“डॉक”2 ऑगस्ट 1966 रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाड्यात मातुरी श्रीधरचा जन्म झाला. भारतीय क्रिकेट वर्तुळात तो “डॉक” म्हणून प्रसिद्ध आहे. यश मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार असणार्यांना उद्देशून वापरले जाणारे हे विशेषण त्याला अगदी तंतोतंत लागू आहे.जानेवारी 1994च्या प्रारंभी सिकंदराबादमध्ये (हैदराबादचे जुळे भावंड) झालेल्या रणजी करंडकाच्या साखळी सामन्यात आंध्रच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. 263 धावांवर त्यांचा पहिला डाव संपला. प्रतिस्पर्धी हैदराबादचा पहिला गडी 30 धावांवर परतला. त्याच्या जागी आलेल्या ‘डॉक’ने 366 धावांची विक्रमी खेळी केली. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये (प्रथम श्रेणी सामना हा किमान 3 दिवसांचा असतो) कुणाही भारतीयाची ही तिसर्या क्रमांकाची कामगिरी होती. जागतिक यादीत नाबाद 501 धावांसह ब्रायन लारा अग्रभागी आहे तर आघाडीचे भारतीय आहेत भाऊसाहेब निंबाळकर. 1948-49च्या हंगामात भाऊसाहेबांनी पुण्यात नाबाद 443 धावा केल्या होत्या. 1990-91च्या हंगामात संजय मांजरेकरने 377 धावांची खेळी केली होती. डॉकच्या संघाने 6 बाद 944 वर डाव घोषित केला. भारतात खेळल्या गेलेल्या प्रथम श्रेणी सामन्यांमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विवेक जयसिम्हा आणि नोएल डेविड यांनी या सामन्यात द्विशतके केली. प्रथम श्रेणी सामन्यामध्ये एकाच डावात तीन द्विशतके झळकावली जाण्याची ही एकमात्र वेळ ठरली आहे.
“बोथमची अॅशेस”इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दर वर्षी खेळली जाणारी कसोटी मालिका ही ‘रक्षा मालिका’ म्हणून प्रसिद्ध आहे. 1981 सालच्या मालिकेतील हा किस्सा आहे एका हरहुन्नरी खेळाडूचा – इअन बोथमचा.सहा सामन्यांच्या या मालिकेत 3 सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी झालेली होती. इंग्लिश कप्तान माईक ब्रिअर्लीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली पण त्यांचा डाव 189 धावांवर संपला. कांगारूंनी पहिल्या डावाच्या आधारावर 69 धावांची आघाडी मिळवली. दुसर्या डावात इंग्लिश फक्त 150 धावांचीच आघाडी घेऊ शकले. तिसर्या दिवसाचा खेळ 1 बाद 9 धावांवर संपला.
आता
दोन अख्खे दिवस शिल्लक होते आणि कांगारूंना हव्या होत्या फक्त 142 धावा. 4 बाद 104 नंतर तर फक्त 47 धावाच राहिल्या होत्या पण अॅलन बॉर्डर बाद झाला. इंग्लिश कप्तानाचा आता दोन्ही बाजूंनी फिरकी मारा आणण्याचा विचार होता पण अखेरच्या क्षणी त्याने इअन बोथमकडे चेंडू सोपवला. सॉमरसेटच्या या पठ्ठ्याने मग कमालच केली. अवघी “एक” धाव मोजून 28 चेंडूंच्या अंतराने त्याने 5 कांगारू टिपले! पहिल्या हप्त्यात त्याचे पृथक्करण होते 9 षटके, 3 निर्धाव, 10 धावा, बळी नाही. वैयक्तिक दहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने पहिला कांगारू टिपला. त्यानंतर टाकलेल्या 26 चेंडूंमध्ये त्याने केवळ एक धाव दिली आणि 3 गडी बाद केले. चौदाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने ऑसी क्र. 11 टेरी आल्डर्मनचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि एक अफलातून विजय इंग्लंडला मिळवून दिला. त्याचे नंतरचे आकडे 14-9-11-5. ही मालिकाची ‘बोथमची रक्षा’ म्हणून ओळखली जाते. (रविवार २ ऑगस्ट १९८१)
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply