न करीत होते.

तृणमूल काँग्रेसचा अतिरेकी संघटनेशी संबध

काही दिवसांपूर्वी एका साप्ताहिकात छापून आली होती सध्या पश्चिम बंगालमध्ये ‘सर्धा चिट फंड याविषयी चौकशी सुरू आहे. यामध्ये सामान्य नागरिकांचे तब्बल ३०,००० कोटी रुपये गुंतवले गेले होते. याबाबत सीबीआय चौकशी करीत आहे. या सर्व घोटाळ्याशी पश्चिम बंगाल सरकारचा म्हणजेच तृणमूल काँग्रेसचा मोठा सहभाग आहे. तृणमूल काँग्रेसच्या या आमदार, खासदार आणि नोकरशाहीमधील अनेक बड्या हस्तींची नावे अनेक साप्ताहिकांमध्ये उघड करण्यात आली आहेत.

याच घोटाळ्यात आसामच्या एका माजी डिजीपी पोलिस अधिकार्याचाही सहभाग होता. याबाबत त्यांची चौकशीही सुरू झाली होती. पण भविष्यात होणार्‍या परिणामांना घाबरून त्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.

अहमद हसन इम्रान हे तृणमूल काँग्रेसचा खासदार जन्माने बांग्लादेशी असून १९७० साली ते भारतात स्थलांतरीत झाले. सध्या ते वर्तमानपत्राद्वारे अतिरेक्यांच्या मूलतत्त्ववादाला खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत. पश्चिम बंगाल सरकार त्यांना पकडण्याऐवजी त्यांना लपवण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुदैवाने बांग्लादेशी सरकारने त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्यामुळे भारतातील सुरक्षा संस्था त्यांची चौकशी करत आहे. बांग्लादेश सरकारच्या मते सर्धा चिट फंड घोटाळ्यातील काही पैसे अहमद हसन इम्रान याने बांग्लादेश मधील जमात-ए-इस्लाम या भारतविरोधी अतिरेकी संघटनेला पुरवले. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी यातील काही पैसा पुन्हा भारतात आणला गेला आणि लोकसभेच्या निवडणुकीत या पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.

अलीकडेच बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री अबु हसन अली हे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना भेटले होते. त्यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून त्याची माहिती बांग्लादेश सरकारला देण्याची विनंती केली आहे. कारण जमात-ए-इस्लामी या संस्थेपासून बांग्लादेशच्या लोकशाही सरकारलाही धोका आहे. जमात-ए-इस्लामीचा अल कायदाशी संबध आहे.

खासदार इम्रान तृणमूल काँग्रेसमध्ये ‘सिमीचे अध्यक्ष

राज्यसभेचे खासदार इम्रान हे तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याआधी ‘सिमी या भारत सरकारने बंदी आणलेल्या अतिरेकी संघटनेचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष होते. भारतीय गुप्तचर संस्थांच्या मते इम्रान यांच्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये सिमीचे जाळे वाढले आहे व परिणामी अतिरेकी कारवायांचे प्रमाण वाढले आहे. एवढे सगळे होऊनही तृणमूल काँग्रेस शांत असून उलट या खासदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगाल सरकार मतपेटीच्या राजकारणामुळे काहीच करायला तयार नाही.

अतिरेकी कारवायांकडे दुर्लक्ष

आसाम आणि पश्चिम बंगालमधील ४० टक्के लोकसंख्या ही बांगलादेशी आहे. यामुळेच तृणमूल काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करू धजावत नाही. मतांच्या राजकारणामुळेच पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या अतिरेकी कारवायांकडे दुर्लक्ष केले जाते. तिथे चौकशी व कारवाई करण्यासाठी सुरक्षा संस्थांना स्थानिक शासनाची मदत मिळत नाही. २ ऑक्टोबर रोजी झालेल्या बाँबस्फोटाबद्दल पश्चिम बंगाल शासनाने २४ तास भारताच्या गुप्तचर संघटना व सुरक्षा संस्थांना काहीच सांगितले नाही. गॅस सिलींडरचा स्फोट झाला असे सांगून हे प्रकरण मिटवण्याचा सरकारचा हीन प्रयत्न होता. सुदैवाने पश्चिम बंगाल येथील काही जागृत वर्तमानपत्रांनी ही बातमी समोर आणली. त्यानंतर आपल्या देशातील सुरक्षा संस्थांना ही माहिती मिळाली. ते चौकशीसाठी घटनास्थळी पोहचयाचा प्रयत्न करत आहे, पण हा लेख लिही पर्यंत त्यांना ही परवानगी मिळालेली नव्हती.

बांग्लादेशी आता भारताच्या इतर राज्यांमध्येही पसरले आहेत. बहुतेकांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी या केंद्र सरकारने बांग्लादेशींना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी या पकडलेल्या बांग्लादेशींना पश्चिम बंगालमध्ये पाठवावे असे सांगितले होते.

घुसखोरांमुळे सामाजिक/ सुरक्षेला धोका

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी घुसखोरी झाली आहे. एकट्या मुंबईतच जवळजवळ ३-४ लाख बांग्लादेशी घुसखोर आहे. बहुतेक शहरांमध्ये व झोपडपट्ट्यांमध्ये त्यांची घुसखोरी झाली आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला तर धोका आहेच, पण हे घुसखोर कमी मोबदल्यात काम करीत असल्यामुळे आपल्याकडील कामगारांना काम मिळत नाही. उद्योगपती जास्त नफा मिळवण्यासाठी कमी मोबदल्यात काम करणार्‍या कामगारांना निवडतात, त्यामुळेच या घुसखोरांना मोठ्या प्रमाणावर काम मिळते.

बांग्लादेशी घुसखोरांना शोधा

जे बांग्लादेशी भारतात घुसले आहेत, त्यांना शोधून काढण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. घुसखोरांमुळे राज्यात सामाजिक, आर्थिक, सुरक्षाविषयक समस्या वाढू शकतात. म्हणूनच बांग्लादेशी घुसखोरांना पकडून त्यांना बांग्लादेशात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पण दुर्दैवाने आज दोन राजकीय पक्ष वगळता बाकी सर्व राजकीय पक्ष हे या घुसखोरांच्या बाजूने आहेत. यामुळे या घुसखोरांना शोधण्याचे काम ज्या पद्धतीने व्हायला हवे तसे ते होत नाही. येणार्‍या काळात आपण आपला मतदानाचा अधिकार वापरून अशा प्रकारचे पक्षांविरुद्ध मतदान करून या घुसखोरीच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. येत्या निवडणुकीत अशी मोहिम सुरू करून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर त्यांचे धोरण बदलायला लावण्याची गरज आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..