रस्त्याने एक फलक बघीतला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निरनिराळे वयोगट व त्यानी रेखाटलेली चित्रे यांची यादी होती. बालगट म्हणून १ ते ४ वर्षे. त्याना दिले होते चित्रविषय एखादे फळ वा प्राणी काढणे. माझी नांत दोन वर्षाची. तिला कागद पेन दिला की, रेघोट्या काढीत बसते. वाटल की तिला थोडेसे मार्गदर्शन केल की ती एखादे गोलाकार फळ रेखाटू शकेल व त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल. मी हा विचार सुनेला सांगीतला. ती बी.एड. करीत होती. तिने लगेच त्याला विरोध केला.
‘ बाबा हे आमच्या शैक्षणिक गृहपाठानुसार चुक आहे. मुल साधारण पांच वर्षाचे होईपर्यंत त्याच्यावर कोणतीही शैक्षणिक संकल्पना लादू नये. आपणास कांहीतरी शिकवले जाते, ह्याची शिशुवयांत त्याला कल्पना होणे हे अपेक्षीत नाही. ते फक्त त्याचे खेळण्याचे, बागडण्याचे, वय. नाचण्याचे, हूंदडण्याचे, गाण्याचे, रडण्याचे, मागण्याचे, हट्ट करण्याचे, वय असते. जसे त्याला वाटत राहील तसे त्याला बागडू द्या. कोणताही ताण, कोणतीही जबाबदारी, कोणतेही त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याचे मानसिक नुकसान करेल. चांगली वा वाईट संकल्पना त्यांत निर्माण होईल. अहं वा न्युनगंड त्याच्यामध्ये उत्पन्न होईल. तुलनात्मक विचारसरणी ही डोकावेल व स्थिर होण्यास मदत होईल. तेंव्हा त्या चिमुकल्या बालवयांत वैचारीक बांधीलकी नको. ‘
ह्याच क्षणी मला शेजारच्या शिक्षीत आजीपण दिसू लागल्या. त्या त्यांच्या नातवाची सतत करमणूक करताना दिसत. त्यांची एक वर्षाची नांत होती.
” चांदोबा चांदोबा भागलास का, निंबोनीच्या झाडामागे लपलास कां ” म्हणत असताना ती चिमुकली चंद्राकडे झेपावते. ” Twinkle Twinkle little star ” ऐकताना ताऱ्याच्या चमचमण्याकडे बघत डोळे मिचकावते. फुलाला कुरवाळते, पाळलेल्या कुत्र्याला वा मांजराला गोंजारते, खेळते. आजी नातीला खेळवताना ज्या क्लुप्त्या करीत होती, त्याचे चित्र मी डोळ्यापुढे आणले. चांदोबा कुठे ?, फुल कोठे ?, भू भू कोठे ? हे प्रश्न विचारताना एक वर्षाची नात आपल्या नजरा, चेहरा, वा हात त्या गोष्टीचा वेध घेऊन आजीने पूर्वीच शिकवलेले गृहपाठ व्यक्त करीत त्या परिक्षेंत प्रथम क्रमांकात उतीर्ण झालेली दिसली. तुमच्या समजण्यांत ते त्यांच्यासाठीचे ज्ञान असते. तर बालकासाठी ते त्याची करमणूक असते. हासत खेळत ज्ञानार्जन ते हेच नव्हे का ? कोठे येतो येथे वयाचा, शिक्षणाचा आणि मानसिक तणावाचा संबंध ? एकदा रस्त्याने एक हत्ती चालला होता. आजी म्हणाली बघ बघ हा हत्ती त्याला जय जय कर. नातीने दोन्ही हात जोडून नमन केले. हत्तीचे महाकाय शरीरयष्टी दाखवित त्यातील देवत्वाची संक्लपना सांगत होती.
लहानगीला खेळविताना जे दिसले ते असे. अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं, रुप्याचा वाळा
तान्हा बाळा, तीट लाऊ. चिव चिव ये, दाणा खा, पाणी पी, भूर ऊडून जा. इथ इथ बस रे मोरा- इत्यादी. ती ताई आली, मामा आला, काका आला, बाबा आला, बाळाला भूर घेऊन जाईल. झुकु झुकु झुकु आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. छोटी छोटी गाणी, छोटी छोटी वाक्ये – – हे सारे बालकांच्या बुद्धीला चालना देणारे, वाढ करणारे खाद्यच नव्हे कां ?
२
एका वैद्यकीय मासिकांत डॉक्टरांच्या शोधाचा प्रबंध वाचण्यांत आला. एका आडीच/तीन वर्षाच्या बालकाला ११ निरनीराळ्या शिकवण्यांत आल्या होत्या. प्रत्येकाचा मेंदू हा कंपुटर प्रमाणे असतो. ( अर्थात खर म्हणजे कंपुटर मेंदू प्रमाणे असतो. ) जन्मताच कोरी पाटी. सभोवताल, परिस्थीती, ह्या माध्यमातून सतत त्यावर लहरीच्या रुपाने आघात होत असतात. ज्ञानेद्रियाच्या प्रत्येक माध्यमातून त्या चेतनांचे स्वरुप मेंदूपर्यंत जावून तो Upload and Fix होत राहतो. त्या चेतनेचे स्वरुप, विश्लेशन, अर्थ, प्रयोजन इत्यादी बाबी प्राथमिक अवस्थेतील मेंदूला समजण्याच्या पलीकडच्या असतात.
आपण देखील एखादी घटना बघीतली, ऐकली तर प्रथम संकलीत करतो. नंतरच तिच्याविषयी अनुमान, माहिती, विचार, मत, उपाय, इत्यादीची यादी समोर येऊन, मेंदू तसे विश्लेषन करीत राहतो. लहान बालकाचे, शिशूचे वा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे तसेच असते. ( ” Grasping is there, Fixing is there immediately. Analysis is later on, when understanding develops ” ) असे पुस्तकातील वाक्य आहे. खर म्हणजे बालकाला काय कळते, काय समजते, काय उमगते, हे प्रश्न जेंव्हां तो बोलण्याची कला जाणून व्यक्त करतो. तेंव्हांच ते आम्हालाही कळू लागते. सत्य मात्र असे की त्याच्या मेंदूच्या ग्रहण शक्तीची
योग्यता सामान्य Normal Brain असेल तर ती जन्मापासूनच सुरु होते. नुकत्याच डेन्मार्क येथे वैद्यकीय शास्त्रातला एक प्रबंध प्रसिद्ध झाला. एक अचंबित करणारे निष्कर्श. तब्बल ६००० गर्भवती स्त्रीयांची व गर्भातील अर्भकांच्या मेंदूची तपासणी अत्यंत अधूनिक तंत्रानी केली गेली. त्या पोटातील बालकांचे विकसीत होणारे मेंदू कार्यक्षमतेमध्येही प्रगत झालेले आढळले. त्यांचे Normal Brain Understanding Inference अर्थात ज्ञानाचा निष्कर्ष हेच सिद्ध करतात की हजारो वर्षापूर्वी महाभारत काळी अभिमन्युची कथा ही देखील तेच सुचित करते. गर्भांत असताना सुभद्रेच्या अर्थात आईच्या माध्यमातून त्याला चक्रयुहाचे ज्ञान प्राप्त झाले होते. व त्या ज्ञानाचा उपयोग पुढे झालेल्या महाभारत युद्धांत त्याने केला. ज्ञान मिळणे, आकलन करणे, व त्याचा उपयोग करणे, ह्या वेळेच्या चक्रांत कदाचित् निरनीराळ्या बाबी असतील. परंतु संपूर्ण चक्र फक्त हेच सुचविते की ही निश्चित घडणारी नैसर्गिक संकल्पना आहे. ईश्वरी कलाकृती आहे.
मुलाला शिक्षण केव्हां द्यावे व तो त्याचा व्यवहारांत उपयोग केव्हां करेल ही बाब भिन्न आहे. परंतु ती अशक्यतेच्या चाकोरीत जात नाही. शिकवताना मुलावर मानसिक तणाव पडू नये ह्याच्याशी जरी सहमती असली तरी ते ज्ञान कशा सोप्या व करमणूक प्रधान माध्यमातून साघ्य करता येते कां हे बघीतले पाहीजे. ज्ञानाचे संकल्पन होत असताना मुलाला त्याची त्या दृष्टीकोणातून मुळीच जाणीव येऊ नये.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply