नवीन लेखन...

बांधूनी साताजन्माच्या गाठी…



विवाह म्हणजे दोन जिवांचे, दोन कुटुंबांचे मिलन. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा आनंदसोहळा. एक संस्कार म्हणूनही या सोहळ्याकडे पाहिले जाते. विवाह म्हटला की आप्तेष्ट, मित्रमंडळी आलीच. जमेल तसा थाट करणेही ओघाने आले. एकूण काय, हा सोहळा जास्तीत जास्त आनंददायी कसा होईल हे पाहिले जाते. पण आजकालच्या महागाईच्या जमान्यात सार्‍यांनाच असा थाटमाट करणे जमते असे नाही. ऋण काढून सण करण्याची आपली मराठमोळी वृत्ती असली तरी तिलाही काही मर्यादा येतात. पण काहीही असले तरी मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत का होईना, हा संस्कार पार पाडावा लागतो. अशा वेळी सर्वसामान्य कुटुंबातील कर्त्याची होणारी अडचण ध्यानात घेऊन ‘सामुदायिक विवाहा’ची संकल्पना समोर आली. मग विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असे विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न होऊ लागले. त्यातून अनेकांचे संसार सुरू होण्यास मदत झाली.

गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक जिल्ह्यांचा चेहरामोहरा काहीसा बदलला असला तरी येथील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांची परिस्थिती फार बदललेली नाही. त्यामुळेच येथे जगण्यासाठी रोजची लढाई लढणार्‍यांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक मध्यमवर्गीय लोक जमेल तसा प्रपंच पार पाडत आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबातील मुलाचा किवा मुलीचा विवाह थाटामाटात पार पाडणे यांच्या नशिबी कुठले ? तरिही रिवाज म्हणून किवा नातलग, मित्रमंडळी काय म्हणतील म्हणून कर्ज काढून असे समारंभपार पाडले जातात. पण त्यानंतर आयुष्यभर कर्जाच्या परतफेडीचा ससेमिरा मागे लागतो. त्यातही खासगी सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास परिस्थिती आणखी बिकट बनते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल प्रतिष्ठान’ या संस्थेने ‘सामुदायिक विवाह सोहळया’चे आयोजन करण्याचा निश्चय केला. गेली चार वर्षे हा उपक्रम अव्याहत सुरू आहे. घरात चार पाहुणे आले तर आपली

धांदल उडते. पण येथे तर दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडतो.

शिवाय सर्वांची व्यवस्थित सोयही केली जाते. एखादा उपक्रम सुरू करणे तसे सोपे असते पण त्यात सातत्य राखणे बरेचदा कठीण जाते. या पार्श्वभूमीवर लोकमंगलचा हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद म्हणायला हवा.

विवाह म्हटला की पै पाहुणे आलेच. अशा वेळी ठराविक संख्येनेच पाहुणे किवा मित्रमंडळींना बोलवणे हे आणखी कठीण काम. हे लक्षात घेऊन या सामुदायिक विवाह सोहळ्यात कोणतीही अट घालण्यात येत नाही. ‘लोकमंगल प्रतिष्ठान’ची या संदर्भातील भूमिका स्पष्ट करताना सुभाषराव सांगतात, ‘या सोहळ्यात वधू-वरांच्या अनेक नातेवाईकांना सहभागी होत येते. त्यामुळे तो अधिक आनंददायी ठरतो. वधू-वरांच्या जन्मजन्माच्या गाठी बांधून देणे हे महत्त्वाचे काम आहेच. पण विवाहानंतर येणारी संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलणेही महत्त्वाचे ठरते. काही वेळा मुलाला नोकरी नसते. तरिही विवाहानंतर संसाराची जबाबदारी पडली की तो आपोआप चार पैसे कमावू लागेल अशी आशा मनाशी धरून पालक त्यांचा विवाह करतात. पण लग्नानंतर लगेचच मनासारखी नोकरी मिळत नाही. काही वेळा पात्रता असूनही अत्यंत कमी वेतनावर किवा मिळेल तसे काम करावे लागते. या पार्श्वभूमीवर सोहळ्यात विवाहबध्द होणार्‍या सक्षम वर किवा वधूंना ‘लोकमंगल’ समूहात नोकरी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात आर्थिक स्थैर्य लाभते. एखाद्याची व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी आर्थिक सहाय्यही केले जाते.’

इच्छुकांना व्यवसायासाठी कमीत कमी व्याजदराने अर्थसाह्य दिले जाते. केवळ विवाह लावून न थांबता वधू-वरांना आर्थिक पाठबळ देण्याचा ठोस प्रयत्न होतो. या सोहळ्याच्या निमित्ताने ‘लोकमंगल’ तर्फे आतापर्यंत ६११ जणांचा विवाह लावण्यात आला असून यावर्षी आणखी ५०१ विवाह लावण्याचा मानस आहे. संस्थेतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम वर्षातून दोन वेळा आयोजित केला जातो. विशेष म्हणजे हा सोहळा पार पाडण्यासाठी अन्य सामाजिक, शैक्षणिक संस्था, मंडळे यांचे जवळपास साडेतीन हजार कार्यकर्ते संस्थेतील कार्यकर्त्यांच्या बरोबरीने अहोरात्र झटत असतात. हे कार्य सेवा म्हणून पार पाडले जाते. आपल्याच घरचे कार्य असल्याच्या भावनेने हे सारेजण झटत असतात. या सार्यांच्या श्रमातून हा आनंदसोहळा फुलत असतो. आजकालच्या स्वार्थी जमान्यात ही सामाजिक बांधिलकी अधिक उठून दिसते.

या सोहळ्यात ‘आमच्याकडून आहेर घ्या’ असा आग्रह अनेकांनी धरला. शिवाय आहेर न देता विवाहाला जाणे अनेकांना रुचत नाही. म्हणून त्यांच्या आग्रहाला मान देऊन अखेर विवाह मंडपात ‘कन्यादान हुंडी’ ठेवण्याची पध्दत सुरू करण्यात आली. गेल्या वेळी या हुंडीत एक लाख रुपयांची रक्कम जमा झाली. विशेष म्हणजे त्यातील सर्वाधिक रकमेची नोट ५० रुपयांची होती. यावरुन या हुंडीत सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांचा उत्स्फुर्त सहभाग कसा होता हे दिसून येते. अशा वेगवेगळ्या संकल्पनांमधून या विवाह सोहळ्याच्या वैभवात वरचेवर भर पडत आहे.

यापुढील काळात महागाई आटोक्यात राहणे कठीण आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांनाही आपल्या मुलाच्या वा मुलीच्या विवाहाचा खर्च करणे कठीण होईल. त्यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे अधिक हाल होऊ शकतात. अशा वेळी सामुदायिक विवाहाची संकल्पना अधिक लोकप्रिय होईल यात शंका नाही. अशी संकल्पना लोकप्रिय करण्याकामी ‘लोकमंगल’ने घेतलेली मुसंडी मोलाची आहे.(अधिक माहितीसाठी ९८२३०९०००९ या क्रमांकावर संपर्क साधावा. )

— अभय देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..